Adv. Pravin Chavan & Tejas More
Adv. Pravin Chavan & Tejas More Sarkarnama
विशेष

तेजस मोरेंचा नवा गौप्यस्फोट; सरकारी वकील प्रवीण चव्हाणांच्या अडचणीत वाढ

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांच्या आरोपावर सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Praveen Chavan) यांनी जळगावमधील तेजस मोरे यांनीच हे ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्याचा दावा केला होता. तेजस मोरे (Tejas More) यांनी आज माध्यमांपुढे येत चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला. ते स्टिंग ऑपरेशन मी केलेले नाही. तसेच, चव्हाण यांना मी कसलेही घड्याळ भेट दिलेले नाही. कोणताही पुरावा न देता ते माझ्यावर बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा पलटवार करत मोरे यांनी सरकारी वकिल चव्हाण यांना पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. (I did not do sting operation regarding public prosecutor Praveen Chavan : Tejas More)

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वकील चव्हाण हे विरोधी पक्षातील नेत्यांना अडकविण्याचे कटकारस्थान करत असल्याचा आरोप करत काही व्हिडिओ आणि ऑडिओ विधानसभा अध्यक्षांना सादर केले होते. त्यातील काही प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झाले असून त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबड उडाली आहे. त्यानंतर चव्हाण यांनी मोरे यांनी मला भिंतीवरील घड्याळ भेट दिले होते, त्यात कॅमेरा बसवून माझे स्टिंग करण्यात आले, असा आरोप केला होता, त्याला मोरे यांनी आज उत्तर दिले.

तेजस मोरे म्हणाले की, प्रवीण चव्हाण यांना मी जुलै २०२१ पासून ओळखत आहे. मला एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते, त्या गुन्ह्यात त्यांनी मला जामीन मिळवून दिला होता. जामीन झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयात माझे जाणे-येणे होत होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की जबाबासंदर्भातील दोन-तीन ड्राफ्ट करायचे आहेत. माझे इंग्लिशवर कमांड नाही. तुझं इंग्लिश चांगलं असल्यामुळे तू मला ड्राफ्ट तयार करून दिले तर बरं होईल. त्याअनुषंगाने माझे त्यांच्या कार्यालयात जाणे-येणे वाढले. मात्र, ते कशाचे ड्राफ्ट तयार करत आहेत, हे त्यावेळी मला माहीत नव्हते. जसजसं मी ड्राफ्ट करायला लागलो, तसतसं मला समजायला लागले की रमेश कदम, बीएचआर बॅंक, रवींद्र बराटे किंवा गिरीश महाजन यांचे प्रकरण असो यासंदर्भातील वेगवेगळे जबाब तयार करून घ्यायचे. पोलिसांना पुरविण्यात येणारी माहितीही तेच पहायचे. हे सर्व ते माझ्याकडून करून घ्यायचे.

मला कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे ते काय करत आहेत, हे मला समजायचे नाही. मला वाटायचं की हे सरकारी वकिलाचे काम आहे. कारण, त्यांच्याकडे पोलिसांचे येणे-जाणे मोठ्या प्रमाणात असायचे. त्यामुळे त्याबाबतचे ज्ञान नसल्यामुळे मला त्यात गैर काही वाटायचे नाही. ते जे सांगायचे, ते मी करत जायचो. गिरीश महाजन यांच्यासंदर्भात जबाब देण्यासाठी जे साक्षीदार यायचे, त्यांचे जबाब हे चव्हाण करून घ्यायचे. ते जबाब देण्यासाठी मलाही पोलिस ठाण्यात चव्हाण पाठवायचे. पण ९ जानेवारी रोजी जो छापा टाकण्यात आला. त्यानंतर माझ्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली. सरकारी वकिल छापा टाकण्याचे मॅनेज करत आहेत आणि पोलिस त्यांचे ऐकतात, हे कसं काय, असा प्रश्न मला पडला, असे मोरे यांनी स्पष्ट केले.

पूर्वी बांधकाम व्यावसायिक असलेले तेजस मोरे म्हणाले की, माझे दोन-तीन वकील मित्र आहेत, त्यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर समजले की चव्हाण जे करत आहेत, ते चुकीचे आहे. त्यामुळे चव्हाण यांच्यापासून मी हळूहळू बाजूला होत गेलो.

गिरीश महाजन यांच्या प्रकरणातील फिर्यादी आणि प्रवीण चव्हाण यांच्यातील दुवा म्हणून माझा वापर करण्यात आला. सरकारी वकिल आणि फिर्यादी हे एकमेकांशी संपर्क साधू शकत नाहीत. त्यामुळे फिर्यादीला काही जबाब द्यायचे असतील, तर ते मला पाठवयाचे आणि ते मी चव्हाणांना द्यायचो. तसेच, चव्हाण यांचे काही संदेश मी फिर्यादीला द्यायचो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT