Minister Abdul Sattar News Sarkarnama
विश्लेषण

Abdul Sattar News : मंत्री अब्दुल सत्तार, तुमच्या जिभेला हाड आहे की नाही?

अय्यूब कादरी

Maharashtra Politics Latest News : ए पोलिसवाले, त्यांना लाठीचार्ज करा पाठीमागच्या लोकांना. इतकं मारा की त्यांच्या -- ची हड्डी तुटून जाईल... मारा त्यांना, हाना.. ए पोलिसवाले चला पाठीमागे हाना त्यांना, ए खाली बैस... साल्या, तुझ्या बापाने कधी पाहिला होता का कार्यक्रम... राक्षस आहे का? माणसाची औलाद आहे, माणसासारखं कार्यक्रम घ्या... 'ए बैस खाली...घरी असाच उभा राहतो का, तुझ्या आई-वडिलांचा पिक्चर पाहतो का...?'

सत्तारांनी केले मुजोरी, हुकूमशाहीचे प्रदर्शन

काय म्हणता लोकहो, कुणाच्या तोंडची भाषा असेल ही? राज्याचे अल्पसंख्यांक विकास व पणन खात्याचे कॅबिनेटमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुखातून निघालेली ही भाषा आहे आणि ते ऐकून घेणारे कोण आहेत? देशाचे भावी आधारस्तंभ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, ती तरुण पिढी हे सारे ऐकून घेत आहे. कशासाठी? गौतमी पाटीलचे नृत्य पाहण्यासाठी तरुण पिढी हे सर्व ऐकून घेत आहे. सर्व विधीनिषेध गुंडाळून ठेवत मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड या त्यांच्या गावात आपल्या मुजोरीचे, सरंजामी, हुकूमशाही वृत्तीचे निलाजरे प्रदर्शन तीन जानेवारीच्या रात्री जाहीरपणे मांडले. या तरुणांचे आई-वडील, पालक कुठे आहेत? आपल्या मुलांना अशा निगरगट्ट राजकीय नेत्यांच्या दावणीला ते का बांधत असतील?

बेताल बडबड ही अब्दुल सत्तार यांच्यासाठी नवी नाही. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयीही आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. पाहणी दौरा आटोपून आल्यानंतर एका जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतानाही त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. तोच कित्ता ते पुढे सतत गिरवत आहेत. मंत्री सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोडमध्ये एक जानेवारीपासून आठवडाभराचा सिल्लोड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यात विविध कार्यक्रम सुरू आहेत. तीन जानेवारीला गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. गौतमी पाटील यांचे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी असा गोंधळ, हुल्लडबाजीचे प्रकार घडत असतात. यापूर्वी अनेकवेळा असे प्रकार घडले आहेत. हे माहित असूनही सत्तार यांनी असे एखाद्या गुंडासारखे, अवैध व्यावसायिकासारखे वर्तन करणे अपेक्षित नव्हते. आपण राज्याचे कॅबिनेट मंत्री आहोत, याचे भान त्यांनी ठेवायला हवे होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्र्याला शोभण्यासारखे आहे का?

महाराष्ट्राच्या सुसंस्कृत, सभ्य राजकीय परंपरेची चौकट गेल्या काही वर्षांत उद्धवस्त झाली आहे. राजकीय पक्षांचे, नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असतात. ते समजून घेता येऊ शकतात. मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील कार्यक्रमात सर्वच मर्यादा ओलांडत आपला वकूब काय आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिले. अशा कार्यक्रमांना गर्दी होतच असते, तरुण हुल्लडबाजी करतच असतात. त्यांना हाताळण्याचे वेगळे मार्गही असू शकतात. जर हे शक्य होणार नसेल तर मग कार्यक्रम का आयोजित केला, याचे उत्तर मंत्री महोदयांनाच द्यावे लागेल. राज्याची परिस्थिती बिकट आहे. राजकीय गोंधळ सुरू आहे. पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत आपला वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करून घेण्याची हौस भागवणे, एखाद्या मंत्र्याला शोभण्यासारखे आहे का? तरुणांवर लाठीमार करण्याचा आदेश एखादा मंत्री पोलिसांना कोणत्या अधिकारात देऊ शकतो, हे मंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांच्या आदेशाचे पालन करणाऱ्या पोलिसांनी समोर येऊन दिले पाहिजे.

राज्यासह देशभरात बेरोजगारांच्या फौजा निर्माण झाल्या आहेत. हाताला काम नाही पण हातातील मोबाईलमध्ये दररोज दीड जीबी डेटा येत असल्याने तरुणाईला बेरोजगारीचा विसर पडला आहे का? अशी शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. अशा तरुणाईला दावणीला बांधून ठेवण्यासाठी तत्वांशी काडीचाही संबंध नसलेले सत्तारांसारखे राजकीय नेते अशा नृत्यांचे कार्यक्रम आयोजित करतात. या तरुणाईचे पालक कुठे आहेत, आपली मुले काय करत आहेत. कोठे जात आहेत, याची त्यांना माहिती नाही का? पालक असे बेसावध असल्यामुळेच, 'ए बैस खाली...घरी असाच उभा राहतो का, तुझ्या आई-वडिलांचा पिक्चर पाहतो का...?' असे त्यांच्या मुलांना ऐकून घ्यावे लागले आहे. सत्तारांचे हे वाक्य म्हणजे समस्त पालकांचा अवमान आहे. लोकहो, आतातरी सावध व्हा! अन्यथा, सत्तार यांच्यासारखे नेते तुमच्या नाकावर टिच्चून पुन्हा म्हणतील, 'मला कुत्रा हे चिन्ह मिळाले तरी मी निवडून येईल..!'

मुख्यमंत्री शिंदे आणखी किती वाट पाहणार?

अब्दुल सत्तार हे मूळचे काँग्रसचे. काँग्रेसमधून ते शिवसेनेत गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते सूरतमार्गे गुवाहाटीला गेले. अब्दुल सत्तार हिंदुत्व वाचवण्यासाठी गेले होते की आणखी कशासाठी, हे तेच सांगू शकतील. मात्र बहुतांश फुटीरांची भूमिका हिंदुत्वाच्या रक्षणासाठीच होती, असे त्यांच्याकडूनच सांगण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणखी किती वाट पाहणार आहेत? वकूब नसलेल्या अब्दुल सत्तारांसारख्या मंत्र्यांवर ते काही ठोस कारवाई करणार आहेत की नाही? मुख्यमंत्री शिंदे यांची एकवेळ अ़डचण असेल, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरी आता भूमिका घेतील का? शिंदे असो की फडणवीस, भूमिका कुणीही घेणार नाही. त्यांना सत्ता टिकवायची आहे, वाढवायची आहे, लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. शिंदे, फडणवीसच नव्हे, त्यांच्या जागी अन्य पक्षांचे नेते असते तरी त्यांनीही भूमिका घेतली नसती.

आता भूमिका लोकांना घ्यावी लागणार आहे. ‘साल्या, तुझ्या बापाने कधी पाहिला होता का कार्यक्रम..’ 'ए बैस खाली...घरी असाच उभा राहतो का, तुझ्या आई-वडिलांचा पिक्चर पाहतो का...?' राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना उद्देशून उच्चारलेल्या या दोन वाक्यांचा अर्थ काय आहे, हे लोकांनी आता अब्दुल सत्तार यांना विचारला पाहिजे. लोक, समाज, राजकीय पक्ष जर हे प्रश्न सत्तार यांना विचारणार नसतील तर मग सत्तार यांना तरी दोष का द्यायचा? नेत्यांना महागाई, बेरोजगारी याचा जाब विचारण्याऐवजी त्यांनी आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमांत जाऊन अंगावर लाठ्या झेलणाऱ्या तरुणाईबाबत तरी काही बोलण्यासारखे आहे का? महागाई, रोजगाराच्या प्रश्नावर तरुणांनी अशा लाठ्या खाल्ल्या असत्या तर समाजाचे तरी भले झाले असते. त्यामुळे अशी बेजबाबदार तरुणाई असेपर्यंत सत्तार यांच्यासारख्या नेत्यांची चलती राहील आणि हे दुर्देवी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT