उमेश वाघमारे
Jalna News : जिल्ह्याच्या राजकारणात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि जालन्याचे विद्यमान शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्यात विधानसभा निवडणुकीआधी दिलजमाई झाली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खोतकर यांनी युती धर्म न पाळल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले असले तरी अद्याप या दोन्ही नेत्यांमध्ये म्हणावे तसे बाॅन्डिग दिसत नाही. अशावेळी नव्या पालकमंत्री पंकजा मुंडे या दोन विरुद्ध दिशेला तोंड असलेल्या नेत्यांची मर्जी राखत जिल्ह्याचा कारभार हाकावा लागणार आहे.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका पाहता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व स्वपक्षातील स्थानिक नेत्यांना निधीचे समान वाटप आणि डीपीडीसीमध्ये प्रतिनिधित्व देताना पालकमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा कस लागणार आहे. बीडच्या पालकमंत्री म्हणून काम करण्याचा पंकजा मुंडे यांना अनुभव असल्याने त्या हे दिव्य पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
भाजपचे मंत्री तथा जालन्याचे माजी पालकमंत्री अतुल सावे यांना शिवसेनेने विरोध केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर या जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळे मित्र पक्ष नाराज होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे.
मराठा आरक्षण लढ्याचे केंद्रबिंदु असलेले अंतरवाली सराटी हे गाव जालना जिल्ह्यातच येत असल्याने येत्या 25 तारखेपासून मनोज जरांगे पाटील यांचे सुरू होणारे आंदोलन पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांना हाताळावे लागणार आहे. राज्यात आधीच ओबीसी विरुद्ध मराठा आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे राईट हॅंड असलेले वाल्मिक कराड अडकल्याने पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. अशा सगळ्या पातळीवर काम करताना पंकजा मुंडे यांचा राजकीय अनुभव कामी येणार आहे.
जिल्ह्यात भाजपचे (BJP) तीन आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. 2014 च्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिलेले आमदार बबनराव लोणीकर यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी राज्यमंत्री आमदार अर्जुन खोतकर यांचाही विचार त्यांच्या नेतृत्वाने केला नसल्याचे दिसून आले आहे. मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीत नाराजी होती, पण आता त्याचा फारसा उपयोग नाही.
अडीच वर्ष वाट पाहणे एवढेच त्यांच्या हाती आहे. नव्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याशी राजकीय व कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून पंकजा मुंडे यांच्या नावाला विरोध झाला नाही.
महापौर निवडीत महत्वाची भूमिका
जालना महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिलीच निवडणूक पंकजा मुंडे पालकमंत्री असतानाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिला महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा, यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करणार आहे. भाजपकडून स्वबळाचा नारा दिला जात असल्याने जालन्याचा महापौर निवडण्यात पंकजा मुंडे यांची भूमिकाही महत्वाची ठरू शकते. शहरातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्र्यांकडून भरघोस निधी पदरात पाडून घेत महायुतीतील घटक पक्ष महापौर पद आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणार आहेत. यात जो पक्ष बाजी मारेल, त्याचीच महापालिका निवडणुकीत सरशी होईल.
जिल्हा परिषद निवडणुकीलाही हेच सूत्र लागू होईल. स्थानिक नेते जिल्ह्यातील कोणत्या विकासकामांना प्राधान्य द्यायचे, हे ठरवितात. शिवाय त्यांना जिल्ह्याचा अभ्यासही असतो. मात्र, पालकमंत्री इतर जिल्ह्यातील असल्याने आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे ऐकून विकासकामांच्या मंजुरीचा धडका सुरू केला, तर मित्र पक्ष नाराज होतो. याची प्रचिती अतुल सावे पालकमंत्री असताना आली आहे. त्यामुळे पाच विधानसभा मतदारसंघांतील प्रश्न समजून समान विकासकामांना निधी देताना पंकजा मुंडे यांना कसरत करावी लागणार आहे. याशिवाय माजी मंत्री बबनराव लोणीकर, ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्षाच्या ठिणगीचे चटकेही पालकमंत्र्यांना सोसावे लागतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.