Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah during a BJP event symbolizing the party’s nationwide political expansion and organizational strength. Sarkarnama
विशेष

BJP Expansion : वाजपेयी-अडवाणींपेक्षा मोदी-शहांची रणनीती कशी ठरली वरचढ? कट्टर विरोधकांना लोळवत देशभरात फुलवले कमळ

Narendra Modi and Amit Shah expanded BJP across India : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जोडीला सध्या राजकीय वर्तुळात 'नमो-शाह' युग म्हटले जाते. याच 'नमो-शाह' युगात भापजने संपूर्ण देशभरात कमळ फुलवलं आहे.

Jagdish Patil

BJP Expansion : सध्याच्या काळात भारतीय जनता पक्षाचा 'अश्वमेध' रोखणं विरोधकांना कठीण झालं आहे. कारण या पक्षाने हळूहळू करत संपूर्ण भारतभरात आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. एकट्या भाजपची स्वबळावर १७ राज्यांमध्ये तर मित्र पक्षांना सोबत घेत भाजपप्रणित 'एनडीए'ची २१ राज्यांमध्ये सत्ता आहे. या पक्षाच्या यशस्वी वाटचालीचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जोडीला दिलं जातं.

त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या जोडीला सध्या राजकीय वर्तुळात 'नमो-शाह' युग म्हटले जाते. याच 'नमो-शाह' युगात भापजने संपूर्ण देशभरात कमळ फुलवलं आहे. मात्र, आता मोदी-शाह यांची जोडी ज्या भाजपची सत्ता राज्याराज्यात प्रस्थापित केली असली तरी, जेव्हा या पक्षाला देशात जनाधार नव्हता त्यांची मोजक्याच राज्यात सत्ता होती.

तेव्हा ज्यांनी हा पक्ष वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी कष्ट घेतले ती जोडी म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि वरिष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांची. वाजपेयी-आडवाणी या दोघांच्या जोडीने भाजपच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचं पक्षासाठीचं योगदान विसरून चालणार नाही.

मात्र, शेवटी कोणत्याही पक्षाचं यश हे त्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या संख्येवर अवलंबून असतं. त्यामुळे मोदी-शहांच्या जोडीने पक्षासाठी अशा काही गोष्टी करून दाखवल्या, ज्या वाजपेयी-आडवाणी युगात विविध कारणांमुळे अपूर्ण राहिल्या होत्या. तर अशा नेमक्या कोणत्या गोष्टी मोदी आणि शाह यांनी करून दाखवल्या. शिवाय त्यांचे काही निर्णय त्यांनीच आखलेल्या अचूक रणनीतीमुळे कसे यशस्वी झाले त्याबाबतची प्रमुख उदाहरणे जाणून घेऊया.

१. विचारधारेतील मुख्य अजेंडा पूर्ण करणे

वाजपेयींच्या काळात भाजपच्या मूळ विचारधारेतील तीन प्रमुख मुद्द्यांना 'युती धर्मा'मुळे बाजूला ठेवावे लागले होते. मोदी-शाह जोडीने मात्र ते पूर्ण केले. यामध्ये कलम ३७० हटवणे, राम मंदिर निर्मिती आणि समान नागरी कायद्याचा समावेश आहे.

कलम ३७० हटवणे : अटलबिहारी वाजपेयींच्या काळात काश्मीर प्रश्नावर 'इन्सानियत, जम्हूरियत आणि काश्मीरियत'चा नारा दिला होता, पण कलम ३७० हटवणे शक्य झाले नव्हते. शाह यांनी संसदेत विधेयक मांडून ५ ऑगस्ट २०१९ रोजी हे कलम निष्प्रभ केले. यासाठी खूप आधीपासून रणनीती आखली होती.

राम मंदिर निर्मिती : आडवाणींनी रथयात्रा काढून राम मंदिरासाठी वातावरण निर्मिती केली, पण मंदिराचे प्रत्यक्ष काम मोदी-शहांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुरू झाले आणि २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.

समान नागरी कायदा : देशातील सर्व नागरिकांसाठी (धर्माचा विचार न करता) विवाहाचे, घटस्फोटाचे आणि वारसाहक्काचे कायदे समान असावेत, हा भाजपचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा अत्यंत वादग्रस्त मानला गेल्यामुळे वाजपेयींनी युती टिकवण्यासाठी यावर चर्चा करणे टाळले होते.

मात्र, मोदी-शाह यांच्या काळात हा कायदा अद्याप राष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे लागू झालेला नसला, तरी याची सुरुवात उत्तराखंड सारख्या भाजपशासित राज्यातून करण्यात आली आहे. तसेच 'तीन तलाक' रद्द करून त्यांनी या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. शिवाय ते उर्वरीत भारतात देखील हा कायदा लागू करणार असल्याचं सतत बोलून दाखवत असतात.

२. संघटनात्मक आणि निवडणूक यश

देशातील १७ पेक्षा जास्त राज्यात मुख्यमंत्री : वाजपेयींच्या काळात भाजपला कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यांमध्ये सत्ता मिळवता आली नव्हती. शाह यांच्या 'पन्ना प्रमुख' आणि संघटनात्मक बांधणीमुळे ईशान्य भारतापासून (त्रिपुरा, आसाम) ते दक्षिणेपर्यंत भाजपने आता आपले पाय भक्कमपणे रोवले आहेत.

स्वतःच्या बळावर स्पष्ट बहुमत : वाजपेयींना नेहमीच डझनभर मित्रपक्षांच्या मदतीने सरकार चालवावे लागले. मोदी-शाह जोडीने २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये भाजपला सलग तीन वेळा एवढ्या जागा मिळवून दिल्या की मित्रपक्षांवरचे अवलंबित्व कमी झाले आहे.

शिवाय आता तर अशी परिस्थिती आहे. ज्या राज्यात भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने प्रवेश केला होता. आता त्या राज्यात मित्र पक्षांपेक्षा भाजपचं संख्याबळ जास्त आहे. आगामी विधानसभेत तर महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजप स्वबळावर सत्ता आणण्यासाठी रणनीती आखत असल्याचंही लपून राहिलेलं नाही.

पश्चिम बंगाल :

पश्चिम बंगालमध्ये भाजप कधीकाळी शून्य होता. वाजपेयी-आडवाणींच्या काळात भाजप तिथे केवळ ममता बॅनर्जींचा छोटा मित्रपक्ष होता. मोदी-शाह यांनी बंगालमध्ये अशी संघटनात्मक बांधणी केली की भाजपने तिथे १८ लोकसभा जागा (२०१९) आणि ७७ पेक्षा जास्त विधानसभा जागा (२०२१) जिंकून तृणमूल काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले. तर यंदाच्या विधानसभेत तर भाजपने ऐतिहासिक २०७ जागा जिंकून तिथे एकहाती सत्ता स्थापन केली. शिवाय सुवेंदू अधिकारींच्या रुपाने पहिला भाजपचा मुख्यमंत्री देखील या राज्याला मिळवून दिला.

ईशान्य भारत :

ईशान्य भारत (North-East) हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. वाजपेयींनी ईशान्येसाठी स्वतंत्र मंत्रालय (DoNER) बनवले होते, पण तिथे राजकीय सत्ता मिळवणे त्यांना जमले नव्हते. मोदी-शाह जोडीने आसाम, त्रिपुरा, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्री बसवून ईशान्य भारताचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलून टाकले.

दक्षिण भारत :

दक्षिण भारतातही भाजपचा विस्तार वेगाने होताना दिसत आहे. वाजपेयी-आडवाणी यांच्या काळात केवळ कर्नाटकमध्ये सत्ता मिळवता आली होती. पण तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये 'मित्रपक्ष टिकवणे' हे वाजपेयींचे प्राधान्य होते. तामिळनाडूत DMK किंवा AIADMK, आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू (TDP) यांच्या कुबड्यांवर भाजप अवलंबून होता.

मोदी शाहंच्या काळात तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्येही भाजपचे अस्तित्व तयार झाले आहे. या जोडीने "आम्ही कोणाचे तरी छोटे मित्रपक्ष आहोत" ही प्रतिमा तोडून काढली. त्यांनी मित्रपक्ष सोबत ठेवले, पण स्वतःची संघटना वाढवण्यावर अधिक भर दिला. तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये भाजपने पारंपारिक मित्रपक्षांना बाजूला सारून स्वतःची जागा निर्माण केली.

तेलंगणा : तेलंगणामध्ये हैदराबाद महापालिका असो की तेलंगणा विधानसभा असो आज इथे भाजपने बीआरएसला (BRS) मागे सारून मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. २०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ८ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणात मिळालेल्या ८ जागा हे नव्या भाजपच्या 'टार्गेटेड' रणनीतीचे यश आहे.

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेश हे भाषिक राजकारणाचे केंद्र असल्याने तिथे भाजपला पाय रोवणे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. वाजपेयींच्या काळात भाजप हा आंध्र प्रदेशात पूर्णपणे 'तेलुगू देसम पार्टी' (TDP) आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून होता. केंद्रात सरकार टिकवण्यासाठी चंद्राबाबूंचा पाठिंबा महत्त्वाचा होता, त्यामुळे भाजपने स्वतःचा विस्तार करण्याऐवजी 'युती धर्म' पाळण्याला प्राधान्य दिले. भाजप तिथे केवळ 'ज्युनिअर पार्टनर' राहिला.

मोदी-शाह जोडीने चंद्राबाबूंवर विसंबून राहण्याचे सोडून दिले. २०१४-२०१९ च्या काळात युती तुटल्यानंतर शाह यांनी भाजपला 'तिसरा पर्याय' म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला. अमित शाह यांनी बुथ स्तरावर 'शक्ती केंद्र' आणि 'पन्ना प्रमुख' नेमून संघटना मजबूत करण्यावर भर दिला. जरी मतांची टक्केवारी लगेच वाढली नाही, तरी पक्षाचा पाया विस्तारला.

आंध्रमध्ये वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांना रोखण्यासाठी आणि भाजपला पुन्हा सत्तेत वाटा मिळवण्यासाठी शाह यांनी TDP आणि जनसेना (पवन कल्याण) यांच्याशी पुन्हा एकदा 'स्ट्रॅटेजिक युती' केली. यावेळी मात्र भाजप 'बार्गेनिंग' करण्याच्या स्थितीत होता. निवडणुकीत या युतीने दणदणीत बहुमत मिळवले. थोडक्यात भाजपने 'चाणक्यनीती' वापरून पवन कल्याण आणि चंद्राबाबूंसोबत सत्तेत वाटा मिळवला.

केरळ : वाजपेयी-आडवाणी यांच्या काळात भाजपचे केवळ 'विचारधारा' म्हणून केरळमध्ये अस्तित्व होते. त्यावेळी मुख्य भर हा संघ परिवाराचे जाळे विस्तारणे यावर होता. निवडणुकीत यश मिळवणे लांबच पण खाते उघडणे हे या काळात अत्यंत कठीण होते. पण मागील दोन विधानसभा निवडणुकीत भाजपने केरळमध्ये विजयासाठी प्रयत्न करणे सुरु केले आहे.

अनेक दशकांच्या प्रयत्नांनंतर सुरेश गोपी यांच्या रूपाने केरळमध्ये भाजपने पहिले कमळ फुलवले, जे वाजपेयी-आडवाणी काळात अशक्य वाटत होते. भाजपने केरळमध्ये आपल्या मतांची टक्केवारी सातत्याने वाढवून १९% ते २०% पर्यंत नेली आहे, जी २०१४ पूर्वी १०% च्या खाली होती. मे २०२६ च्या विधानसभा निकालात भाजपचे ३ उमेदवार निवडून आले आहेत.

तामिळनाडू : वाजपेयी-आडवाणी यांना केंद्रात सत्ता टिकवण्यासाठी कधी DMK तर कधी AIADMK ची मदत घ्यावी लागली. स्वतःचा स्वतंत्र विस्तार करण्यापेक्षा मित्र पक्षांकडून थोड्या तरी जागा मिळाव्यात यावर भर होता. त्यामुळे पक्षाची स्वतःची ताकद मर्यादित राहिली. मोदी-शाह युगात हे चित्र बदलले. माजी आयपीएस अधिकारी के. अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्ष करून शाह यांनी तामिळनाडूत आक्रमक राजकारण सुरू केले.

अन्नामलाई यांनी 'एन मण, एन मक्कल' (माझी माती, माझे लोक) पदयात्रेतून द्रविडी राजकारणाला आव्हान दिले. मोदींनी तमिळ भाषेचा आणि संस्कृतीचा (उदा. सेंगोलची स्थापना, काशी-तमिळ संगमम) जागतिक स्तरावर गौरव करून भाजपवरील 'हिंदी लादणारा पक्ष' हा शिक्का पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत यश मिळाले नसले तरी भाजपने आपली वैचारिक पोहोच शहरी आणि तरुण मतदारांपर्यंत वाढवण्यात यश मिळवले आहे.

थोडक्यात सांगायचे तर, वाजपेयी-आडवाणींनी दक्षिण भारतात भाजपसाठी 'प्रवेश' मिळवून दिला, तर मोदी-शाह जोडीने त्या प्रवेशाचे 'राजकीय सत्तेत' आणि 'भक्कम मतपेढीत' रुपांतर केले आहे. २०२६ पर्यंत दक्षिण भारतात भाजप हा केवळ एक उत्तर भारतीय पक्ष न राहता, तिथल्या मातीतील एक प्रबळ राजकीय शक्ती बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT