Uddhav Thackeray Sarkarnama
विशेष

Maharashtra Politics : पवारांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांजवळ केलेले 'ते' विधान खरे ठरण्याची शक्यता...

Vijaykumar Dudhale

Mumbai News : ‘पन्नास खोके...एकदम ओके’, गद्दार अशा शेलक्या शब्दांनी महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांनी राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) विरोधात वातावरण निर्मिती होत होती. मात्र, अजित पवार यांच्या नॉट रिचेबलने त्याला सुरुंग लावला. त्या घडामोडीत शरद पवार यांना भेटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी बोलताना ‘मला एकट्यालाच भाजपविरोधात लढावं लागेल’ असे विधान केले होते. त्यानंतर सोमवारी अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे ते विधान खरे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Uddhav Thackeray's statement is likely to be true)

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे उद्वव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते, त्यामुळे ठाकरे गटाकडून शिंदे गटावर ठाकरी शैलीत हल्ला चढवला जात होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून वज्रमूठ सभा घेण्यास सुरुवात केली होती. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर येथील सभा ऐतिहासिक ठरल्या होत्या. त्या सभांच्या माध्यमातून सरकाराच्या विरोधात माहोल तयार होत होता. मात्र, तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नॉट रिचेबल राहण्याने त्याला सुरुंग लावण्याचे काम केले. तेव्हापासून महाविकास आघाडी डळमळीत होण्यास सुरुवात झाली. (Maharashtra Politics )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार यांच्या वारंवार नॉट रिचेबल राहण्यामुळे महाविकास आघाडील प्रमुख नेते अस्वस्थ झाले होते. त्यातूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून अजित पवार आणि राष्ट्रवादीतील एक गट बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असल्याचे मांडले होते. तसेच, ईडीच्या माध्यमातून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना कशा प्रकारे त्रास दिला जातो, हेही स्पष्ट केले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. मात्र, त्यानंतरही अजित पवार यांनी आपण कुठेही जाणार नाही, हे स्टॅम्पवर लिहून दे का, असा उलटा प्रश्न पत्रकारांना विचारला होता.

काही दिवसांनंतर काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. त्यावेळी राजकीय घडामोडी पाहता ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी बोलताना ‘मला एकट्यालाच भाजपविरोधात लढावं लागेल’ असे विधान केले होते. त्यानंतर पुढच्या काळात अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून भाजपसोबत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून मांडलेले चित्र खरे ठरले होते.

पुढच्या काळात महाविकास आघाडीतील विशेषतः शिवसेनेतील अनेक नेत्यांनी आघाडीची साथ सोडून भाजपच्या तंबूत जाणे पसंत केले. त्यानंतर सोमवारी तर काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपचा तंबू धरला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या त्या विधानाची आठवण झाली अणि ते वाक्य खरे ठरण्याची शक्यताही वाटू लागली. कारण, यापुढे खुद्द ठाकरे गटातील काही आमदार एकनाथ शिंदे गटाच्या गळाला लागण्याची चिन्हे आहेत.

यासोबत काँग्रेसमधील काही आमदारही भाजपच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शस्त्रे म्यान करून भाजपसोबत जुळवून घेत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपशी दोन हात करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकेक नेते भाजपच्या तंबूत शिरत असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ते वाक्य खरे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT