Jayant Patil  Sarkarnama
विशेष

Maratha Reservation : 'मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरंच सांगतात अन्‌ मंत्री आता वेगळंच बोलताहेत...'

Vijaykumar Dudhale

Beed News : मराठा आरक्षणावर सरकारचं एकमत झालेलं दिसत नाही किंवा दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. काही लोकांनी मराठा समाजाकडून बोलायचं, तर काहींनी ओबीसींच्या बाजूने बोलायचं, असं काही आहे का, हे तपासलं पाहिजे. मराठा आरक्षणावरून सरकारने एकमत केलं पाहिजे. मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरंच बोलतात आणि आता मंत्री वेगळं बोलायला लागले आहेत. सरकारने याबाबत एकमत केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मराठा आणि ओबीसींमधील वादावर दिली. (Maratha reservation : CM says one thing, DCM says another and now ministers are talking differently : Jayant Patil)

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून कुणबी दाखला देण्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला आहे. त्यावरून राज्यात मराठा विरोधात ओबीसी असा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बीडच्या दौऱ्यावर आलेले जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन समाजामध्ये वाद होऊ नयेत, ही आमची पूर्वीपासूनची भूमिका आहे. कटुता निर्माण होऊ नये, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाटते. ज्यांना आरक्षण मिळत आहे, त्यामुळे इतर समाजात कटुता निर्माण होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यायला हवी. सरकार कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देतं, हे आपण पाहायचं. काय निर्णय घ्यायचा, हे सरकारने ठरवावं, अशी मार्मिक टिप्पणीही पाटील यांनी केली.

मराठा आणि ओबीसीमध्ये तणाव निर्माण होऊ नये. कुणाच्याही अडचणी न वाढता मराठ्यांना आरक्षण द्यायला हवं. मंत्र्यांच्या वक्तव्यावरून सरकारमध्ये या विषयावर एकमत आहे, असे दिसत नाही. ज्येष्ठ मंत्र्यांच्या भूमिकेवर आम्ही बोलणार नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी या विषयावरील धोरण स्पष्ट करणे आवश्यक आहे, असा सल्लाही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

मराठा-ओबीसी वादावर मध्यस्थी करण्याबाबत कोणीही आमच्याशी चर्चा केली नाही. त्यामुळे या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेतंय, हे आम्ही पाहत आहोत, असेही पाटील यांनी नमूद केले.

ग्रामपंचायत निकालाचा परिणाम होणार नाही

ग्रामपंचायत निवडणुकीतील अजित पवार गटाच्या यशाबद्दल जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते हे आमदारांमुळे काम करत असतात. पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत नाहीत. मात्र, आम्ही मानतो की, आमदारांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे तो या पक्षाचा आहे, हा त्या पक्षाचा आहे. पण, ग्रामपंचायतींच्या निकालाचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार नाही. कारण, येणारी निवडणूक ही लोकसभेची आहे. ग्रामपंचायत आणि लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फरक असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT