Pandharpur Bazaar Samiti Election Sarkarnama
विशेष

Pandharpur Politic's : परिचारकांच्या मुत्सद्देगिरीला काळे-भालकेंकडून राजकीय शहाणपणाची टाळी; अभिजीत पाटलांचा आमदारकीच्या तयारीचा शड्डू

या शहाणपणामुळे सतत विरोधात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेत जाण्याचा राजमार्ग तयार झाला आहे.

भारत नागणे

पंढरपूर : आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पंढरपूर (Pandharpur) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. या निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी बेरजेचे राजकारण करत मुत्सद्देगिरी दाखवली आहे, तर राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) आणि भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी परिचारकांच्या हातात हात देत, राजकीय शहाणपणा दाखवला आहे. त्यांच्या या शहाणपणामुळे सतत विरोधात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेत जाण्याचा राजमार्ग तयार झाला आहे. (Diplomacy of Prashant Paricharak and political wisdom of Kalyanrao Kale-Bhagirath Bhalke)

भालके-काळे यांनी घेतलेल्या या राजकीय भूमिकेचे त्यांच्या कार्यकर्त्यांनीही स्वागत केले आहे. दुसरीकडे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आहे. त्यांची ही भूमिका राजकीय फायद्याची की तोट्याची हे बाजार समितीच्या निवडणुक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर तालुक्याच्या राजकाणात चंचूप्रवेश केलेले अभिजीत पाटील यांनी परिचारक विरोधक अशी आपली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याची सुरवात बाजार समितीच्या निवडणुकीपासून सुुरु झाली आहे. राज्यातील सत्ताबदलाचे परिणाम तालुक्याच्या राजकारणावरही हळूहळू दिसू लागले आहेत. भाजपचे नेते प्रशांत परिचारक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून बेरजेचे राजकारण सुरु केले आहे. त्याचे प्रतिबिंब बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून आले आहे.

पंढरपूर बाजार समितीवर परिचारक गटाचे गेल्या २५ वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. बाजार समितीची वार्षिक उलाढाल सुमारे पावणे पाचशे कोटींवर गेली आहे. येथील बेदाणा आणि डाळींब सौदे बाजार पश्चिम महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. येथील व्यापारी आणि बाजार समितीमध्ये असलेल्या सौहार्दपू्र्ण संबंधामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा झाला आहे.

बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुरवातीपासूनच प्रशांत परिचारक आणि त्यांच्या समर्थकांनी सकारात्मकता दर्शवली होती. जे सोबत येतील त्यांना सत्तेत वाटा देऊ, अशी खुली ऑफरही त्यांनी दिली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे व भगीरथ भालके यांनी परिचारकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी तड़जोड मान्य नसल्याचे सांगत ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेत निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील गटाचे १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे भालके-काळे गटाने सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने परिचारकांचा एकहाती विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाला आहे. तरीही परिचारक विरुध्द पाटील अशी सरळ लढत होत आहे. एकूण १८ पैकी परिचारक गटाच्या पाच जागा बिनविरोध निवडून आल्याने परिचारक गटाचा उत्साह वाढला आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सहकारी संस्था गटामध्ये परिचारकांचे वर्चस्व आहे. तर ग्रामपंचायत मतदार संघामध्ये भालके-काळेंच्या मदतीमुळे परिचारक गट अधिक मजबूत झाला आहे. विरोधी पाटील गटाला या निवडणुकीमध्ये बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. विठ्ठल परिवाराचा नेता म्हणून अभिजीत पाटील बाजार समितीची निवडणुक लढवत असले तरी परिवारातील किती मतदारांचा प्रतिसाद मिळतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

अभिजीत पाटलांची विधानसभेची तयारी

विठ्ठल साखर कारखान्याचा अध्यक्ष तोच पंढरपूर विधानसभा मतदार संघाचा उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा अथवा गटाचा असो, हे मागील ४५ वर्षांपासून चालत आलेला राजकीय इतिहास आहे. तोच राजकीय पायंडा पुढे चालू ठेवण्याचा मानस अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष औदुंबर पाटील, राजाभाऊ पाटील, वसंतराव काळे, भारत भालके, भगीरथ भालके यांनी त्या त्या काळात विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष असताना विधानसभेची निवडणूक लढवली आहे.

आबा, वस्तुस्थिती जाणा : कार्यकर्त्यांची खासगीत कुजबूज

औदुंबर पाटील आणि भारत भालके यांचा अपवाद वगळता राजाभाऊ पाटील, वसंतराव काळे आणि भगीरथ भालके यांना विधानसभेला यश मिळवता आलेले नाही. त्यानंतर आता विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्या दृष्टीने त्यांनी साखर पेरणीही सुरु केली आहे. साखर पेरणी करत असताना परिवारातील नेत्यांना सोडून आमदारकी मिळवणे वाटते तितके सोपे नाही, याचाही त्यांना विचार करावा लागणार आहे. अतिउत्साही आणि चौकडीतील कार्यकर्त्यांच्या गर्दीतून जरा बाजूला येऊन वस्तुस्थितीची अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांचेच कार्यकर्ते आता खासगीत बोलू लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT