Congress News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन दिवस दिल्लीत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहेत. त्यामुळे काँग्रेसही राज्यात नेतृत्वाची भाकरी फिरवणार का, अशी चर्चा रंगली आहे. (Delhi visits of Congress leaders increased; Prithviraj Baba in Delhi today after Chavan, Patole)
काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना बदलणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत आहे. विदर्भातील काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळही दिल्लीत जाऊन हायकमांडला भेटले आहे. त्यानंतर अनेक घडामोडी प्रदेश काँग्रेसमध्ये घडत आहेत. विदर्भातील शिष्टमंडळाच्या भेटीनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे दिल्लीला गेले होते. त्यांना काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतची चर्चा सुरू झाली होती.
अशोक चव्हाण यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने दिल्लीला गेले होते. ते तब्बल दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून होते. त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली. ते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनाही भेटल्याचे सांगितले जाते. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी पुन्हा बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी बदलले जाणार आहेत, प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा केवळ माध्यमांमध्ये असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. याशिवाय प्रदेश काँग्रेस मोठे फेरबदल होणार आहेत. मात्र, ते माझ्या नेतृत्वाखाली होतील, असे विधानही केले होते.
दरम्यान, अशोक चव्हाण, नाना पटोले यांच्यानंतर आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत जे सुरू आहे, त्याबाबत चव्हाण हे वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत काँग्रेसमध्ये पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये सध्या नव्या प्रदेशाध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातूनच राज्यातील काँग्रेस नेत्यांचे दिल्ली दौरे वाढल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.