Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर महायुतीने 5 डिसेंबरला सत्तास्थापन केली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपानंतर पालकमंत्रिपद जाहीर करण्यात आले. त्यानंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. पाहिल्यादिवसापासून अजित पवार यांनी भाजपशी जुळवून घेतले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकवेळी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनावेळी विधानसभेचे रिक्त असलेले उपाध्यक्षपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटायला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदासाठी व सोबतच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर वर्णी लागावी यासाठी जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.
विधानसभेचे रिक्त असलेले उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. हे पद मागासवर्गीय समाजातील आमदाराला देण्याचा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसत आहे. या पदासाठी पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे व अर्जुन मोरगावी मतदारसंघातील आमदार राजकुमार बडोले यांच्या नावाची चर्चा आहे.
2019 साली राज्यात महाविकास आघाडीचे (MVA) सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी 14 मार्च 2020 राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. महायुतीच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झिरवळ हेच या पदावर होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये झिरवळ यांची अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री झाले आहेत. नवीन सरकारमध्ये उपसभापतिपद रिक्त आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद आणि विधान परिषदेचे सभापती पद हे भाजपकडे (BJP) आहे. तर विधान परिषदेचे उपसभापतीपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. तर आता विधानसभेचे उपाध्यक्षपद अजित पवार यांच्या गटाकडे येणार असल्याने या पदासाठी आतापासूनच मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. आता विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी आमदार अण्णा बनसोडे हे पवारांचे निकटवर्तीय मानले जातात, तर आमदार राजकुमार बडोले यांच्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल आग्रही असल्याचे समजते.
विधानसभेचे उपाध्यक्षपद खूप पूर्वी विरोधीपक्षाला दिले जात होते पण आता ही परंपरा कधीच मोडीत निघाली आहे. राजकुमार बडोले पूर्वी भाजपमध्ये होते पण अर्जुनी मोरगावी मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाटायला गेल्यानंतर बडोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2014 ते 19 या काळात ते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री होते.
पिंपरी आणि अर्जुनी हे मोरगाव दोन्ही अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघात आहेत. त्यामुळे अजित पवार कोणाला संधी देणार याची उत्सुकता लागली आहे. मंत्रीमंडळात मुस्लिम व आदिवासी समाजाचा चेहरा असणार आहे. त्यामुळे यावेळेस विधानसभा उपाध्यक्षपद अनुसूचित जातीला द्यावी, असा मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे या दोघापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे.
दुसरीकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळात एक पद रिक्त झाले आहे. राष्ट्रवादीच्या वाट्यातील या पदासाठी मराठवाड्यातील एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. रिक्त झालेली जागा प्रादेशिक समतोल पाहता मराठवाड्यतील आहे. त्यामुळे या जागेवर मराठवाड्यतील आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.
त्या पदावर वर्णी लागावी यासाठी लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, माजी मंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांच्यासह विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण इच्छुक आहेत. दरम्यान, कारवाईनंतरचा धुराळा शांत होईपर्यंत हे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच राहिल, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर या पदावर नव्याने नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.