Maharashtra Lok Sabha 2024 Result Analysis Sarkarnama
विशेष

Lok Sabha Election Result News : वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याने कुणाला दाखवली 'दिल्ली'; कुणाला बसवलं घरी!

Lok Sabha Election 2024 News : लोकसभा निवडणुकीत टक्का वाढलेल्या, कमी झालेल्या मतदारसंघाचे चित्र पहिले तर टक्केवारी वाढलेल्या मतदारसंघात 22 पैकी 18 मतदारसंघात मतदारांनी नव्यांना संधी दिली.

Sachin Waghmare

Loksabha Election Result 2024 News : 2019 च्या तुलनेत राज्यातील जवळपास 22 मतदारसंघातील मतदानात वाढ झाली होती तर 26 मतदारसंघातील टक्केवारी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घसरली. त्यामुळे काही ठिकाणी वाढलेला टक्का व काही ठिकाणी कमी झालेला टक्का कोणच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळे सर्वांचेच लक्ष निवडणूक निकालाकडे लागले होते.

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) मतमोजणी 4 जूनला पार पडल्यानंतर निवडणुकीत टक्का वाढलेल्या, कमी झालेल्या मतदारसंघाचे चित्र पहिले तर टक्केवारी वाढलेल्या 22 पैकी 18 मतदारसंघात मतदारांनी नव्यांना संधी दिली तर चार ठिकाणी जुनेच खासदार निवडून आले. मतदानाची टक्केवारी कमी झालेल्या 26 पैकी जवळपास आठ ठिकाणी जुनेच खासदार निवडले आहेत तर 18 जागी नव्यांना संधी दिली. ( Lok Sabha Election Result News )

2019 च्या तुलनेत टक्केवारी वाढलेल्या 22 पैकी 18 मतदारसंघात मतदारांनी नव्यांना संधी दिली. त्यामध्ये चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या (Congress) प्रतिभा धानोरकर, वर्धामध्ये राष्ट्रवादीचे अमर काळे, अकोलामध्ये भाजपचे अनुप धोत्रे, अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे, यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख, सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, सातारामध्ये भाजपचे उदयनराजे भोसले, कोल्हापूरमध्ये शाहू महाराज, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे, लातूरमध्ये काँग्रेसचे शिवाजी काळंगे, नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी, जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ, जालनामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे, पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ, अहमदनगरमध्ये शरद पवार गटाचे निलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनवणे, भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे, ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के हे नवे चेहेरे पहिल्यांदाच निवडून आले.

मतदानाचा टक्का वाढूनही या चार मतदारसंघाने जुन्या चेहऱ्यांनाच पसंती दिली आहे. कल्याणमध्ये शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांनी तर रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे यांनी हॅट्ट्रिक केली तर उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर, हातकणंगलेमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे धैर्यशील माने हे दोन चेहरे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी कमी झालेल्या 26 मतदारसंघापैकी जवळपास आठ ठिकाणी जुन्याच चेहऱ्यांना मतदारांनी संधी दिल्याचे दिसत आहे. यामध्ये बारामतीत शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या सुप्रिया सुळे, नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी, मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे, शिरूरमध्ये शरद पवार गटाचे अमोल कोल्हे, परभणीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव, मुंबई दक्षिण-मध्यमध्ये अरविंद सावंत, बुलढाणामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रताप जाधव, रायगडमध्ये सुनील तटकरे हे जुनेच चेहरे निवडून आले आहेत.

मतदानाची टक्केवारी कमी झालेल्या 26 मतदारसंघापैकी जवळपास अठरा मतदारसंघात नवीन खासदारांना संधी दिली आहे. त्यामध्ये भंडारा-गोंदियामध्ये काँग्रेसचे प्रशांत पडोळे, गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान, रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर, नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण, माढामध्ये शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील, सांगलीत अपक्ष विशाल पाटील, औरंगाबाद शिंदे गटाचे संदीपान भुमरे, शिर्डीत ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, धुळेमध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छाव, दिंडोरीमध्ये शरद पवार गटाचे भास्कर भगरे, नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा, मुंबई दक्षिण मध्यमध्ये ठाकरे गटाचे अनिल देसाई, मुंबई उत्तर पूर्वमध्ये ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, मुंबई उत्तर मध्यमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, मुंबई उत्तरमध्ये भाजपचे (BJP) पीयूष गोयल, मुंबई उत्तर पश्चिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT