Mohol Politic's : मोहोळच्या धर्तीवर दुय्यम निबंध कार्यालय, सीना भोगावती जोड कालवा, अनगर आणि दहा गावांसाठी उपसा सिंचन योजना तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा ही माझी चार कामे मार्गी लावणाऱ्यांबरोबर आमची जाण्याची तयारी आहे. ही कामे मार्गे लावण्याची मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केली आहे, अशी माहिती मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी दिली. त्यामुळे माजी आमदार पाटील यांच्या भाजपच्या प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. (BJP MP meet former NCP MLA Rajan Patil)
माढ्याचे खासदार निंबाळकर (Ranjit Sinh Naik Nimbalkar) यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या अनगर येथील निवासस्थानी भेट दिली, त्यामुळे राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
दरम्यान, खासदार निंबाळकर यांना घर बांधावयाचे असून, आम्ही घर कसे बांधले आहे, हे पाहण्यासाठी ते आमच्याकडे आले होते, असे माजी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. तुमच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली काय? असे पाटील यांना विचारले असता त्यांनी नाही म्हणत ही भेट राजकीय नव्हती, असे स्पष्ट केले. मात्र, दोन नेत्यांच्या भेटीला राजकीय कंगोरा असतोच की, अशी गुगलीही पाटील यांनी टाकली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे २०० कोटींच्या अनगर आणि दहा गावे उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी सह्या करून प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पाठवला आहे, या योजनेच्या सर्वेसाठी सुमारे ९५ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. या योजनेमुळे अनगरसह परिसरातील गावांचे दहा हजार हेक्टर क्षेत्र बागायती होणार आहे, त्यामुळे ही योजना लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार निंबाळकर यांनी दिले आहे, असेही माजी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारचे सहा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचेही पाटील म्हणाले.
अनगर ही नगरपंचायत झाली आहे, त्यामुळे सोयी सुविधा वाढल्या आहेत. पाणी नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय हा दूध व्यवसाय आहे. तसेच साखर कारखाना, व्यापार व अन्य व्यवहार पाहता अनगरला स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा मागितली आहे. त्यासाठी 15 कोटी रुपयांच्या ठेवी व तीन हजार खातेदार देण्याची तयारी असल्याचेही पाटील यांनी सांगितले. सध्या सर्व व्यवहार ऑनलाइन असल्याने एका सक्षम बँकेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या विविध शासकीय दाखले, खरेदी-विक्रीचे व्यवहार, कर्ज प्रकरणे यासाठी वेळोवेळी मुद्रांकाची गरज भासते. नागरीकांना त्यासाठी सर्व कामे सोडून मोहोळला जावे लागते, तो त्रास कमी करण्यासाठी मोहोळच्या धर्तीवर अनगरमध्ये दुय्यम निबंध कार्यालयाची मागणी केल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सीना-भोगावती जोड कालवा ही तर आमची जुनी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. मला सत्तेशी काही घेणे देणे नाही. मी माझ्या मुलाला व मला काहीही मागितले नाही, जे मागितले ते सर्व सामान्यांसाठी व शेतकऱ्यांसाठीच मागितले आहे. त्यामुळे ही कामे मार्गी लावणाऱ्या सोबत जाण्याची आमची तयारी आहे, असा पुनरुच्चार माजी आमदार पाटील यांनी केला. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.