Maharashtra Political News : कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे बंधू सध्या राज्यात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहेत. ज्या निलेश घायवळच्या पोलिसांनी मुसक्या आवळायला हव्या होत्या, तो राजकीय पाठबळ, 'खाकी वर्दी'अन् पासपोर्ट ऑफिसच्या 'कामगिरी'वर बोट ठेवून परदेशात आरामशीर पळाला.
निलेशच्या पळून जाण्यावरून उठलेलं वादळ घोंघावत असतानाच भाऊ सचिन घायवळचा नवा कारनामा समोर आला. लाखो रुपयांची वाहतूक करण्यासाठी त्याने शस्त्र परवान्याचा अर्ज केला. पुणे पोलिसांनी हा अर्ज नामंजूर केला, पण सचिन घायवळने थेट गृहमंत्रालयातून हा अर्ज मंजूर करवून आणला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवान्याचा अर्ज मंजूर केला.
ही बातमी बाहेर येताच आधीच बदनाम झालेले राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन आणखी बदनाम झाले. योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या धाकावर पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नचिन्ह उभे झाले. एकूणच या घायवळ बंधूंनी पोलिसांपासून राजकारण्यापर्यंतची यंत्रणा कशी मॅनेज केलीय, याची प्रचिती या दोन्ही घटनांमधून येऊ शकते.
पण घायवळ बंधूंमुळे वादात सापडलेले पुण्याचे पोलीस आयुक्त आणि योगेश कदम हे दोनच चेहरे नाहीत. निलेश घायवळने स्वित्झर्लंडमध्ये आणि सचिन घायवळने पुण्यात बसून महाराष्ट्राचे राजकारण कोकणापासून मराठवाड्यापर्यंत हादरवून टाकले आहे. योगेश कदम यांच्यासह जवळपास 8 नेते घायवळ बंधूंमुळे वादात सापडले आहेत.
निलेश घायवळने बनावट कादगपत्र वापरून, आडनावत मोड-तोड करून पासपोर्टसाठी अर्ज केला. सर्वसामान्यांच्या कागदपत्रांमध्ये थोडी जरी त्रुटी राहिली तरी पासपोर्ट ऑफिसमधूनच अर्ज नाकारला जातो. मग घायवळचा अर्ज मंजूर कसा झाला? त्याच्या कागदपत्रांची नीट तपासणी झाली नाही का? असा सवाल आता विचारला जातो.
घायवळने पासपोर्टसाठी अहिल्यानगरचा पत्ता दिला. व्हेरिफिकेशनसाठी पोलीस त्या पत्त्यावर गेले तेव्हा तिथे कोणीही नव्हते. मग पोलिसांनी Not Available असा अहवाल पाठवून दिला. पण पोलिसांना नाव वाचल्यानंतर हा व्यक्ती कोण असावा, हे लक्षात आले नाही का? 'मकोका' आणि इतर असे 23 ते 25 गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाच्या नावाबाबत पोलीस एवढे अनभिज्ञ होते का?
यानंतर वादात सापडले ते पुण्याचे पोलीस आयुक्त. एवढे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या निलेश घायवळला आधीच अटक का केली नाही? अटक न करण्यासाठी कोणाचा दबाव होता का? मकोकासारखा गुन्हा दाखल असूनही एवढ्या सहज त्याला जामीन कसे मिळाला? पोलिसांची एवढी कृपादृष्टी कशासाठी? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
यानंतर घायवळ बंधूंनी अडचणीत आणलेल्यांची नावे राजकीय आहेत. यात मंत्र्यांपासून आमदारांपर्यंत सगळ्यांची नावे आहेत.
सुरुवातीला राम शिंदे जे विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांच्यासोबतचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये गुंड निलेश घायवळ हा एका कार्यक्रमाला आल्याचं दिसतंय, आल्या आल्या घायवळ हा राम शिंदे यांच्या पाया देखील पडतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेवून गंभीर आरोप केले.
रोहित पवार यांच्या आरोपानुसार, घायवळ हा राम शिंदे यांच्या जवळचा व्यक्ती आहे, शिंदेंनी घायवळचा निवडणुकीसाठी वापर करून घेतला. घायवळला शस्त्र परवाना हवा होता, त्यावेळी त्याने राम शिंदे यांना सांगितलं असाव, मग राम शिंदे यांनी योगेश कदम यांना शस्त्र परवाना देण्यास सांगितलं असावा असा आरोप रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर केलाय. यामुळे, राम शिंदे चांगलेच कचाट्यात सापडलेत.
रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी घायवळचे हिंगोली आणि धाराशिव कनेक्शन देखील उघड केले. हिंगोलीतील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी निलेश घायवळला मदत केली. विदेशात पळून जाण्यासाठी ही मदत केली, असा आरोप केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, अधिवेशन सुरू असताना घायवळचा संतोष बांगर यांच्यासोबच व्हिडिओ व्हायरल झाला होता.
दुसरी गोष्ट म्हणजे, धाराशिवचे कनेक्शन उघड करत असताना तानाजी सावंत यांचं रोहित पवार यांनी नाव घेतलं. निलेश घायवळ हा पुण्यातून नाही तर गुजरातच्या अहमदाबाद शहरातून विदेशात पळाला. त्याला बांगर यांच्यासोबत तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील लोकांनी मदत केली. तानाजी सावंत हे प्रत्यक्ष नाही पण कुटुंबातील व्यक्ती यात सहभागी असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. त्यामुळे हे नेते आता अडचणीत साडपण्याची शक्यता आहे.
राम शिंदे, तानाजी सावंत आणि संतोष बांगर यांना उघड पाडता पाडता दुसऱ्या बाजूला रोहित पवारही स्वतः उघडे पडले. रोहित पवार यांच्या आईसोबत एका कार्यक्रमात घायवळ उपस्थित असल्याचा व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ कोरोना काळातील असल्याचं दिसतंय. रोहित पवार यांच्या आई भाषण करत असताना निलेश घायवळ बाजूला बसलेला दिसतंय. भाजप नेते नवनात बन यांनी रोहित पवार यांचेही घायवळ सोबतचे फोटो समोर आणले.
निलेश घायवळवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न यांसारखे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी 20 जानेवारी 2025 रोजी घायवळचा शस्त्रपरवान्याचा अर्ज फेटाळला होता. मात्र, गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी 26 जून 2025 रोजी पोलिसांना घायवळला शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिले. ही बातमी येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परबांनी पत्रकार परिषद घेऊन डाव साधला. मागच्या दोन वादग्रस्त प्रकरणांचा संदर्भ देत कदम यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली.
परबांच्या आरोपानंतर योगेश कदम यांच्या मदतीला वडील रामदास कदम धावून आले. रामदास कदम यांनी योगेश कदम यांच्या बचाव करत असताना भलत्याच नेत्याकडे बोट दाखवलं. एक मोठ्या नेत्याच्या शिफारशीमुळे योगेश कदम यांनी घायवळला परवाना दिला, असा दावा रामदास कदमांनी केला. मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या नेत्याच्या शिफारशीवरून हा परवाना दिला असा गौप्यस्फोट केला.
घायवळ हा केवळ फक्त राम शिंदे, संतोष बांगर, तानाजी सावंत, रोहित पवार, किंवा योगेश कदम यांनाच अडचणीत आणून पळाला नाही. इकडं मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कनेक्शनही समोर आलं. पाटलांसोबत देखील घायवळ असल्याचे फोटो उघड झाले. या फोटोत समीर पाटीलही दिसून येतोय. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी हे फोटो समोर आणले. चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधून गुन्हेगारी चालते, चंद्रकांत पाटलांचे पाठबळ असल्याचा आरोप त्यांनी केला.
एकूणात राजकारण आणि गुन्हेगारी या आता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय अशी शंका उपस्थित व्हावी इतकी प्रकरणं, उदाहरणं समोर येत आहे. राजकीय स्वार्थासाठी राजकीय पाठबळ देत पोलिसांच्या कारवाईपासून अभय पुरवत आणि वाट्टेल तशा यंत्रणा वाकवत ही गुंड प्रवृत्तीची माणसं पोसत राहणं हेच बीडमधील संतोष देशमुख हत्येसह काही भयानक घटनांमधून समोर आलं आहे.
मोठ्या अंगलट येणार्या काही गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना घडल्या की, संबंधित राजकीय व्यक्तींसोबतचं असलेलं कनेक्शन समोर येतात. काही दिवस राजकारण ढवळून निघतं. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, मग पोलिसही अंग झटकून हे सगळं संपलंच पाहिजे या भावनेतून कामाला लागल्याचं दिसतं. मिडिया जोपर्यंत त्या प्रकरणात दम आहे आणि नवं काही हाती लागत नाही, तोपर्यंत त्या प्रकरणाचा अक्षरश:गूळ पाडते. मात्र,एखादा नवा विषय दिसू लागताच हे प्रकरण मागे पडतं. मग पुन्हा एकदा तोच खेळ नव्यानं सुरू होतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.