Tanaji sawant, Rahul Mote, Ranjeet Patil  Sarkarnama
विशेष

MVA News : परंडा मतदारसंघावरून आघाडीत ठिणगी; मोटे, रणजित पाटील दोघेही निवडणूक लढविण्यावर ठाम

Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता सोमवार व मंगळवार शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यातच आता धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

Sachin Waghmare

Dharashiv News : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी राज्यात सध्या जोरात सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता सोमवार व मंगळवार शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यातच आता धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

या मतदारसंघात पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दोन दिवसापूर्वीच दिवंगत नेते ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शनिवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माजी आमदार राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केली. एकाच जागेवर दोन उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील या दोन्ही उमेदवारांनी या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे काळ माघार घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (MVA News)

परंडा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (Shivsena) दिवंगत नेते ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांना या जागेवर दावा केला होता. त्यानंतर जागेवर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल, असे बोलले जात होते. मात्र, आता परंडा विधानसभा मतदारसंघातून रणजीत पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील हे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून अखेर परंडा विधानसभा मतदारसंघातून रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना एबी फॉर्म उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे. विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा दावा केला होता. त्या ठिकाणी त्यांचे इच्छुक उमेदवार माजी आमदार राहुल मोटे यांचं नाव चर्चेत होते.

परंडा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट लढणार असून रणजीत पाटील यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर करून शिक्कामोर्तब केला आहे. दुसरीकडे राहुल मोटे व रणजित पाटील निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत रंगणार

परंडा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिक माजी आमदार कै. ज्ञानेश्वर पाटील यांचे काही आठवड्यांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाला म्हणजे रणजीत पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून परंड्यात रणजित पाटील उमेदवार असणार आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा रंगणार सामना रंगण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT