Prashant Paricharak, Samadhan Autade, Kalyanrao Kale Sarkarnama
विशेष

Fadnavis Pandharpur Sabha : फडणवीसांच्या विठ्ठल कारखान्यावरील सभेला परिचारक, आवताडे, काळेंची दांडी

Lok Sabha Election 2024 : विठ्ठल कारखान्यावरील अभिजित पाटील यांनी आयोजित केलेल्या सभेला परिचारक, आवताडे आणि काळे यांनी दांडी मारल्याने महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असे दिसून येते. अभिजित पाटील यांच्या एन्ट्रीमुळे हे महत्वाचे तीन नेते नाराज झालेत की काय, अशी चर्चा आता पंढरपूर आणि मंगळेवढ्यात रंगली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 May : माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले होते. या माढा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक तथा माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूर-मंगळेवढ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे हे अनुपस्थित होते. त्यामुळे अभिजित पाटील यांच्या एन्ट्रीमुळे पंढरपूरमधील हे तीन नेते नाराज झाली की काय, अशी चर्चा आता पंढरपूर-मंगळवेढ्यात रंगली आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर (Vitthal Sugar Factory) 26 एप्रिल रोजी राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जप्रकरणावरून जप्तीची कारवाई केली. कारखान्याची तीन गोदामे सील केली होती. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijeet Patil) हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले होते. मात्र, जप्तीची कारवाई झाली, त्या दिवशी रात्री अभिजित पाटील यांनी कारखान्याचे संचालक आणि विश्वासू सहकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्या बैठकीत अभिजित पाटील यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर अभिजित पाटील यांनी सोलापुरात येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्या भेटीत लोकसभेला तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला कारखान्याला मदत करतो, असा शब्द दिला होता. त्यानंतर पुण्यातील कर्ज वसुली लवादासमोर झालेल्या सुनावणीत राज्य सहकारी बँकेला कडक भाषेत सुनावत कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेण्याचा आदेश लवादाने दिला, त्यामुळे राज्य सहकारी बॅंकेने कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेतली.

तीन गोदामांचे सील काढून ती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ताब्यात देण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला, त्यामुळे दिलेला शब्द निभावण्याची जबाबदारी अभिजीत पाटील यांच्यावर होती. त्यानुसार अभिजित पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी माढा आणि सोलापूरमधील भाजपच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, शेवटच्या दिवशी अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सभेचे आयोजन केले होते.

विठ्ठल साखर कारखान्यावरील सभेला भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते आल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक तथा माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak), आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनीही सभेला हजेरी लावणे अपेक्षित होते. मात्र, पंढरपूर-मंगळवेढ्यातील ही तीनही नेते गैरहजर होते, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

विठ्ठल कारखान्यावरील अभिजित पाटील यांनी आयोजित केलेल्या सभेला परिचारक, आवताडे आणि काळे यांनी दांडी मारल्याने महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असे दिसून येते. अभिजित पाटील यांच्या एन्ट्रीमुळे हे महत्वाचे तीन नेते नाराज झालेत की काय, अशी चर्चा आता पंढरपूर आणि मंगळेवढ्यात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT