Ayodhya Ram Temple Sarkarnama
विशेष

Ayodhya Ram Temple : राम मंदिर लढ्यासाठी रक्ताचं पाणी करणारी माणसे गेली कुठे?

सरकारनामा ब्युरो

संजय परब-

Ayodhya Ram Temple Ceremony : ''वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?, रोज अत्यचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे?, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा ....!!''

असेच काहीसे भाजप सत्तेत आल्यानंतर नाही म्हटलं तरी एकप्रकारे अडगळीतच टाकल्या गेलेल्या लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी या आणि अशा अनेक भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटत असणार.

अयोध्या येथे राम मंदिर व्हावे यासाठी आंदोलन उभारून रथयात्रा काढत भाजपला सत्तेच्या पायदानावर नेणारे अडवाणी, जोशी पुढील महिन्यात होणाऱ्या रामलल्लाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना या सोहळ्याला न येण्याची विनंती केली होती. जी दोघांनीही मान्य केली आहे, असे सांगण्यात येत असले तरी तो एक आभास असल्याचे पक्षाच्या निष्ठावंतांचे म्हणणे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रात आणि उत्तर प्रदेशमध्ये एकहाती सत्ता असल्याने मनुष्यबळाच्या जोरावर या दोघांना अयोध्येत काळजीपूर्वक आणण्यात कोणती अडचण येणार होती? असा सवाल करत या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यावर ‘एकमुखी’ लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा सगळा अट्टाहास असल्याचे मुख्य कारण पुढे आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यावर असताना मोदींची इमेज आहे त्यापेक्षा मोठी झाली पाहिजे. भाजपसाठी हा राममंदीर सोहळा तर एक निमित्त असेल. या निमित्ताने ते निवडणुकीचे बिगुल फुंकणार आहेत, अशीच सर्वत्र चर्चा आहे. या सोहळ्याची निवडलेली तारीखच सर्वकाही सांगून जाणारी आहे, असे आता उघडपणे बोलले जात आहे.

भाजपला ज्या काळात लोकसभेच्या एका एका जागेसाठी जीवाचे रान करावे लागत होते. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी(LAL KRISHNA ADWANI), प्रमोद महाजन, सुषमा स्वराज आणि भाजपशी संबंधित अनेक संघटनांच्या नेत्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. १९९०च्या दशकात राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करत अडवाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रथयात्रा काढत सर्व भारत ढवळून काढला होता. देशभर भगवे वातावरण करत भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा केला.

मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, साध्वी ऋतंभरा, कल्याण सिंह आणि अशोक सिंघल या नेत्यांनीही राम मंदिर आंदोलनात अडवाणी यांची समर्थ साथ दिली. पण, खस्ता खाणाऱ्या या सर्वांना आता पडद्याआड केले आहे. आता 22 जानेवारील मोदी जेव्हा 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याला पोहोचतील तेव्हा सर्वांच्या नजरा फक्त त्यांच्याकडे असतील आणि ती ही पडद्याआडची खरी गोष्ट असेल!

लालकृष्ण अडवाणींनी आणि मुरली मनोहर जोशी -

नव्वदच्या दशकात विश्व हिंदू परिषदेने अयोध्या, काशी आणि मथुरा येथील मंदिरे 'मुक्त' करण्याची मोहीम सुरू केली आणि त्याअंतर्गत लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली. मात्र, बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांना समस्तीपूर जिल्ह्यात अटक केली होती. अडवाणींवर बाबरी मशीद पाडण्याचा कट रचल्याप्रकरणी फौजदारी खटलाही दाखल करण्यात आला होते.

राम मंदिर आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेले मुरली मनोहर जोशी(Murali Manohar Joshi) 6 डिसेंबर 1992 रोजी घटनेच्या वेळी ते वादग्रस्त जागेजवळ उपस्थित होते.

उमा भारती -

घुमट पडल्यावर उमा भारतींनी त्यांना आलिंगन दिले होते. या आंदोलनातून उमा भारतींना देशभरात राजकीय ओळख मिळाली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री राहिलेल्या उमा भारती यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून दूर करण्यात आले. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली तेव्हा त्यांचे नाव नव्हते.

कल्याण सिंह -

कल्याण सिंह हे 6 डिसेंबर 1992 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पोलीस आणि प्रशासनाने जाणूनबूजून कारसेवकांना रोखले नाही, असा कल्याण सिंह यांच्यावर आरोप होता. नंतर पक्षापासून दूर करण्यात आलेल्या कल्याण सिंह यांनी भाजपपासून वेगळे होऊन राष्ट्रीय क्रांती पक्षाची स्थापना केली. पण त्यांची ही वेगळी चूल नीट पेटली नाही आणि ते पुन्हा भाजपमध्ये परतले. मात्र नंतर त्यांना काही विचारात घेतले गेले नाही. मशीद पाडण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या 13 लोकांमध्ये कल्याण सिंह यांच्या नावाचा समावेश होता. त्यांचे ऑगस्ट 2021 मध्ये निधन झाले.

अशोक सिंघल -

रामजन्मभूमी आंदोलनाला जन्म देणाऱ्यांमध्ये अशोक सिंघल हे प्रमुख नाव होते. मंदिर उभारणी चळवळीला जनतेचा पाठिंबा मिळवून देण्यात अशोक सिंघल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेकांच्या नजरेत ते राम मंदिर आंदोलनाचे 'मुख्य शिल्पकार' होते. 2011पर्यंत ते विहिंपचे अध्यक्ष राहिले आणि नंतर प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला. 17 नोव्हेंबर 2015 रोजी त्यांचे निधन झाले.

विनय कटियार -

राम मंदिर आंदोलनासाठी 'बजरंग दल'ची स्थापना करण्यात आली आणि आरएसएसनने पहिले अध्यक्ष म्हणून विनय कटियार यांच्याकडे जबाबदारी सोपवली. यामुळे कटियार यांचे राजकीय महत्त्व वाढले आणि ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसही झाले. कटियार हे फैजाबाद (अयोध्या) लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यसभेचे खासदारही होते. मात्र, 2018मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा तिकीट मिळाले नाही.

प्रवीण तोगडिया -

त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेचे आणखी एक नेते प्रवीण तोगडिया हे राममंदिर आंदोलनाच्या काळात खूप सक्रिय होते. पण त्यांनी विहिंपपासून वेगळे होऊन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नावाची संघटना स्थापन केली. राम मंदिराच्या उभारणीपूर्वी ते अनेकवेळा पंतप्रधान मोदींवर टीका करत राहिले. ते राज्यसभेचे खासदारही होते. मात्र, 2018मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा तिकीट मिळाले नाही.

राम मंदीरसाठी ज्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेल्या या साऱ्या माणसांपैकी साध्वी ऋतंभरा यांचा एकमेव अपवाद वगळता 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला वरील एकही नेते नसतील. यापैकी काहीजण काळाच्या पडद्याआड गेले असतील. पण, जे जीवित आहेत त्यांची पक्षाच्या दृष्टीने अवस्था आज असून नसल्यासारखीच आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT