Pargaon News : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीच्या ग्रामस्थांनी कमालच केली आहे. राज्यात ज्या प्रमाणे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्याप्रमाणे एक सरपंच आणि दोन उपसरपंच निवडले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता द्यावी, अशी विनंतीही सरपंच आणि सर्व सदस्यांनी अर्जाद्वारे केली आहे. (Deputy Sarpanch Election : Jarkarwadi in Ambegaon elected two Upsarpanches; Resolution sent to Collector)
आता खरी कसोटी ही जिल्हाधिकारी आणि निवडणूक यंत्रणेची असणार आहे. कारण, राज्यातील हे बहुधा पहिलेच उदाहरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन उपसरपंचांना जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून मान्यता मिळते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. तशी मान्यता मिळाल्यास राज्यात तो मैलाचा दगड ठरला जाईल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आंबेगाव तालुक्यात सध्या उपसरपंचांच्या निवडी सुरू आहेत. बहुतांश ठिकाणी बिनविरोधची परंपरा जपली जात आहे. त्याच प्रमाणे जारकरवाडीत सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कौसल्या संतोष भोजणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर सर्व सदस्यांनी एकमताने ‘उपसरपंचपदी आणखी एक सदस्य सचिन बापू टाव्हारे यांची निवड करत आहोत’, असा ठराव केला. हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे, त्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश लबडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भक्ती-शक्ती पॅनेलचे सरपंचपदासह सर्व दहा ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले होते. एक जागा रिक्त राहिली होती. उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी सरपंच प्रतीक्षा बढेकर यांच्यासह सदस्य सचिन टाव्हरे, सुरेश एकनाथ मंचरे, सुभाष पिराजी लबडे, श्रावण बबन काकडे, श्याम मल्हारी बढेकर, पुष्पा शिवाजी जारकड, सुवर्णा एकनाथ भांड, अलका कैलास कापडी, रुपाली शिवाजी कजबे उपस्थित होते.
सुरुवातीला कौसल्या भोजणे यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी राज्यात ज्या पद्धतीने दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्या प्रमाणे दोन उपसरपंचांच्या नावाला मान्यता द्यावी, असा ठराव जिल्हाधिकारी यांना पाठविले. दुसरे उपसरपंच म्हणून सचिन टाव्हारे यांची निवड करण्यात आली आहे.
कौसल्या भोजणे यांची उपसरपंचपदी निवड ही नियमाप्रमाणे झाली आहे. पण, त्यानंतर सरपंच आणि सदस्यांनी एक स्वतंत्र ठराव करून सचिन टाव्हरे यांच्या नावालाही मान्यता द्यावी, असा अर्ज जिल्हाधिकारी यांच्या नावाने पाठविला आहे. तो अर्ज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे, असे निवडणूक सचिव तथा ग्रामसेवक तुकाराम मोरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.