Jagdish Mulik-Sunil Tingre-Prashant Jagtap Sarkarnama
विशेष

भाजपचे शहराध्यक्ष मुळीकांना राष्ट्रवादीच्या जगताप-टिंगरेंचा मतदारसंघातच दणका!

वडगाव शेरीमधील भाजप नगरसेविकेच्या पतीला फोडून जगदीश मुळीकांना राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप-सुनील टिंगरेंचा धक्का

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी भाजपचे जवळपास १६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्याला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा भाजपत होणार प्रवेश रोखून दाखवा, असे आव्हान दिले होते. मात्र, आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) आणि जगताप यांनी मुळीक यांना त्यांच्याच मतदारसंघात मात दिली असून फुलेनगर-विश्रांतवाडीच्या नगरसेविकेच्या पतीला राष्ट्रवादीत आणले आहे. (NCP's Prashant Jagtap-Sunil Tingre answer to BJP's Jagdish Mulik's challenge in Wadgaon Sheri)

फुले नगर-विश्रांतवाडी भागातील प्रभाग क्रमांक दोनच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका शीतल अजय सावंत यांचे पती अजय सावंत यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अजय सावंत यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे शहराध्यक्ष जगताप यांनी केलेल्या दाव्याला दुजोरा मिळताना दिसत आहे. पुणे महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असूनही पक्षाच्याच नगरसेवकाला न्याय मिळत नाही, विकास कामासाठी निधी मिळत नाही,  त्यामुळे मी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे अजय सावंत यांनी राष्ट्रवादी प्रवेशानंतर सांगितले.

दरम्यान, वडगाव शेरी मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपत गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यातील काहींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेटही घेतली आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार वडगाव शेरीतून या निवडणुकीत २७ नगरसेवक निवडून येणार आहेत. संख्याबळ वाढविण्यासाठी राष्ट्रवादीने वडगाव शेरीत प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच भाजपचे सहा नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यातील तीन नगरसेवक राष्ट्रवादीत जाऊ शकतात. हा मतदारसंघ भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा असल्याने तेथे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ते काय डावपेच आखतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

काय म्हणाले होते प्रशांत जगताप?

नवी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केली होती. स्वबळावर आम्ही १२२ जागा जिंकू, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांना भाजपतील १६ नगरसेवकांनी फोन केला होता. हे सर्व नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असेही त्यांनी सांगितले होते.

मुळीकांनी जगतापांना काय आव्हान दिले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना आक्षेपार्ह आणि चुकीची विधाने करण्याची जुनी सवय आहे आणि त्यातूनच प्रसिद्धी मिळवण्याची त्यांची पद्धत आहे. पण, केवळ प्रसिद्धी मिळवून निवडणुका जिंकता येत नाहीत. भाजपच्या १६ नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत जगताप जे बोलत आहेत, मी त्यांना आव्हान देतो की, तुमचे जे ४०-४४ नगरसेवक आहेत, त्यांचा भाजपमध्ये होणारा प्रवेश अगोदर थांबवा आणि त्यानंतरच तुम्ही भाजपच्या नगरसेवकांबद्दल बोला, असे आव्हान भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जगताप यांना दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT