Mumbai, 03 July : मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या मुद्यावरून शिवसेनेचे आमदार नीलेश राणे आणि काँग्रेसचे नाना पटोले यांंनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पण, मुत्सुद्दी मुश्रीफांनी दोघांच्या आक्रमणाला तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले. तसेच, दोघांना त्यांच्या जिल्ह्यात येऊन आरोग्य यंत्रणा दुरुस्त करून दाखविण्याचे चॅलेंज स्वीकारले.
आरोग्य मुद्यावर आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, मेडिकल कॉलेजला केंद्र सरकारकडून परवानगी दिली जाते. मेडिकल बोर्ड ऑफ गर्व्हनन्सकडून वर्षातून तीनवेळा त्याचे इन्स्पेक्शन होते. खासगी आणि सरकारी मेडिकल कॉलेजला यातून सुट आहे का? कारण, मेडिकल कॉलेज हे सव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात नसावं. सिव्हिल हॉस्पिटलच्या पायाभूत सुविधा त्यांना वापरता येता कामा नये, असा नियम आहे.
पण, सिंधुदुर्गचे सर्व सिव्हिल हॉस्पिटल उचलून मेडिकल कॉलेजमध्ये (Medical Collegae) हलविण्यात आले आहे. सगळी व्यवस्था तिकडे नेण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलची सर्व व्यवस्था मेली. त्या ठिकाणी सिव्हिल सर्जन बसतात. पण, त्यांना कामच नाही. तुम्ही सर्व अधिकार डीएमआरएला दिले आहेत. डीएमआरए काय करतात, हे सिव्हिल सर्जनला माहिती नसतं. खासगी मेडिकल कॉलेजवाल्यांना डॉक्टर देण्याची ती अट आहे, ती सरकारी मेडिकल कॉलेजला लागू नाही. तेथून आपण डॉक्टर बाहेर काढणार आहोत की कंपाउंडर, ही फार गंभीर बाब आहे, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
मेडिकल बोर्ड ऑफ गर्व्हनन्सकडून होणाऱ्या प्रत्येक पाहणीची श्वेतपत्रिका निघाली पाहिजे. त्या पाहणीचे काय झाले, हे कळले पाहिजे. आता सिव्हिल हॉस्पिटल रिकामं झालं आहे. कोणी गरीब माणूस त्या ठिकाणी गेला तर त्याला गोव्याला जायला सांगितलं जातं. आता इकडे उपचार केले जाणार नाहीत, तू गोव्याला जा, असे त्यांनी सांगितले जाते. गर्व्हमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळा अधिकार आहे का. म्हणजे गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज काहीही करू शकतात का. त्यांनी व्यवस्था नाही दिली तर चालते का, आणि खासगी मेडिकल कॉलेजला वेगळे अधिकार आहेत का, असे सवाल नीलेश राणे यांनी केले.
नीलेश राणे यांच्या प्रश्नाला वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, आमदार राणे यांचा मेडिकलचा चांगला अभ्यास आहे, त्यामुळे त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्याकडे स्टाफ कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण, त्याबाबत आता सुधारणा केल्या जात आहेत. सिंधुदुर्ग आणि इतर एक दोन जिल्ह्यांत कमतरता आहे, हे खरं आहे.
आमच्याकडे गरिबांची गुणवत्ताधारक मुलं येतात. त्यात कोणत्याही प्रकारची वसुलीबाजी नाही. श्रीमंताची मुलं डोनेशन देऊन खासगी मेडिकल कॉलेजला जातात. जे जे सरकारला करावं लागेल, ते आम्ही करू आणि मी स्वतः सिंधुदुर्गमध्ये जाईन, तिथं पाहणी करेन आणि तेथील त्रूटी दूर करेन, असे उत्तर हसन मुश्रीफ यांनी दिले.
मुश्रीफ यांच्या उत्तरावर नाना पटोले यांचे समाधान झाले नाही. उलट त्यांनी मुश्रीफ यांच्यावर चुकीचा महिती देत असल्याचा आरोप केला. शासकीय हॉस्पिटलमध्ये अद्यायवत सेवा देणे सरकारचे काम आहे. सरकारने सिव्हिल हॉस्पिटल संपुष्टात आणली आहेत. तुम्ही मेडिकल कॉलेज चालवायला निघाला आहात. तुम्ही डीनच्या हाती सर्व जबाबदारी दिली आहे, सिव्हिल सर्जनच्या हाती काहीच नाही. ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज देण्यात आले आहे, त्या ठिकाणचे सिव्हिल हॉस्पिटल संपले आहेत. आम्हाला त्याच्यावर उपाय योजना सांग ना. हॉस्पिटल मेले नाही, तर त्या ठिकाणी माणसं मरत आहेत. व्यवस्था नसल्यामुळे लोकांनी मरावं का, असा सवाल पटोले यांनी केला.
पटोले यांनी टोकाची टीका करूनही मुत्सद्दी मुश्रीफांनी दोघांचेही चॅलेंज स्वीकारत आरोग्य यंत्रणा दुरुस्त करण्याचा शब्द दिला. ते म्हणाले, एमपीएससीने आम्हाला दोन हजार प्राध्यापक दिले आहेत. आमचे आयुक्त एमपीएससीचे सदस्य झाले आहेत. विधानसभेच्या संबंधित सदस्यांनी तक्रार द्यावी. त्याची चौकशी लावण्यात येईल. मी स्वतः सिंधुदुर्ग आणि भंडाऱ्याला जाईन आणि तेथील व्यवस्था दुरुस्त करून दाखवेन.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.