लक्ष्मण सोपान हाके. महाराष्ट्राला हळू हळू त्यांची ओळख ओबीसी नेते म्हणून व्हायला लागली आहे. ओबीसी समाजाचा नवा चेहरा ते बनू पाहत आहेत. उपोषण, आंदोलन, मोर्चा, सभा, भाषण अशा विविध मार्गांमधून ते ओबीसी समाजाचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नात हाकेंच्या रडारवर सध्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार.
मागील काही दिवसांपासून हाके अजित पवार यांच्यावर अत्यंत जहाल शब्दांत टीका करत आहेत. अजित पवार यांना सत्तेसाठी आचार विचार काहीच नाही. पैसा कमावणे हाच अजित पवारांचा एकमेव उद्देश आहे. महाजातीयवादी आहेत, दरोडेखोर आहेत. त्यांनी ओबीसींचे वसतीगृह नाकारले आहे. ओबीसींच्या पोरांना फेलोशिप नाकारली. शोषित, वंचितांना निधी नाकारला, अशी टीका हाके करत आहेत.
या टीकांमुळे हाके यांना कायदेशीर नोटीस बजावून माफी मागावी असे सांगण्यात आले. पण हाके यांनी माफी तर लांबच पण मी ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी अजित पवार यांना रोज शंभर शिव्या देणार आहे. ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य होत नाही, तोवर आम्ही दिवसाला शेकडो शिव्या देणार असे त्यांनी सांगितले. तसेच ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी जीव गेला तरी बेहत्तर असंही हाके यांनी म्हंटलं आहे.
एका बाजूला हाके लढत असले, राजकीय नेत्यांना आव्हान देत असले तरीही निवडणुकीच्या मैदानात हाके यांना एकदाही यश आलेले नाही. हाके यांनी 2014 मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उडी घेतली होती. सुरुवातीला त्यांनी आक्रमकपणे प्रचार सुरु केला. पण काहीच दिवसांत त्यांनी गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला. पण अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने त्यांचा अर्ज कायम राहिला.
2014 च्या निवडणुकीत हाके यांना 527 मते पडली. ते 8 व्या क्रमांकावर राहिले. तर 94 हजार 374 मते मिळवून गणपतराव देशमुख विजयी झाले होते. 69 हजार 150 मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील दुसऱ्या स्थानी राहिले. त्यानंतर 2019 साली हाके यांनी बहुजन विकास आघाडीकडून निवडणूक लढवली.
त्यात शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत यांनी शेकापकडून जोरदार आव्हान दिले होते. दोघांमध्ये मतांचा फारसा फरक नव्हता. शहाजीबापूंना 99 हजार 464 तर देशमुख यांना 98,696 मते मिळाले. शहाजी पाटील हे केवळ 768 च्या मताधिक्याने विजयी झाले होते. लक्ष्मण हाके हे 19 व्या क्रमांकावर राहत त्यांना 267 मते मिळाली होती.
शिवसेनेतील फुटीनंतर लक्ष्मण हाके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यावेळी शहाजीबापू पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके असा लढा रंगणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली.
पण महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मिळाला. त्यामुळे हाके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. अखेर त्यांनी निवडणूक अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना यश मिळाले नाही. डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. हाके यांना अवघी 5134 मते मिळाली.
या मिळालेल्या मतांबाबत लक्ष्मण हाके म्हणतात, प्रचाराला पैसे नाही तर मते कशी मिळणार? महात्मा फुले, आंबेडकर यांना तरी लोकांनी कुठे निवडून दिले होते? पण त्यांनी समाजाला न्याय दिलाच. त्यामुळे मीही सामाजिक कार्याच्या मार्गावर निघालो. एकदा आमदार अमोल मिटकरी यांनीही हाके यांच्यावर मिळालेल्या मतांवरून टीका केली होती. त्यावेळी अजित पवार यांचा पोरगा निवडणुकीत पडला, मग त्याच्या मतांवरुन त्याची लायकी शोधायची का? असा सवाल केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.