Sharad Pawar-Prafull Patel-Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Praful Patel on Ajit pawar : 'माझे अन॒ शरद पवारांचे संबंध किती गहन आहेत, हे कळायला अजितदादांना अनेक वर्षे लागतील'

माझे आणि अजित पवार यांचे संबंध निकटचे असणे काही चुकीचे आहे का?

सरकारनामा ब्यूरो

NCP News : माझे आणि शरद पवार यांचे संबंध किती गहन आहेत, हे अजित पवार यांना कळायला खूप वर्षे लागतील, असा विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केले. (It will take many years for AjitDada to know how deep my relationship with Sharad Pawar is : Praful Patel)

प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) म्हणाले की, माझे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे संबंध निकटचे असणे काही चुकीचे आहे का? माझे संबंध सगळ्यांबरोबर चांगले आहेत. इतर पक्षांतील लोकांसोबतसुद्धा माझे संबंध चांगले आहेत. राजकारण हा काही माझा व्यवसाय नाही, पण माझी ती फॅशन आहे, म्हणून राजकारणात आलो आहे. इतर पक्षातील लोकांबरोबर माझी मैत्री आहे. माझ्या पक्षातील सर्वांबरोबर माझे चांगले आहे. मी कुठल्याही गटातील नाही, त्यामुळेच पवार यांनी एवढी वर्षे माझ्यावर जबाबदाऱ्या दिल्या आहेत. कारण, प्रफुल्ल पटेल यांना काही सांगितल्यानंतर समोरच्या माणसाला वाटणार नाही की प्रफुल्ल पटेल हे अजेंडा घेऊन माझ्याकडे आले आहेत.

प्रदेशाध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंचे नाव सुचविले होते

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाबाबत बोलताना पटेल यांनी आणखी एक माहिती दिली. ते म्हणाले की, जेव्हा सुनील तटकरे यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमायची वेळ आली, तेव्हा मी स्वतः सुप्रिया सुळे यांचे नाव सुचविले होते. त्याबाबत मी शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा केली होती. मात्र, त्यावेळी सुळे यांनी आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघ आणि राष्ट्रीय पातळीवर लक्ष्य केंद्रीत करायचे आहे, असे सांगून प्रदेशाध्यक्ष होण्यास नकार दिला होता.

राष्ट्रवादीच्या २००४ मुख्यमंत्रीपदाच्या संधीबाबत प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, त्यावेळी जरी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आले असते तर अजित पवारच कशावरून मुख्यमंत्री बनले असते. त्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्रीही नव्हते. उपमुख्यमंत्री पहिले छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर. पाटील झाले, त्यानंतर अजितदादांचा नंबर लागला. त्यामुळे २००४ मध्ये अजित पवार थोडेच मुख्यमंत्री झाले असते.

आम्ही २००४ मध्ये मुख्यमंत्रिपद घ्यायला पाहिजे होते

शरद पवार आणि मलाही आज वाटतंय की त्यावेळी आम्ही २००४ मध्ये मुख्यमंत्रीपद घ्यायला हवे होते. आम्ही थोडं अजून ताणून धरलं असतं तर राष्ट्रवादीला मुख्यमंत्री मिळलं असतं. पण ‘यूपीए’मध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी आम्ही मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड केली. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपद घेतले असते तर आज आम्ही काँग्रेस आणि इतर पक्षाच्या फार पुढे गेलो असतो. कारण मुख्यमंत्रिपद हे सरकारचा चेहरा असतो, त्यामुळे मला आता तरी वाटतं की आम्ही फार पुढे गेलो असतो, असेही पटेल यांनी कबूल केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT