
Chhatrapati Sambhaji Nagar: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याच्यावर मोक्का आणि 302 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे.
सर्व आरोपींवर मोक्का लावल्यानंतर वाल्मीक कराड याला यातून वगळण्यात आले. हे आरोपी सुटले तर माझाही खून करतील, अशी भीती व्यक्त करत धनंजय देशमुख यांनी आज मोबाईल टॉवर वर चढून स्वतःला संपवण्याची धमकी दिली होती.
थोड्या वेळापूर्वी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून मस्साजोग येथे सुरू केलेले आंदोलन मागे घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात याला कारण समस्त 'आकां'चे सरताच (Devendra Fadanvis) देवेंद्र फडणवीस हे असून ते गुन्हेगारांना पाठीशी घालत, असल्याचा आरोप त्यांनी केला.
सध्या मस्साजोग मध्ये जे चाललं आहे ते पाहता संतोष देशमुख यांची हत्या भाजप 'इष्टापत्ती' म्हणून बघत आहे का? असा सवाल करत फडणवीस साहेब हा जीवघेणा खेळ थांबवा, अशी मागणी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली. गेल्या 35 दिवसांपासून मराठवाडा आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि याला जबाबदार असणाऱ्या आरोपींवरील कारवाई च्या मागणीमुळे तापले आहे.
या प्रकरणाच तपास एसआयटी आणि सीआयडी मार्फत सुरू असला तरी सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सरकारकडून सुरू असलेल्या कारवाई आणि तपासाबद्दल समाधानी नाहीत. आतापर्यंत अटक केलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे, परंतु खंडणीतून खून झालेल्या सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी प्रमुख संशयित असलेल्या वाल्मीक कराड वर मात्र मोक्का आणि 302 कलम अद्याप लावण्यात आलेले नाही.
यावरून सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज टोकाचे पाऊल उचलत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.गावातील पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी दोन तास आंदोलन केले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीनंतर देशमुख यांनी आपले आंदोलन मागे घेत ते टाकीवरून खाली उतरले.
दरम्यान वाल्मीक कराड याच्यावर मोका लावून त्या 302 अंतर्गत कारवाई करावी तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,या मागणीसाठी राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'आकां'चे सरताज असा करत ते गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पोरासोरांवर कारवाई करण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये जाऊन वाल्मीक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी,अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.