Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात बुधवारी चुरशीने मतदान पार पडले. राज्यात सर्वत्र दोन महिन्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. राज्यात एकीकडे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहवयास मिळली. प्रचारा दरम्यान सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका करण्यात आली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. मराठवाड्यात महायुतीच्या 46 जागा आहेत. या निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरची जादू दिसणार का? महायुतीला यश मिळणार की महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार? याची आकडेवारीच पुढे आली आहे.
लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला (Mahayuti) मराठवाड्यात मोठा फटका बसला होता. संपूर्ण मराठवाड्यातून महायुतीला फक्त एक जागा मिळाली होती. लोकसभा निवडणुकीप्रमाणंच विधानसभा निवडणुकीतही पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार का ? मराठ्यांनी कुणाला कौल दिला ? याबाबत एक्झिट पोलनी अंदाज जाहीर केले आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक मराठा आंदोलनाभोवती केंद्रित राहिली. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम महायुतीला लोकसभा निवडणुकीत दिसला होता. मराठा फॅक्टरमुळे लोकसभेला मोठा फटकाही बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरची जादू दिसेल का? याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली असताना एक सर्व्हेच पुढे आला आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हा अंदाज पुढे आला आहे.
या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 46 जागांपैकी महाविकास आघाडीला 24 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला 16 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच दोन अपक्षही निवडून येण्याची शक्यता झिनियाच्या AI एक्झिट पोलने वर्तवली आहे. या अंदाजानुसार पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर चालू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जरांगे फॅक्टरमुळे महाविकास आघाडीला (MVA) फायदा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा परिणाम जाणवणार का? याबाबत मनोज जरांगे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. मराठ्यांच्या मतांशिवाय कुणीही निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवाराला मराठ्यांच्या समस्या सोडवाव्या लागतील. निवडून आलेल्या उमेदवाराने दगाफटका केल्यास राज्यात फिरणं मुश्किल होईल,असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती. त्यासोबतच मराठा आरक्षणाला विरोध करणा-यांना पाडा, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला होता. या विधानसभा निवडणुकीत खरोखरच जरांगे फॅक्टर चालला की नाही हे पाहण्यासाठी सर्वाना आता 23 नोव्हेंबरची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.