Shahaji Patil Sarkarnama
विशेष

Shahajibapu Patil News : शहाजीबापूंनाही पडू लागली मंत्रिपदाची स्वप्नं; ‘मी शहाजी राजाराम पाटील...अशी शपथ घेऊनच झोपतो’

Vijaykumar Dudhale

Solapur News : स्वप्नं अनेकाला पडत असतात. मलाही स्वप्नं पडतात. उत्तमराव जानकर, सदाभाऊ खोत यांनाही स्वप्न आहे. आता गुवाहाटीवरून आल्यापासून ‘कधी मंत्री होईन’ म्हणून रात्रभर स्वप्न बघतो. कधी कधी झोपेतून उठतो. ‘मी शहाजी राजाराम पाटील...या राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेतो की...’ असे म्हणतो आणि झोपतो, अशा शब्दांत आमदार शहाजी पाटील यांनी मंत्रिपदाची इच्छा सर्वांसमोर बोलून दाखवली. (MLA Shahaji Patil also began to dream of becoming a minister)

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नातेपुते येथे दीपावली स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात बोलताना शहाजीबापूंनी मंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले. त्यात त्यांनी मोहिते पाटील यांच्या खासदारकी लढण्याच्या निर्धारावरही अप्रत्यक्षपणे भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनेकांना खासदार होण्याची स्वप्नं पडतात, हे चुकीचे नाही. सगळ्यांनी स्वप्नं बघावीत, त्यात काही अडचण नाही. पण ज्या माणसाने पाच वर्षे रात्रंदिवस काम केलं आहे, त्याच्या पाठीशी उभे राहणे जनतेचे आणि सर्व नेतेमंडळींचे कर्तव्य आहे. स्वप्नं सगळ्यांनी बघावीत, पक्ष निर्णय घेणार आहेत, असेही पाटील यांनी लोकसभा उमेदवारीवर भाष्य केले.

शहाजीबापू म्हणाले की, रणजितदादा, उत्तमराव जानकर, मी आम्ही सर्व काँग्रेसच्या विचाराचे. सर्वजण एकमेकांच्या विरोधात लढायचो. पण, हा भाजप आहे. या भाजपचं वेगळं काम आहे. तिरकं वागलेले कळलं, तर यादी दिल्लीत लागते. एकदा गडी ब्लॅकलिस्टला गेला तर मेलं तर पुन्हा काही मिळत नाही. त्यापेक्षा चाललंय ते चालू द्यायचं.

आज सांगोला बारामतीपेक्षा सुकाळी

दुष्काळी भागाच्या पाण्यासाठी हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी ४० ते ४५ वर्षांपूर्वी चळवळ उभा केली. ‘कृष्णा खोरे’च्या निर्मितीनंतर पहिले अध्यक्षपद निंबाळकरांना मिळाले होते. आमच्या सांगोला तालुक्यासाठी आठ टीएमसी पाणी आलं आहे. माझ्या तालुक्याला बारामतीपेक्षा जास्त पाणी मिळालं आहे. सांगोला बारामतीपेक्षा सुकाळी आणि हिरवागार झाला आहे, असेही आमदार पाटील यांनी मनातील गोष्ट सांगून टाकली आहे.

संदीपान थोरात निवडून आल्यावर पुन्हा अर्ज भरायलाच यायचे

पूर्वीच्या पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून संदीपान थोरात हे सलग ३५ वर्षे खासदार म्हणून निवडून आले, त्यांनी तो विक्रम केला. माणूस अत्यंत सज्जन होता. निवडून आल्यानंतर पाच वर्षे मतदारसंघाच्या मातीला पाय लावत नव्हते. पण, पुन्हा अर्ज भरायलाच यायचे. तुमच्या कामात अडथळे नको म्हणून मी येत नाही, असे ते एकदा विजयसिंह मोहिते पाटील यांना म्हणाले होते, अशी आठवणही आमदार शहाजी पाटील यांनी सांगितली.

शरद पवार पुन्हा माढ्यात आलेच नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही शहाजी पाटील यांनी टीका केली. अकलूजच्या सभेत त्यांनी ‘माढ्याचा पाणीप्रश्न मिटवेन, तर मी पुन्हा या ठिकाणी येईन’ असे सांगितले होते. पवार कधी खोटे बोलत नाहीत. ज्याप्रमाणे त्यांनी मी पुन्हा माढ्यात येणार नाही, असे सांगितले होते, त्याप्रमाणे ते पुन्हा आलेच नाहीत. पण, त्यांनी सदाभाऊ खोत यांच्याशी लढायला लावलं. खोत यांची वावटळ एवढी मोठी होती की, त्यात विजयदादा उमेदवार. पण कसेबसे विजयदादा निवडून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT