Pune News : पुणे महापालिकेच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला होता. यातच जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय महापालिकेच्या निवडणुका होणार नाही असंही बोललं जात होतं. त्यामुळेच शहरातील भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी करणेच सोडून दिले होते. पण मंगळवारी (ता. 6) अचानक सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(Local Body Elections) 4 महिन्यांत घ्या, असे आदेश दिल्याने कार्यकर्ते खडबडून जागे झाले आहेत.
राज्य सरकारने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार पुण्यात चारचा प्रभाग राहणार असून, 42 प्रभागातून 166 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. मात्र, पुणे शहराची झालेली हद्दवाढ, फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे वगळण्यात आल्याने प्रभाग रचना पुन्हा नव्याने झाल्यास सोयीचे प्रभाग अस्तित्वात आणण्यासाठी महायुतीतील सत्ताधाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष दिसून येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून निवडणुकीची अधिसूचना आल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे.
पुणे महापालिकेच्या (PMC) नगरसेवकांची मुदत 14 मार्च 2022 रोजी संपली. पण निवडणुका न झाल्याने तेव्हापासून महापालिकेत प्रशासकराज सुरु आहे. पुणे महापालिकेची 2017 ची निवडणूकही चार सदस्यीय प्रभाग रचनेतून झालेली होती. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांनी मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. तसेच नगरसेवकांची संख्याही वाढविण्याचे निश्चित केले होते.
त्यानुसार पुणे महापालिकेत 58 प्रभागामध्ये 173 नगरसेवक असतील हे स्पष्ट झाले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने नागरिकांच्या हरकती सूचना मागवून, त्यावर सुनावणी घेऊन ही प्रभागरचना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरु होती. पण त्यापूर्वीच प्रभाग रचनेवर हरकत घेत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने ही प्रक्रिया ठप्प झाली.
महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर राज्यात महायुती सरकार आले. त्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिकेत चारचा प्रभाग असेल असा निर्णय घेतला, पण मार्च महिन्यात हे विधेयक विधिमंडळात मंजूर केले. पण न्यायलयीन लढाईमुळे प्रभाग रचनेचे काम सुरु होऊ शकले नव्हते.
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या 2016 कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार महापालिकेत 30 लाख लोकसंख्येला 161 नगरसेवक आणि त्या पुढील प्रत्येक 1 लाख लोकसंख्येसाठी एका नगरसेवकाची संख्या वाढवली जाते. आगामी महापालिका निवडणुका या 2011 च्या जनगणनेच्या आधारावर होणार आहे. तेव्हा पुणे शहराची लोकसंख्या 31 लाख 24 हजार इतकी होती.
तर 11 गावांची लोकसंख्या सुमारे दीड लाख आणि 23 गावांची लोकसंख्या अडीच लाखाच्या घरात होती. जुन्या आणि नव्या हद्दीची एकूण लोकसंख्या सुमारे 35 लाख 50 हजाराच्या जवळपास जाते. त्यामुळे लाखानंतर प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक या प्रमाणे पुण्यात 166 नगरसेवक असणार आहेत.
राज्य सरकारने फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन केली आहे आणि 2021 मध्ये 23 गावे समाविष्ट झाल्याने 2017 च्या निवडणुकीची प्रभागरचना पूर्णपणे बदलणार आहे. यापूर्वी महापालिकेची जुनी हद्द, 11 गावे व 23 गावे अशी मिळून 2011 ची एकूण लोकसंख्या ही 35 लाख 50 हजार इतकी होती.
त्यात फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांची लोकसंख्या 75 हजार 465 इतकी आहे. ही गावे महापालिकेतून वगळ्यात आल्याने त्यामुळे पुण्याची लोकसंख्या 34 लाख 75 हजार इतकी झाली आहे. त्यामुळे एक नगरसेवकाची संख्या कदाचित एकने कमी होऊन 166 ऐवजी 165 इतकी होऊ शकते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.