Shankarrao Mohite-Patil, Baburao Patil-Angarkar- Shivajirao Pandit
Shankarrao Mohite-Patil, Baburao Patil-Angarkar- Shivajirao Pandit Sarkarnama
विशेष

मोहिते-पाटील, बाबूराव पाटील-अनगरकर यांना मी कधीही विसरू शकत नाही : शिवाजीराव पंडित भावूक

सरकारनामा ब्यूरो

बीड : मोहोळचे (स्व.) बाबूराव पाटील-अनगरकर यांच्या प्रेरणेमुळे मी राजकारणात आलो. बाबूराव पाटील अनगरकर हे माझे ट्रेनिंग सेंटर होते. मी निवडणुकीला (Election) उभा राहिलो होतो, त्यावेळी शंकरराव मोहिते पाटील (Shankarrao Mohite-Patil) आणि बाबूराव पाटील अनगरकर (Baburao Patil-Angarkar) हे माझ्या प्रचाराला आले होते. त्या निवडणुकीत त्यांनी माजलगावमध्ये सुंदरराव सोळुंके यांचा आणि गेवराई येथे माझा प्रचार केला होता. त्यांना मी कदापि विसरू शकत नाही, अशा शब्दांत माजी मंत्री शिवाजीराव पंडीत (Shivajirao Pandit) यांनी अनगरकर आणि मोहिते पाटील यांची आठवण सांगितली. (I can never forget Mohite-Patil, Baburao Patil-Angarkar : Shivajirao Pandit)

माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रोहयो मंत्री संदीपान भूमरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. त्या सत्काराला उत्तर देताना पंडीत यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

माजी मंत्री पंडीत म्हणाले की, बाबूराव पाटील-अनगरकर हे माझे ट्रेनिंग सेंटर होतं. जसं बीएड झाल्याशिवाय मास्तरकी करता येत नाही. त्याप्रमाणे मोहोळचे बाबूराव पाटील अनगरकर, अकलूजचे शंकरराव मोहिते पाटील आणि दादासाहेब जगताप यांची मी भाषणे ऐकली. त्यांची भाषण ऐकल्यानंतर मला समजलं की हे असं करू शकतात. मी तर शिकलेला आहे. तिकडून आले की माझा उत्साह वाढायचा; म्हणून त्यांचं नाव घेणं माझं आद्य कर्तव्य आहे.

मी राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर सत्कार घेण्याचे बंद केले होते. पण, माझे नेते शरद पवार साहेब येणार आहेत, म्हटल्यावर मला हा सत्कार घ्यावा लागला. मी १९६२ पासून गेवराई तालुक्यासाठी सालगड्यासारखे काम केले आहे. आज मी थकलो असलो, तरी तुमची राखण करतो आहे. त्यासाठी माझी तीनही मुले इमानदारीने काम करत आहेत. अखेरच्या काळात माझी एकच इच्छा आहे, माझ्या विजयसिंहला (विजयसिंह पंडीत) एकदा निवडून द्या, असे भावनिक आवाहन पंडीत यांनी केले.

माजी मंत्री पंडीत म्हणाले की, आज आपल्या व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत. या निमित्ताने जळगाव ते सोलापूर या रेल्वे मार्गाची मागणी आज त्यांना करतो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT