Andhra Pradesh Politics : राजकीय वर्चस्वाच्या लढाईत देशभरातील अनेक मातब्बर राजकीय घराण्यांमध्ये फूट पडली आहे. आता आंध्रप्रदेशातही एका राजकीय घराण्यात फुटीचा अध्याय सुरू झाला आहे. त्याची चाहूल दोन वर्षांपूर्वीच लागली होती. अविभाजित आंध्र प्रदेशचे काँग्रेसचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे हे घराणे. त्यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असून, त्यांच्या कन्या वाय. एस. शर्मिला या आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वायएसआर तेलंगणा पार्टी हा आपला पक्षही काँग्रेसमध्ये विलीन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana Assembly Election) काँग्रसने (Congress) स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर महिनाभरातच वाय. एस. शर्मिला (YS Sharmila) यांनी ही घोषणा केली आहे. सुरुवातीला त्यांनी यासाठी नकार दिला होता, मात्र आता भावाच्या विरोधातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी त्या पदर खोचून सज्ज झाल्या आहेत. त्या आज (3 जानेवारी) दिल्लीला रवाना होणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या चार जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर त्यांच्यावर पक्षातील महत्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाणार आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत वाय. एस. शर्मिला यांच्या वायएसआर तेलंगणा पार्टीने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळीच त्यांची काँग्रेससोबत जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याची घोषणा केली आहे.
जगनमोहन आणि वाय. एस. शर्मिला यांचे वडील वाय एस. राजशेखर रेड्डी हे अविभाजित आंध्रप्रदेशचे दिग्गज नेते, लोकप्रिय मुख्यमंत्री होते. 2004 ते 2009 या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ते दुसऱ्यांदाही मुख्यमंत्री झाले होते, मात्र 2009 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले. आंध्र प्रदेशचे विभाजन करून 2014 मध्ये तेलंगणाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळेसपासून आंध्र प्रदेशात काँग्रेस लयाला गेली. वायएसआऱ राजशेखर रेड्डी यांचा राजकीय वारसा पुत्र जगनमोहन यांना मिळाला. त्यांनी 2011 मध्ये वायएसआर काँग्रेस पार्टीची स्थापना केली. 2019 मध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बनले. कुटुंबातील सर्व सदस्यांना जगनमोहन यांनी सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे शर्मिला नाराज झाल्या.
वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची 72 वी जयंती 8 जुलै 2021 रोजी साजरी करण्यात आली. दोघा बहीण-भावांनी त्या दिवशी वडिलांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले होते. त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी त्या दिवशी काही लोककल्याणकारी योजनांची घोषणा केली तर वाय. एस. शर्मिला यांनी थेट हैदराबाद गाठून वायएसआर तेलंगणा पार्टीची स्थापना केली होती. वायएसर तेंलगणा पार्टी हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणात एखाद्या महिलेने स्थापन केलेला पहिलाच राजकीय पक्ष ठरला होता. याद्वारे वडिलांच्या पुण्याईचा राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न शर्मिला यांनीही सुरू केला. वडिलांचे म्हणजे वाय. एस राजशेखर रेड्डी यांचे 'राजण्णा राज्यम' (वायएसआर यांचा सुवर्णकाळ) पुन्हा अस्तित्वात आणण्याचे ध्येय शर्मिला यांच्या पक्षानेही ठेवले होते. जगनमोहन यांच्या पक्षाचेही तेच ब्रीद आहे.
भावासाठी काढली होती तीन हजार किलोमीटर पदयात्रा
वाय. एस. शर्मिला यांनाही राजकीय महत्वाकांक्षा होती. त्यांनी ती लपवूनही ठेवली नव्हती. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात जगनमोहन रेड्डी यांची 2012 मध्ये तुरुंगात रवानगी झाली होती. त्यावेळी वाय. एस. शर्मिला यांनी भाऊ जगनमोहन यांना पाठिंबा मिळवण्यासाठी अविभाजित आंध्र प्रदेशातील 14 जिल्ह्यांतून तीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढली होती. विभाजनानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पक्षाला बहुमत मिळाले. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री बनले. दरम्यानच्या काळाच जगनमोहन यांनीही पक्षवाढीसाठी प्रचंड मेहनत घेतली. 2019 मध्ये त्यांच्या पक्षाची सत्ता आली आणि ते मुख्यमंत्री बनले, मात्र बहीण वाय. एस. शर्मिला यांना मात्र त्यांनी सत्तेपासून दूर ठेवले. पक्षात दुसरे सत्ताकेंद्र तयार होणार नाही, याची काळजी जगनमोहन यांनी घेतली.
आंध्र प्रदेशात काँग्रेसचे पुनरुज्जीवन होणार...
केवळ वडिलांच्या पुण्याईवर राजकरणात आपण तग धरू शकणार नाही, याची जाणीव शर्मिला यांना हळूहळू होऊ लागली. त्यांना राज्यसभेवर जायची इच्छा होती, मात्र जगनमोहन यांनी ती पूर्ण केली नाही. त्यानंतर मग विकासाच्या विविध योजनांवरून त्यांनी जगनमोहन यांना घेरायला सुरुवात केली. जगनमोहन यांच्या पक्षातही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी 40 आमदारांचे तिकीट कापण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आहे. त्यामुळे वाएसआर काँग्रेसच्या आमदरांमध्ये खळबळ माजली आहे. शर्मिला यांच्या प्रवेशानंतर यापैकी काही आमदारही त्यांच्यासोबत येतील किंवा तिकीट कापल्यानंतर तरी ते काँग्रेसमध्ये येतील, अशी शक्यता आहे. याद्वारे आंध्र प्रदेशात काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू होईल, शर्मिला यांच्यामुळे आंध्र प्रदेशात काँग्रेसला पुन्हा बळ मिळेल, अशी आशा नेत्यांना आहे. त्यामुळे काँग्रेसचे आंध्र प्रदेशातील नेते शर्मिला यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
2010 मध्ये माय-लेकींचा अपमान, 2024 मध्ये पायघड्या
2010 मध्ये आई आणि बहिणीचा गांधी कुटुंबियांकडून अपमान झाला होता. त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशात काँग्रेस औषधालाही शिल्लक ठेवली नाही. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अपघाती निधनाच्या धक्क्याने काही जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जगनमोहन यांनी दौरा काढला होता. दौरा मधेच थांबवावा, अशी गांधी कुटुंबियांची इच्छा होती. दौरा का काढला आहे, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी वाय. एस. शर्मिला आणि त्यांच्या मातुःश्री वाय. एस. विजयालक्ष्मी (विजयम्मा) यांनी दिल्ली गाठली होती. 10 जनपथवर जोरदार स्वागत होईल, अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांना 10-15 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर सोनिया गांधी समोर आल्या त्या धीरगंभीर चेहऱ्याने. विजयम्मा या स्पष्टीकरण देत असतानाच सोनिया गांधी यांनी थांबवले आणि त्या खुर्चीतून उठल्या. त्यामुळे दोघी माय-लेकी अपमानित होऊन तेथून परतल्या होत्या.
विजयम्मा या नेहमीच शर्मिला यांच्या पाठिशी उभ्या आहेत. त्यानंतर जगनमोहन यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. आंध्र प्रदेशातून त्यांनी काँग्रेसचे नामोनिशाण मिटवून टाकले. तेथे वायएसआर काँग्रेस आणि तेलुगू देसम पार्टी अशी लढत असते. त्यामुळे आंध्र प्रदेशात गमवावे, असे काँग्रेसकडे आता काहीही राहिलेले नाही. वाय. एस. शर्मिला यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला झाला तर फायदाच होऊ शकतो. 2010 मध्ये अपमान झालेल्या जनपथवर आता वाय. एस. शर्मिला यांच्या स्वागतासाठी उत्साह आहे.
(Edited By - Rajanand More)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.