Mumbai News : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुरावा कायम आहे. त्यांच्यातील हा दुरावा व वाढलेले अंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने ठळकपणे दिसून येते. महायुतीमध्ये कोणतेच मतभेद नाहीत असे सत्ताधारी मंडळीकडून छातीठोकपणे सांगितले जात असले तरी त्यांच्यातील मतभेद मात्र या-ना त्या निमित्ताने उघड होत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून केला जात असलेला दावा नेहमीच फोल ठरत आहे. गेल्या दोन दिवसातील कार्यक्रमांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गैरहजर राहत त्यांच्यातील संघर्ष मिटला नसल्याचे दाखवून दिले आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेमधील हा वाद नवीन नाही. या दोन्ही पक्षात महाविकास आघाडीत एकत्रित असताना पासूनचा वाद आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अजितदादा अर्थमंत्री होते. शिवसेनेच्या आमदारांना निधी देताना ते हात आखडता घेतात, अशी टीका केली जात होती. त्याच कारणांवरून शिंदे यांच्या शिवसेनेने आघाडी सरकार पाडून महायुतीचे सरकार आणले. सुरुवातीचे वर्षभर सुरळीत सुरु असताना पुन्हा अजितदादा महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा वाद जुनाच आहे.
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर हा वाद नव्याने पुढे आला आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधांबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. अलीकडील काही घटनांमुळे त्यांच्या संबंधांमध्ये तणाव असल्याचे संकेत मिळतात. अर्थसंकल्पात शिवसेनेचे मंत्री व आमदाराच्या वाट्याला कमी प्रमाणात निधी आला आहे. तर रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. त्यातच 1 मे रोजी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा जोरात आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) धूसफूस सुरू असताना महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भाजपकडून मात्र यामध्ये मध्यस्थीसाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी निधी वाटपावरून थेट अजित पवारांना लक्ष्य केल्यानंतर हा वाद आणखीनच वाढल्याचे दिसते. मात्र, भाजप यावर कुठलाच मार्ग काढताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी आयोजित केलल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं असली तरी अद्याप कुणीही त्या कार्यक्रमाला गेले नाही. साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये काही धूसफूस सुरू आहे का अशी चर्चा सुरू आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नव्हे तर अनेक कारणाने वाद आहे. रायगडच्या रखडलेल्या पालकमंत्रिपदाचा वाद, मंजूर न होणारा निधी, अर्थ विभागाकडीलअडकवल्या जाणाऱ्या फाईल्स, यावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. अशातच महायुतीतल्या नाराजीनाट्याचा आणखी एक अंक समोर आला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी मुंबईत माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमास एकनाथ शिंदे न गेल्याने नाराजीच्या चर्चांने पुन्हा एकदा जोर धरला आहे. पण त्याआधी शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी आयोजित केलेल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी लावली होती. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याची चर्चा जोरात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.