Radhakrishna Vikhe Patil - Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil - Balasaheb Thorat Sarkarnama
विशेष

Nashik Graduate Constituency : विखे-थोरात सामना रंगणार? : भाजपकडून विखे-पाटलांच्या भावाचे नाव आघाडीवर!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेस लवकरच सुरुवात होणार आहे. या निवडणुकांना अद्याप वर्षभराचा अवधी असला तरी राजकीय पक्षांनी आतापासून मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भाजपकडून विखेंना उमेदवारी मिळाल्यास नगरमधील विखे-थोरात यांच्यातच खऱ्या अर्थाने सामना रंगणार आहे. (Rajendra Vikhe Patil's name is in discussion from BJP for Nashik Graduate Constituency)

नाशिक पदवीधर मतदारसंघात पाच जिल्हे येतात. त्यात नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे हे गेली तीन टर्मपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. थोरात आणि तांबे यांचा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून या पाच जिल्ह्यात मोठा संपर्क आहे. तसेच, महाविकास आघाडीचा फायदाही तांबे यांना होऊ शकतो.

दरम्यान, भाजपकडून विखेंना उमेदवारी दिल्यास नगर जिल्ह्यातील दोन मातब्बर घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागू शकते. तसेच, नगर जिल्ह्यातील हे पारंपारिक विरोधक असले तरी ते कधीही समोरा समोर आले नव्हते. भाजपकडून विखे, तर काँग्रेसकडून तांबे रिंगणात उतरल्यास या दोघांच्या निमित्ताने थेट नसली तरी विखे-थोरात यांच्यातच खऱ्या अर्थाने निवडणूक होऊ शकते.

दुसरीकडे, नगरचे नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधून राजेंद्र विखे पाटील यांचे नाव या मतदारसंघासाठी भाजपकडून चर्चेत आले आहे. राजेंद्र विखे पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटमध्ये तब्बल २० वर्षे काम केले आहे. ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन, विद्वावता, आणि सल्लगार परिषदेचे सदस्यही होते. लोणीतील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठचे ते कुलपती आहेत. प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विद्यमान कार्यकारी अधिकारी या पदावर ते सध्या काम करत आहे. (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळापासून नगर आणि नाशिक जिल्ह्यांत विखेंचा मोठा जनसंपर्क आहे. त्याचा फायदा राजेंद्र विखेंना होऊ शकतो.

राजेंद्र यांचे बंधू राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या नगरचे पालकमंत्री आहेत, पुतणे सुजय विखे पाटील हे नगरचे खासदार आहेत. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे, त्याचा फायदा राजेंद्र विखे यांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे विखेंची उमेदवारी भाजपकडून या मतदारसंघासाठी महत्वाची ठरू शकते. भापजने विखे यांना उमेदवारी दिल्यास विखे विरुद्ध थोरात असा पारंपारिक सामना पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत. विखे यांच्या व्यतिरिक्त भाजपकडून हेमंत धात्र, विसपुते हेही इच्छूक आहेत, त्यामुळे भाजपच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT