Nana Patole-Sanjay Raut-Jayant Patil Sarkarnama
विशेष

Jayant Patil : महाविकास आघाडी सरकारमध्ये जयंत पाटील असणार अर्थमंत्री; दोन नेत्यांनी भाषणातून दिले संकेत

Mahavikas Aghadi Melava : महाविकास आघाडीचे सरकार आले तर राज्याचा आर्थिक गाडा हाकण्याचे काम जयंत पाटील यांना करावे लागण्याची शक्यता आजच्या भाषणातून स्पष्टपणे जाणवली.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 16 August : महाविकास आघाडीचा आज मुंबईत संयुक्त मेळावा झाला. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा दावा केला. तो करताना असे काही उल्लेख केले की महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले तर अर्थमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जाईल, असे स्पष्ट संकेत दिले.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आले तर राज्याचा आर्थिक गाडा हाकण्याचे काम जयंत पाटील (Jayant Patil) यांना करावे लागण्याची शक्यता आजच्या भाषणातून स्पष्टपणे जाणवली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीतील पक्षांचा संयुक्त मेळावा झाला. त्यात संजय राऊत (Sanjay Raut) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी जयंत पाटील यांच्या अर्थमंत्रिपदाचे संकेत दिले.

महाराष्ट्रातील जनतेबरोबरच नातं आपलं पैशाच्या पलीकडचं आहे. उद्या सत्ता आपली येणारच आहे. अर्थमंत्री आपला होणारच आहे. सध्या राज्याच्या तिजोरीत पैसे नसले तरी ते कसे आणावेत, हे जयंतराव पाटलांना चांगले माहिती आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलेले आहे, असे विधान केले.

आमच्याकडे पैसा निश्चितपणे येईल. लाडकी बहिण योजनेतून महिलांना पंधराशे रुपये देण्यात येत आहेत. त्या योजनेची रक्कम तीन हजार रुपये होईल, पाच हजार होईल, असे सांगितले. ते सांगताना महाविकास आघाडीची एटीएम मशीन मागे बसलेली आहे, असे विधान जयंत पाटील यांच्याकडे पाहत संजय राऊत यांनी केले.

नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर काय करणार हे सांगितले. मात्र, त्याबाबतचा आर्थिक भार मात्र जयंतरावांच्या डोक्यावर दिला. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. त्या वेळी नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र, कोरोनामुळे ते द्यायचे राहिले आहेत.

महायुती सरकारनेही नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रोत्साहनापर अनुदान दिले नाहीत. मात्र, जयंतराव आपले सरकार आल्यावर आपल्याला ते द्यायचे आहेत. सध्याचे सरकार काही देणार नाही. पण, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान आपण देऊ, असे सांगत पुन्हा जयंत पाटील यांच्यावर आर्थिक भार टाकण्याचे काम नाना पटोले यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT