Beed News : आष्टी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केली. यावेळी सुरुवातीला आमदार सुरेश धस यांनी काही सिनेमातील डॉयलॉग म्हणत तुफान फटकेबाजी केली होती. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोरच सत्ताधारी व विरोधकांवर जोरदार हल्लबोल करताना त्यांनी अक्षरशः पिसे काढली.
सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख 'बाहुबली' असा करीत दिवार सिनेमातील गाजलेली डायलाॅगबाजी करत 'मेरे पास देवेंद्र फडणवीस है', असे म्हणत त्यांनी धमाल उडवली. त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांनी धस यांच्या डायलाॅगबाजीला त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांचा धस यांनी देवेंद्र बाहुबली असा उल्लेख केला, त्यावरून धस यांची पंकजा मुंडे यांनी कोंडी केली. मलाही बीड जिल्ह्यात शिवगामी म्हणतात. धसच माझा उल्लेख शिवगामी असा करीत होते, असे सांगत त्यांनी धस यांच्यवर निशाणा साधला. 'मेरा वचन ही मेरा शासन' मी एकदा वचन दिले की कधीही मोडत नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट करीत मी सुरेश धस यांना जाहीर वचन दिलं आहे, तेच माझं शासन आहे, असे म्हणत टोला लगावला.
यावेळी धस यांनी भाषणातून त्यांनी कॉलेजमध्ये असताना बघितलेल्या दिवार सिनेमाचा किस्सा सांगितला. पाहिला होता. दिवारमध्ये अमिताभ बच्चन आणि शशी कपूर भाऊ भाऊ असतात. निरुपा राय त्यांची आई असते. शशी कपूर इन्सपेक्टर असतो. त्यावेळी अमिताभ शशी कपूरला म्हणतो, मेरेपास गाडी है, बंगला है, नोकर है, चाकर है तुम्हारे पास क्या है… त्यावेळी शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है. तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय. तुमच्यासारखा नशिबवान कोणी नाही. माझी आई गेली. वडील गेले. माझी दुसरी आई जिवंत आहे. माझी आई मी लपवली नाही साहेब. साहेब, तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं मला काही तरी मिळेल. मला मंत्रीपद नाही दिलं तरी, मी म्हणतो मला मंत्रीपद नको, पालकमंत्रीपद नको. काही देऊ नका. हे चार टीएमसी, तिकडचे साडे तीन टीएमसी पाणी द्या, असे सांगत धस पुढे म्हणाले की मला हिणवतात. काय आहे याचं मुख्यमंत्र्यापाशी. मला विचारता…तेरे पास क्या है. मी म्हणतो मेरे पास 'देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे.' हा आशीर्वाद असाच ठेवा, अशी मागणी धस यांनी यावेळी केली.
यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही जोरदार चिमटे काढले. बीड जिल्ह्याची ओळख ही गडांचा जिल्हा अशीच राहिली आहे. ज्याप्रमाणे मोगलांना सह्याद्री कळला नाही, तसा हा बीड जिल्हा आहे. येथील गडांवरुन राजकारण होते, असे बाहेर वाटते. पण गडांवरुन राजकारण होत नाही. गडांच्या गादीवर लोक नतमस्तक होतात. पण या जिल्ह्यात कोणी व्यक्तीला कोणी पूजत नाही. या जिल्ह्यातील माणूस विकासाच्या पाठीशी उभा राहिला आहे. ज्यामुळे ज्यांच्या बाप आमदार-खासदार नाही, असे लोकही बीड जिल्ह्यात आमदार झाले आहेत, असे पंकजा मुंडे यांनी सांगत तुफान फटकेबाजी केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ भाग्य मोठं आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'लाडकी' वाटते, मी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमाला आले. आपण सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली म्हणता, तसेच मला बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी 'शिवगामी देवी' म्हणायचे. शिवगामी देवी ही बाहुबलीची आई होती. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्या कॅबिनेटचे प्रमुख आहेत. त्यामुळे नेहमीच त्यांच्याविषयी मला आदरभाव वाटतो. त्यामुळे आज मला फडणवीसांना बघताना मनात वेगळाच भाव आला. तो ममत्त्वाचा भाव होता, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
त्यासोबतच यावेळी त्यांनी मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक, हे माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. मी सुरेश धस यांना अण्णा म्हणते. आम्ही तुम्हाला इज्जत देतो. यापूर्वी तुम्ही मुलाच्या लग्नाच्यावेळी मला साडी आणि पत्रिका घेऊन आला होतात. मी त्या लग्नाला आले होते. आता दुसऱ्या मुलाच्या लग्नात तुम्ही आमंत्रण दिलं तर मी नक्की येईन, नाही बोलावलं तर येणार नाही. पण आजचा कार्यक्रम हा शासकीय आहे आणि शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात कुठेही स्थान मिळाले असते तरी मी या कार्यक्रमाला आलेच असते, असे म्हणत निशाणा साधला.
2019 मध्ये बीड जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार भाजपचे निवडून आले होते. तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. सहापैकी पाच आमदार निवडून आले. आतादेखील आमच्यासोबत अजित पवार गटाचे आमदार आहेत. आम्ही मरमर करुन आमदारांना निवडून आणले आहे. देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर मी मंत्री झाले, थोडंस लक आमचं आहे. मी देवेंद्र फडणवीसांना जेवढं ओळखते, तेवढं मंचावरचं कोणी ओळखत नाही. मंचावर त्यांना बाहुबली म्हटल्याने ते थोडेसे ओशाळले आहेत. पण तुम्ही काम करा, कामाने किर्तीरुपाने उरा, हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आहे, असे म्हणत यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणाचे नाव न घेता निशाणा साधला.
त्यातच यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस यांना टोला लगावला. या कार्यक्रमावेळी भाषणादरम्यान फडणवीस यांनी सुरेश धस एकदा मागे लागले की डोकं खाऊन टाकतात, असे म्हणत सत्ताधाऱ्यासोबतच विरोधकांना टोला लगावला. एकंदरीत आष्टीतील या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस यांची डॉयलॉगबाजी चांगलीच गाजली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.