Solapur, 19 January : तब्बल पावणे दोन महिन्यांनंतर राज्यातील महायुती सरकारचे पालकमंत्री जाहीर झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक पालकमंत्रिपदे ही अर्थातच भारतीय जनता पक्षाकडे आली आहेत. मंत्रिमंडळातील बड्या नेत्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार जिल्हे मिळाले असले तरी महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सहा मंत्र्यांना पालकमंत्रिपदासाठी डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षाला अंडरकरंट दिला आहे. दुसरीकडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री करून त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पंक्तीत आणून बसविले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बहुचर्चित पालकमंत्रिपदाची यादी ‘दाओस’च्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी जाहीर केली आहे. त्यात 36 मंत्र्यांकडे 37 जिल्ह्यांचे वाटप करण्यात आले आहे. भाजपकडे वीस मंत्रिपदे आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 12, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे दहा मंत्रिपदे आहेत. पालकमंत्रिपदाबाबत भाजपने सर्वच सर्व वीस मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे. शिवसेनेला नऊ पालकमंत्रिपद, तर राष्ट्रवादीला सात पालकमंत्रिपदे मिळाली आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे कोल्हापूरचे, तर आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोली, तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगराचे सहपालकमंत्रिपद सोपवले आहे. यातील कोल्हापूर वगळत गडचिरोली आणि मुंबई उपनगरला भाजपचेच पालकमंत्री (Gurdian Minister) आहेत. त्यामुळे गडचिरोली आणि मुंबई उपनगरमध्ये काही वाद होणार नाहीत. मात्र, कोल्हापुरात शिवसेनेचे प्रकाश आबीटकर हे पालकमंत्रि आहेत, त्या ठिकाणी भाजपचा सहपालकमंत्री केल्याने दोन पक्षात खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महायुतीच्या पालकमंत्रिपदाच्या यादीत काही वैशिष्ट्ये आहेत. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहराबरोबरच त्यांचे होम ग्राउंड असलेल्या ठाण्याच्या पालकत्वाची जबाबदारी असणार आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आलेली आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या बीडची जबाबदरी अजित पवारांकडे असणार आहेत. अजित पवार प्रथमच पुणे अथवा पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर पालकमंत्रिपदी म्हणून काम करण्याची बहुधा पहिलीच वेळ असावी. बीडबरोबरच अजितदादांकडे पुण्याचीही जबाबदारी असणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदे, अजितदादा यांच्याबरोबर आणखी एका मंत्र्याकडे दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. ते मंत्री म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule). बावनकुळे यांच्याकडे नागपूरबरोबरच अमरावतीची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे बावनकुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.
खातेवाटपातही फडणवीसांनी बावनकुळेंना झुकते माप दिल्याचे दिसून आले होते. मुख्यमंत्री, गृहमंत्रिपदानंतर तिसऱ्या नंबरचे खाते समजल्या जाणाऱ्या महसूलमंत्रिपदी बावनकुळे यांची वर्णी लावली आहे, त्यामुळे मागील पंचवार्षिक निवडणुकीत ऐनवेळी तिकिट कापून झालेले नुकसान चालू पंचवार्षिकमध्ये भरून देण्याची धोरण सध्या दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.