
Bihar Election 2025 : बिहारच्या गुन्हेगारांचा कर्दनकाळ, ड्रग्ज माफियांचा सुपरकॉर्प आणि खाकी वर्दीतला मराठी सिंघम अशी ओळख असणारे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी बिहारची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये पोस्टिंग असताना त्यांच्या डॅशिंग कामांची बरीच चर्चा असायची, इथले लोकही त्यांच्या कामावर जाम खुश होते, त्यामुळं यंदाची बिहारची विधानसभा निवडणूक ते गाजवणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
बिहारमधील जमालपूर आणि अररिया या दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याची माहिती त्यांनीच स्वतः पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितलं की, "या दोन मतदारसंघात मी एसपी म्हणून काम केलेलं आहे. या ठिकाणी गरिबांची, मजुरांची आणि पीडितांसाठी मोठा लढा दिला होता. त्यामुळं तिथल्या जनतेची ही इच्छा होती की, मी निवडणूक लढवावी त्यामुळं या जनतेच्या आग्रहापोटी मी इथल्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे." यंदाच्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत शिवदीप लांडे यांच्यासह इतरही अनेक आयपीएस सेवेतून बाहेर पडलेले अधिकारी मुक्तेश्वर पांडे, आनंद मिश्रा, विकास वैभव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
अकोल्यातील शेतकरी कुटुंबात शिवदीप लांडे यांचा जन्म झाला. २००६ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते विजय शिवतरे यांचे ते जावई आहेत. त्यामुळं त्यांना राजकीय वारसा आपल्या घरातून लाभला आहे. पोलीस सेवेत आल्यानंतर त्यांनी बिहारची राजधानी पाटणा शहराचे पोलीस आयुक्त तसंच मुंगेर, अररिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. त्यानंतर बिहारमधून प्रतिनियुक्तीवर मुंबईत आल्यावर त्यांनी दहशतवाद विरोधी पथकात अर्थात महाराष्ट्र एटीएसमध्ये पाच वर्षे आयजी म्हणून काम केलं. त्यानंतर पुन्हा २०२२ मध्ये त्यांची बिहारच्या कोसी विभागात डीआयजी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर बढती मिळाल्यानं त्यांनी तिरहूत आणि पूर्णियाचे आयजी म्हणूनही काम पाहिलं.
मराठमोळे शिवदीप लांडे यांनी आपल्या पोलीस सेवेतील सर्वाधिक काळ म्हणजेच १८ वर्षे बिहारमध्ये प्रशासकीय सेवेत घालवला. त्यानंतर वर्षभरापूर्वीच त्यांनी आपल्या पोलीस सेवेचा राजीनामा दिला आणि याच वर्षी २०२५ मध्ये त्यांनी बिहारमध्ये 'हिंद सेना' नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. पण पक्षाची नोंदणी रखडल्यानंतर त्यांनी जनतेची सेवा आणि भ्रष्टाचाराविरोधात काम करण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.