NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मूळ पक्ष अशी मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दिल्ली विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. आमदार निवडून येण्यापेक्षा पक्षाला एका ठरावीक निकषांएवढे मतदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यात कितपत यश मिळते हे दिल्ली निवडणुकीनंतरच समजणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून फारकत घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपशी जवळीक करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा त्यांचा दावा अटी, शर्तींवर मान्य करत शरद पवार यांच्या पक्षाला धक्का दिला होता.
तत्पूर्वीच आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेत एक धक्का देण्याचे काम केले होतेच. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेत आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा एप्रिल २०२३ मध्ये दिला होता. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार यांच्या पक्षाच्या विरोधात न्यायालयात आव्हान दिल्याने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला मिळालेले घड्याळ हे चिन्ह अटीशर्तीवर वापरण्यास परवानगी दिलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर नागालॅंडमध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत चार जागा मिळाल्या होत्या. पण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकून राहण्यासाठी ज्या तीन अटींची पूर्तता करावी लागते, ती पूर्ण न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. निवडणूक चिन्ह कायदा १९६८ नुसार त्यांनी हा निर्णय घेतला होता.
महाराष्ट्रातील विधानसभा चांगल्या मतांनी जिंकल्यानंतर आता अजित पवार यांनी आपल्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी दिली विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी २५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाला लोकसभेतील किमान दोन टक्के जागा तीन वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात. त्याचबरोबर लोकसभेत चार खासदार असावेत. शिवाय चार राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळालेली असावीत. त्याचबरोबर किमान चार राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा.
या तीनपैकी एका निकषाची पूर्तता केली, तरी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने दोनच राज्यातून जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा झारखंड विधानसभेत एक आमदार आहे, केरळ विधानसभेत दोन आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या नागालॅंडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार आमदार आले आहेत. नागालँडमध्ये चार विधानसभेच्या जागा मिळाल्या असल्या तरी चार राज्यांमध्ये किमान सहा टक्के मते मिळालेली असण्याचा निकष पूर्ण झाला नाही. यामुळे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला.
राष्ट्रीय पक्षाला मिळणारे फायदे
एखाद्या पक्षाला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून दर्जा मिळाल्यानंतर त्याला काही फायदेसुद्धा मिळतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे, ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता असलेल्या पक्षाला देशभरात कुठेही निवडणूक लढवताना एकच राखीव चिन्ह मिळते. राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या पक्षाला निवडणूक आयोग मतदारांची अपडेटेड यादी निवडणुकांपूर्वी पुरवते, तसेच या पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरताना एकाच अनुमोदकाची आवश्यकता असते.
राष्ट्रीय पक्षाला स्टार प्रचारकांची यादी काढण्याची मुभा असते. या यादीत जास्तीत जास्त ४० नेत्यांचा समावेश केला जाऊ शकतो आणि या प्रचारकांच्या प्रवासाचा खर्च उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या खर्चात मोजला जात नाही. सर्वात मोठा फायदा म्हणजे पक्षाच्या कार्यालयासाठी सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन मिळवता येऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मूळ पक्ष अशी मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी दिल्ली विधानसभा निवडणूक महत्वाची आहे. आमदार निवडून येण्यापेक्षा पक्षाला एका ठराविक निकषांएवढे मतदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाचा प्रयत्न सुरु आहे. मात्र त्यात कितपत यश मिळते हे दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीतच समजणार आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.