Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी काही तास आधीच महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार भाजप मोठा भाऊ ठरला आहे. भाजप जवळपास 150 जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे भाजपमधील काही इच्छुक उमेदवारांना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सांगून त्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यातून त्यांनी महाविकास आघाडीकडे जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांचा ओढा थांबवत मित्रपक्षांनाही भाजपमधील तगडे उमेदवार देऊन बळ देण्याचे काम केले आहे.
महायुतीतील भाजपने (BJP) आत्तापर्यंत एकूण 146 आणि 4 मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देत 150 चा आकडा गाठला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 49, शिवसेनेकडून एकूण 80 अशा एकूण 279 जागांवरचे उमेदवार घोषित केले आहे. तर अजूनही महायुतीतील ९ जागांवरचे उमेदवार बाकी असून त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीत एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. भाजपने जवळपास 15 नेत्यांना विधानसभेचे तिकीट मिळण्यासाठी महायुतीच्या इतर मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर या नेत्यांनी महायुतीतील मित्र पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेच तिकीट देखील देण्यात आले आहे.
या डझनभरापेक्षा अधिक उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, महायुतीमधील प्रत्येक पक्षाला मिळालेल्या जागा आणि त्यामध्ये सर्वात मजबूत उमेदवार उभा केला जाईल, याची खात्री करत उमेदवारी दिली जात असून महायुतीमधील या समन्वयाच्या भूमिकेमुळे भाजप व मित्रपक्षाचा कॉन्फिडनस चांगलाच वाढला आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीकडे होणारे आऊटगोइंग थांबविण्यात यश आले आहे.
या भाजपमधून इतर पक्षात पाठविण्यात आलेल्या नेत्यांमध्ये भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांचा समावेश आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लगेचच कुडाळमधून उमेदवारी मिळाली. त्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपसोडून हातात घड्याळ घेतल्यानंतर त्यांना कंधार-लोहा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.
सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी घड्याळ हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांना तासगावमधून उमेदवारी मिळाली तर विदर्भातील भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना उमेदवारी देण्यात आली.
दुसरीकडे गेल्या दोन दिवसातच भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांना कन्नडमधून उमेदवारी दिली आहे. तर मुंबादेवीमधून भाजपच्या नेत्या शायना एनसी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उमेदवारी देण्यात आली.
बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेत प्रवेश करून हातात धनुष्यबाण घेतला आहे तर अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल यांनी ही उमेदवारीला मिळवण्यासाठी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला तर पालघरमध्ये भाजपसोडून हातात धनुष्यबाण घेतलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे .
त्यामुळे जवळपास डझनभरापेक्षा अधिक भाजपमधील मंडळींनी शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या यादीवर भाजपचे वर्चस्व पहावयास मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुका चुरशीच्या होण्याच्या शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.