Nagpur News : नागपूरमध्ये 15 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेला शपथविधी सोहळा हा विधिमंडळाच्या इतिहासातील दुसराच प्रसंग असणार आहे. सुमारे 33 वर्षांपूर्वी पहिल्यांदा 21 डिसेंबर 1991 ला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडला होता. शिवसेनेत पडलेल्या पहिल्या फुटीनंतर याठिकाणी छगन भुजबळ यांच्यासह सात जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, रविवारी होत असलेल्या या शपथविधी सोहळ्याप्रसंगी कोणा-कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? कोणाला यंदा डच्चू मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mahayuti News)
महायुती (Mahayuti) सरकारचा विस्तार येत्या 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता नागपूरातच पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. येत्या 16 डिसेंबरपासून सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे. त्यापूर्वी 15 डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे समजते. त्यापार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे. सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता लागली असताना आता तारीख निश्चित करण्यात आली आहे. अशातच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे पत्र शनिवारी राज्यपालांना महायुतीकडून देण्यात येण्याची शक्यता आहे.
नागपूर येथील हिवाळी आधिवेशनापूर्वी म्हणजेच 5 डिसेंबर 1991 ला शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली होती. त्यावेळी छगन भुजबळ यांच्यासह 18 आमदारांनी शिवसेनासोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी दिवंगत नेते सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते. त्यावेळी 21 डिसेंबर 1991 ला हिवाळी अधिवेशनावेळी छगन भुजबळ यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह बुलडाण्याचे डॉ. राजेंद्र गोडे, अमरावतीच्या वसुधा देशमुख, बीडचे जयदत्त क्षीरसागर, ठाण्याचे शंकर नम, वर्ध्याच्या शालिनी बोरसे, आमगावचे भरत बाहेकर यांनी शपथ घेतली होती.
1990 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 141 जागी विजय मिळवला होता. तर शिवसेनेने 52 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेच्या वाट्याला आले होते. त्यावेळेस मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी मंडल आयोगाचा मुद्दा देशपातळीवर चर्चेला आला होता. त्यावेळी भुजबळांनी या मुद्द्यावरून बंड पुकारत शिवसेनेची साथ सोडली. यावेळी भुजबळ यांच्यासोबाबत शिवसेना सोडून 18 आमदार आले होते. त्यापैकी छगन भुजबळ, डॉ. राजेंद्र गोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.
दरम्यान, रविवारी होत असलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 1 वाजता नागपुरात दाखल होणार आहेत. यावेळी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येणार असून शिंदेंच्या स्वागतासाठी लाडक्या बहिणीदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता उद्या होत असलेल्या या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.