Women MLA Sarkarnama
विशेष

Maharashtra Election Result : राज्यात 'लाडक्या बहिणी'ने आणली महायुतीची लाट, मात्र महिला आमदारांच्या संख्येत घट

Political News : गेल्या निवडणुकीत 49 महिला उमेदवारांमधून 24 महिला आमदार झाल्या होत्या. या निवडणुकीत 250 महिला निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, 250 पैकी फक्त 21 महिला उमेदवार विजयी झाल्या. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक महिला आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या मताच्या जोरावर महायुतीने बाजी मारली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महिला उमेदवारांना संधी देण्यात आली होती. मात्र 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत महिला उमेदवाराची संख्या वाढली असली तरी निवडून येणाऱ्या महिला आमदारांचा टक्का घसरला आहे. गेल्या निवडणुकीत 49 महिला उमेदवारांमधून 24 महिला आमदार झाल्या होत्या. या निवडणुकीत 250 महिला निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, 250 पैकी फक्त 21 महिला उमेदवार विजयी झाल्या. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक महिला आहेत.

एकीकडे राज्यात लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळालेला असताना दुसरीकडे महिला उमेदवारांनाच नाकारल्याचे चित्र आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी 250 च्या जवळपास महिला उमेदवार होत्या. म्हणजेच एकूण उमेदवाराच्या सहा ते सात टक्केच महिलांना संधी मिळाली. मतमोजणीत 250 पैकी फक्त 21 महिला उमेदवार विजयी ठरल्या. (Maharashtra Election Result )

विजयी झालेल्या या महिला आमदारात भाजपच्या (BJP) 14 महिला उमेदवार जिंकून आल्या असून यामध्ये 10 उमेदवारांचा पुन्हा विजय झाला आहे. यामध्ये चिखलीतील श्वेता महाले, जिंतूरमधून मेघना बोर्डिकर (Meghana Bordikar), नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, दहीसरमधून मनीषा चौधरी, गोरेगाव येथून विद्या ठाकूर, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, शेवगावमधून मोनिका राजळे आणि केजमधून नमिता मुदंडा यांचा समावेश आहे.

भोकरमधील श्रीजया चव्हाण, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, वसईममधून स्नेहा पंडित, फुलांब्रीमधून अनुराधा चव्हाण या नव्या महिला उमेदवारांनीही यंदा विजय मिळवला. त्याशिवाय शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या पक्षाकडून साक्रीतून मंजुळा गावित, कन्नडमधून संजना जाधव या शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या पक्षातून निवडून आल्या.

महायुतीकडून 20 महिला आमदार विजयी झाल्या तर महाविकास आघाडीकडून एकच महिला आमदार विजयी झाली. त्यामध्ये धारावीतून काँग्रेसच्या शोभा गायकवाड विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून चार महिला आमदार झाल्या आहेत. सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली) आणि अनुशक्तीनगरमधून सना मलिक तर, श्रीवर्धमधून आदिती तटकरे यांचा विजय झाला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून दहा महिला उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी दिली होती. परंतु, त्यातील एकही महिला उमेदवाराचा विजय झाला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT