Rajabhau Waje Sarkarnama
विशेष

Shivsena UBT: सिन्नरसाठी खासदार राजाभाऊ वाजेंचा शब्द प्रमाण, देवळालीचे काय?

Roshan More

Shivsena UBT : महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत पक्ष सोडून गेलेल्या आमदारांचे मतदासंघ कोणत्या पक्षाला यावर मोठा खल सुरू आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हा वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच कोंडी झाली आहे.

या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकतीच नाशिक जिल्ह्यातील नेत्यांची चर्चा केली. या संदर्भातील बैठक शुक्रवारी मुंबईत झाली. यावेळी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात लढत झालेले मतदारसंघ कळीचे मुद्दे आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे नाशिक मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. त्यांच्या विजयात सिन्नर, इगतपुरी आणि देवळाली या तीन विधानसभा मतदारसंघांचा मोठा वाटा आहे. त्यात खासदार वाजे यांनी सिन्नर मतदारसंघ शरद पवार गटाला सोडण्याचे संकेत दिले आहेत.

सिन्नर मतदारसंघाबाबत काय निर्णय घ्यायचा, हे खासदार वाजे यांच्याशी चर्चा करून ठरवावे असे वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे कळते. सिन्नर आणि देवळाली या दोन्ही मतदारसंघात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाची लढत झाली होती. त्यात या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या.

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी शरदचंद्र पवार पक्ष सोडला ते आता सत्ताधारी भाजप आघाडीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटात आहेत. या दोन्ही ठिकाणी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती.

लोकसभेला शिवसेनेला संधी मिळाल्याने विधानसभेला सिन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात येणार आहे. या संदर्भात देवळाली मतदारसंघ कोणाला? यावरून पेच निर्माण झाला आहे.

सिन्नरच्या बदल्यात खासदार वाजे यांना 27 हजार मतांची आघाडी देणारा देवळाली मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला मिळावा, यासाठी खासदार वाजे शब्द खर्च करतील का? याची चर्चा सुरू आहे. सिन्नर मतदारसंघात आमदार माणिकराव कोकाटे महायुतीचे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेश गडाख यांचे नाव चर्चेत आहे. गडाख यांना खासदार वाजे यांचे समर्थन आहे.

देवळाली मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे इच्छुकांची रांग लागली आहे. लक्ष्मण मंडाले यांना ऐनवेळी गेल्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे सध्या मंडाले उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत. महायुतीचे इच्छुक उमेदवार देखील शरद पवार यांच्या संपर्कात आहेत.

देवळाली ठाकरे गटाकडे?

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप या मतदारसंघातून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी बंडखोरी केलेल्या आमदार अहिरे यांना आव्हान देऊ शकतील असे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. निवडणुकीची तयारी केलेल्या या इच्छुक उमेदवारांपुढे सध्या मतदारसंघ कोणाला यावरून घालमेल सुरू आहे. अशा स्थितीत सिन्नर मतदारसंघासाठी खासदार वाजे यांचा शब्द प्रमाण आहे. ते सिन्नरच्या बदल्यात देवळालीची मागणी करतील का? याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT