North Pune District leaders  Sarkarnama
विशेष

North Pune District Politics : उत्तर पुणे जिल्हा मंत्रिपदाविना यंदा पोरका; मोहिते, बेनके यांना होती संधी, मात्र...

Vidhansabha Election News : विधानसभा निवडणूक निकालात उत्तर पुणे जिल्ह्यात यंदा धक्कादायक निकाल लागले.

गणेश कोरे

Mahayuti Goverment and North Pune District : महायुतीच्या धमाकेदार विजयानंतर लांबलेले मुख्यमंत्री पद आणि नंतरचा रखडलेला मंत्रिमंडळ शपथविधी नंतर आता नाकारलेल्या ज्येष्ठांची मनधरणी करण्याचे काम सध्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये उत्तर पुणे जिल्ह्याचे हक्काचे असलेले दिलीप वळसे पाटील यांचे मंत्रिपदही गेल्याने उत्तर पुणे जिल्हा मंत्रीपदाविना पोरका झाला आहे. वळसे पाटलांनंतर खेडचे दिलीप मोहिते आणि जुन्नरचे अतुल बेनके यांना संधी चालून आली होती. मात्र दोघांचाही पराभव झाल्याने आता उत्तर पुणे जिल्ह्याला मंत्रिपद विना रहावे लागणार आहे.

विधानसभा निवडणूक निकालात उत्तर पुणे जिल्ह्यात यंदा धक्कादायक निकाल लागले. राष्ट्रवादी अजित पवार(Ajit Pawar) गटाचे खेडचे ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते यांचा शिवसेनेचे (ठाकरे गट) बाबाजी काळे यांनी पराभव केला. काळे यांच्या रूपाने ठाकरे गटाला जिल्‍ह्यात एकमेव जागा मिळाली. तर जुन्नर मध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविली. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान अतुल बेनके यांचा धक्कादायक पराभव केला. तर आंबेगावला ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सलग आठव्यांदा अवघ्या दीड हजार मतांनी विजय झाला. अशा या तीनही धक्कादायक लढतीत मंत्रिपदाची अपेक्षा बाळगलेले मोहिते आणि बेनके यांचा पराभव झाला.

आंबेगावचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांच्यामुळे जुन्नर आणि खेड तालुक्यावर मंत्रिपदासाठी अन्याय झाल्याची नाराजी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी अनेकवेळा बोलून दाखविली होती. या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी मंत्री करण्याचा शब्द देखील अजित पवार यांनी प्रचारा दरम्यान मतदारांना दिला होती. मात्र मोहिते यांच्या पराभवामुळे खेड तालुक्याची मंत्रिपदाचे स्वप्न, ‘स्वप्न’च राहिल्याची भावना मतदारांची झाली आहे.

तसेच जुन्नर मधूनही तरूण नेते अतुल बेनके यांना पर्यटन राज्यमंत्री पदाची अपेक्षा होती. मात्र त्यांचाही पराभव झाल्याने त्यांना आणि तालुक्याला मंत्रीपदापासून दूर राहावे लागले आहे. बेनके यांचे वडिल दिवंगत माजी आमदार वल्लभ बेनके यांना देखील मंत्री होण्याची संधी आली होती. मात्र ते देखील मंत्री होऊ शकले नव्हते.

अपक्ष आमदार शरद सोनवणेंची मंत्रिपदाची मागणी -

जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेला(Shivsena) (शिंदे गट) पाठिंबा देत, मंत्रिपदाची आशा बाळगली. मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याने सोनवणे यांची आशा मावळली आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे पुरंदरचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी देखील मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना देखील डावलल्याने त्यांनी पुढच्या अडीच वर्षात जरी मंत्रिपद दिले तरी घेणार नसल्याचे सांगत, नाराजी व्यक्त केली आहे.

शिरूर, जुन्नरने मंत्रिपदाची संधी गमावली -

शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील(Shivajirao Adhalrao Patil) यांचा चौथ्या २०१५ च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी पराभव केला. आढळराव चौथ्यांदा खासदार झाले असते तर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली असती असा विश्‍वास त्यांच्यासह कार्यकर्त्यांना होता. तर अतुल बेनके हे सलग दोन वेळा विजयी झाले असते. तर आंबेगाव नंतर जुन्नरला आणि तरूण आमदार म्हणून बेनके यांना मंत्रिपदाची संधी होती. ती मतदारांनी गमावल्याची खंत मतदार व्यक्त करत आहेत.

सोनवणेंना मंत्रिपद नाही तर पर्यटन महामंडळ तरी द्या -

जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची जुन्नर तालुका पर्यटन विकासाच्या विविध संकल्पना मांडल्या आहे. पर्यटन तालुका करण्यासाठी ते गेली अनेक वर्ष काम करत आहेत. आता मंत्रिपद नाही तर किमान पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यमंत्री दर्जा असलेले महामंडळ मिळावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यात आढळराव यांचाच वरचष्मा -

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर या चार तालुक्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा महायुतीचे लोकप्रतिनिधी म्हणून वर्चस्व राहिले आहे. आढळराव पाटील महायुतीतील राजकीय साटेलोटे म्हणून शिवसेनेतून राष्ट्रवादी मध्ये आले. त्यांचा पराभव जरी झाला असला तरी, ते समाजात आणि राजकीय जीवनात सक्रिय आहेत.

विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिलीप वळसे पाटील आणि शिरूरचे आमदार ज्ञानेश्‍वर कटके यांच्या विजयात मोठा वाटा असल्याने त्यांचे उत्तर पुणे जिल्ह्यावर वर्चस्व कायम राहिले आहे. आढळराव पाटील यांच्याकडे म्हाडाच्या सभापती हे राज्यमंत्री दर्जाचे पद असून, ते सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. याचा फायदा महायुती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT