Mahayuti Government Sarkarnama
विशेष

Mahamandal appointments Maharashtra: महायुतीमधील महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजप, शिंदे शिवसेनेच्या आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच !

Mahayuti formula 2025 News : महायुतीमधील तीन मित्रपक्षांत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला चर्चेनंतर ठरला आहे. त्यानंतर आता काही महामंडळासाठी शिवसेना व भाजप आमदारांमध्ये जोरदार चढाओढ दिसत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात आठ महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पाहवयास मिळत आहे. सुरुवातीपासून या तीन मित्रपक्षात खातेवाटप, मंत्रीपदे, पालकमंत्री पद व निधी वाटपावरून नाराजी दिसून आली. त्यानंतर आता मंत्रीपदे मिळाली नसल्याने नाराज असलेल्या आमदारांची वर्णी महामंडळावर लावली जाणार आहे. महायुतीमधील तीन मित्रपक्षांत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला चर्चेनंतर ठरला आहे. त्यानंतर आता काही महामंडळासाठी शिवसेना व भाजप आमदारांमध्ये जोरदार चढाओढ दिसत आहे.

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीपूर्वी राज्यातील महामंडळाची नियुक्ती करून नाराज असलेल्या नेते व पदाधिकाऱ्यांची मर्जी दूर करण्याचा प्रयत्न असणार आहे. महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीवेळी राज्यात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांनी महामंडळ वाटपाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिले असून, समन्वय समितीत यावर जवळपास एकमत झाले आहे.

सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्षात मंत्रीपदाची वाट पाहणाऱ्या आणि मंत्रीपदाने हुलकावणी दिलेल्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदाची ऑफर देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा विचार करता, महायुतीतील नाराज आमदारांचा रोष वाढू नये यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे म्हटले जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांतील नाराज आमदारांनी महामंडळ अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. बुधवारी रात्री, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी महायुतीच्या समन्यवय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेकडून शंभूराजे देसाई, उदय सामंत, तर भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ आदींची उपस्थिती होती. महायुतीच्या समन्वय समितीची आठवड्यातील ही दुसरी बैठक होती.

मुंबई आणि एमएमआर भागातील प्रमुख महामंडळांच्या अध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, एमटीडीसी अशा प्रभावी महामंडळांच्या अध्यक्षपदावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीमधील शिवसेना व भाजप (Bjp) आमदार हे महत्त्वाचे महामंडळ मिळावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT