Balasaheb Vikhe Patil : बाळासाहेब विखे-पाटलांसाठी ठाकरेंनी विचारसरणी बाजूला ठेवली होती...

Balasaheb Thackeray : सहकार, शैक्षणिक चळवळीसह राज्याच्या राजकारणात बाळासाहेब विखे-पाटलांची अलौकिक कामगिरी...
Balasaheb Vikhe Patil - Balasaheb Thackeray
Balasaheb Vikhe Patil - Balasaheb ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Vikhe Patil - Balasaheb Thackeray : विखे-पाटील घराणे हे इंदिरा गांधी यांचे निष्ठावंत होते, ते आणीबाणीचे समर्थक होते. असे असतानाही बाळासाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब विखे-पाटील यांना शिवसेनेत प्रवेश दिला होता. त्यांना आपल्या पक्षात कसे घ्यायचे, याचा फारसा विचार ठाकरेंनी केला नव्हता. पक्षाच्या विचारसरणीच्या पलीकडे जाऊन त्यांनी विखे-पाटलांना शिवसेनेत घेतले होते. विखे-पाटील यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही आठवण सांगितली होती.

बाळासाहेब विखे-पाटील यांचे कर्तृत्व आणि त्याची जाण अख्ख्या महाराष्ट्राला आहे. सहकार, शैक्षणिक चळवळ आणि राज्याच्या राजकारणावर आपली कायमची छाप सोडणाऱ्या बाळासाहेब विखे-पाटील यांना जगाचा निरोप घेऊन शनिवारी (30 डिसेंबर) सात वर्षे पूर्ण झाली आहेत.

Balasaheb Vikhe Patil - Balasaheb Thackeray
Loksabha Election : कोल्हापुरात ठाकरे गट 'परावलंबी', मदार काँग्रेसवरच

'देह वेचावा कारणी' या बाळासाहेब विखे-पाटील यांच्या आत्मचरित्राचे 2020 मध्ये प्रकाशन झाले. या आत्मचरित्रात त्यांनी 'माझं शिवसेनापर्व व मंत्रिपद' असे एक प्रकरण लिहिले आहे. शिवसेनेत असतानाचे अनुभव आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आठवणींना बाळासाहेब विखे-पाटील यांनी याद्वारे उजाळा दिला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मंत्रिपद कसे मिळाले, हेही त्यांनी त्यात सांगितले आहे.

बाळासाहेब विखे-पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांनी 1998 मध्ये नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. 1999 मध्ये ते कोपरगाव मतदारसंघातून शिवसेनेकडून लढले होते. त्यावेळी प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते. त्यांनी नगर जिल्ह्यात दोन सभा घेतल्या होत्या. याबाबतचा उल्लेख विखे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रचारसभांमध्ये बाळासाहेब ठाकरे कडवट जातीवाचक शब्द वापरतील आणि त्याचा आधार घेऊन विरोधक आपल्याला खिंडीत गाठतील, अशी भीती विखे-पाटील यांना होती. तसे त्यांनी ठाकरे यांना सभेपूर्वी बोलूनही दाखवले होते. त्यामुळे बाळासाहेबांनी कडवट जातीवाचक शब्द वापरले नाहीत. त्याचा माझ्यासह कार्यकर्त्यांनाही आनंद झाला होता. प्रबोधनकारांच्या सर्वसमावेशक आणि सुधारणावादी विचारांवर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होती. अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय स्थिती लक्षात घेऊन अगदी तारतम्याने ठाकरेंनी भाषणे केली, असा उल्लेख विखे-पाटलांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.

सहकार चळवळ आणि शिक्षणाच्या सोयी-सुविधांबाबत अहमदनगर आणि परिसराचा कायापालट झालेला आज दिसून येतो. तो काही एका रात्रीतून झालेला नाही. त्यामागे बाळासाहेब विखे-पाटील यांचे अपार कष्ट आहेत, त्यांची सचोटी आहे. सहकार चळवळ ही शेतकरी, श्रमिकांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे माध्यम ठरली आहे. शेतकरी, सामान्य लोकांना या चळवळीचे महत्त्व पटवून देऊन त्यांना संघटित केले, त्यांना स्वावलंबी जगण्याचा मार्ग बाळासाहेब विखे-पाटील यांनी दाखवला. सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ताठ मानेने जगायला शिकवले. ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणली.

Balasaheb Vikhe Patil - Balasaheb Thackeray
MPSC News : ही तर शोकांतिका! 600 जागा रिक्त, पण कृषीच्या एकाही पदासाठी नाही जाहिरात

बाळासाहेब विखे-पाटील यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात अहमदनगरजवळील लोणी या खेडेगावात 10 एप्रिल 1932 रोजी झाला. त्यांचे वडील विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी कारखान्याची उभारणी केली होती. बाळासाहेबांनी सहकाराचा हा वारसा समृद्धपणे पुढे चालवला. सहकारासह त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणली.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध सोयी, संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे ग्रामीण भागासाठी शिक्षणाची दारे खुली झाली. पुढे त्याचे प्रवरा अभिमत विद्यापीठात रुपांतर झाले. त्यांच्या प्रवरा कॅम्पससह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये देशासह परदेशातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तत्पूर्वी, दहावीनंतरचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शेती केली. अत्यंत गांभीर्याने त्यांनी शेतीत लक्ष घातले. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव झाली.

Balasaheb Vikhe Patil - Balasaheb Thackeray
Uddhav Thackeray News: शिवरायांच्या पुण्यात गद्दारांना गाडा, ठाकरेंचा आदेश

शेतकरी, श्रमिक आणि सामान्य माणूस संघटित झाला तरच त्याचा टिकाव लागेल, तो स्वावलंबी होईल आणि त्याला ताठ मानेने जगता येईल, हे बाळासाहेबांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी या घटकांना संघटित करण्यास सुरुवात केली. त्यांना सहकाराचे महत्त्व समजावून सांगितले. खासगी मालमत्तेची मालकी सोडून न देता उत्पादनाच्या साधनांवर स्वतः मालकी ठेवायची. त्याद्वारे उत्पादन घेऊन त्या माध्यमातून स्वावलंबी बनायचे, स्वतःची पत निर्माण करायची, हे सहकारी चळवळीतूनच शक्य होऊ शकते, हे बाळासाहेबांच्या लक्षात आले होते. त्यामुळेच त्यांनी गावागावांत सहकारी सोसायट्या, दूध डेअरी, मजूर सहकारी संस्था, सूतगिरण्या, सहकारी बँका, कुक्कुटपालन आदी संस्थांची सहकारी तत्त्वावर उभारणी केली. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना कर्जपुरवठा करता यावा, यासाठी त्यांनी 1976 मध्ये प्रवरा सहकारी बँकेची स्थापना केली. या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे.

सहकार चळवळीसह राजकारणातही बाळासाहेब विखे-पाटील यांच्या नावाचा दबदबा होता. ते काँग्रेसचे मातब्बर नेते होते. कोपरगाव (आताचा शिर्डी मतदारसंघ) मतदारसंघातून तब्बल सातवेळा खासदार आणि एकदा केंद्रात त्यांनी मंत्रिपद भूषवले होते. ते एकदा नगर मतदारसंघातूनही विजयी झाले होते. त्यांनी केंद्रीय अवजड उद्योग आणि अर्थ खात्याचा कारभार सांभाळला.

नगर जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष, राज्य साखर संघाचे अध्यक्ष, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र पाणी परिषदेचे संस्थापक, डिस्टिलरी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदी पदे त्यांनी भूषवली होती. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत बाळासाहेबांचे सलोख्याचे संबंध होते. विखे-पाटील विरुद्ध सर्व असे समीकरण नगर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षे दिसत होते. सध्याही तशीच काहीशी परिस्थिती दिसत आहेत. दुष्काळ, पाणी, शेती या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

Balasaheb Vikhe Patil - Balasaheb Thackeray
PM Modi Ayodhya : 22 जानेवारीला अयोध्येत येऊ नका; मोदी असे का म्हणाले...

राजीव गांधी पंतप्रधान असताना बाळासाहेब विखे-पाटील यांनी देशभरातील काँग्रेसच्या 45 खासदारांना एकत्र केले. त्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस फोरम फॉर अॅक्शनची स्थापना केली. त्याद्वारे त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले होते. पक्षश्रेष्ठींना त्यांचे हे पाऊल खटकले होते. त्यातूनच 1991 मध्ये काँग्रेसने (Congress) त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून लढले होते. त्यानंतर बाळासाहेब विखे-पाटील काही वर्षे शिवसेनेत होते. त्यावेळी केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे काम, अनुभव याची दखल घेत सरकारने त्यांची विविध समित्यांवर नियुक्ती केली होती. 2009 मध्ये त्यांना 'पद्मभूषण'ने सन्मानित करण्यात आले होते.

सहकार चळवळीची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवरानगरात त्यांनी जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध केल्या आहेत. त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा, मुलींच्या शाळा, कला व विज्ञान महाविद्यालये, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासह वैद्यकीय क्षेत्रातील उपशाखांचाही समावेश आहे. वयाच्या 84 व्या वर्षी बाळासाहेब विखे-पाटील यांचे 30 डिसेंबर 2016 रोजी लोणी अहमदनगर येथे निधन झाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Balasaheb Vikhe Patil - Balasaheb Thackeray
Amol Kolhe News : खासदार अमोल कोल्हेंना पाडणार ? जुन्नरचे आमदार अतुल बेनके म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com