Amarsinh Deshmukh Sarkarnama
विश्लेषण

Sangli Politics : अमरसिंह देशमुख यांच्या मनात नक्की चाललंय काय ?

सरकारनामा ब्यूरो

विद्याधर कुलकर्णी

Amarsinh Deshmukh Atpadi : अमरसिंह देशमुख संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकास साधण्याचा प्रयत्न केला होता. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणारे ते पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष असावेत. आपल्या कामामुळे व रोखठोक बोलण्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना व नेत्यांना ते भुरळ पाडत असतात. Sangli Politics

असे असले तरी सुद्धा ते आत्ता नक्की कोणत्या भूमिकेत आहेत हेच जनतेला दिसत नाहीये. मध्यंतरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सत्ताधारी गटात सामील झाले होते. आधीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर पक्षात असल्याने बहुतेक तिथे त्यांची कुचंबणा होत असावी. दोघांच्यात बरेच साम्य आहे. कारण दोन्ही नेते रोखठोक बोलण्यासाठीच प्रसिद्ध आहेत आणि एकाच तालुक्यातून प्रतिनिधित्व करतात.

बापूंची कार्यपद्धती वेगळी आहे. एकदा शब्द दिला की काहीही झालं तरी तो पूर्णच करणार, अशी त्यांची ओळख आहे. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणे ही त्याची खासियत आहे. मग किंमत कितीही मोठी चुकवावी लागली तरी चालेल त्याची ते तमा बाळगत नाहीत. पण सध्या त्यांना शांत आणि संयम ठेवून राजकारण करावं लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय चाललंय ह्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निडर आणि निर्भिड माणसाला जास्त काळ तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. तेच अमरसिंहबापूंच्या बाबतीत लागू होत आहे. कारण तो त्यांचा पिंड नाही. दूरदृष्टी आणि धडाकेबाज निर्णय ही त्यांची खरी ओळख आहे. 2014 रोजी राज्यात कुणाचीही आघाडी अथवा युती नव्हती. त्यावेळी मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. त्यांनी कोणतीही पूर्व तयारी नसताना विधानसभा अचानक लढवली होती.

त्यावेळी त्यांनी पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यावेळी सर्वसामान्य जनता आणि मतदार यांना अमरसिंह देशमुख हे पसंतीस उतरले होते. मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. त्यातही बापूंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मोदी लाट असतानाही अमरबापूंच्या इतकीच भाजपचे आत्ताचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही मते मिळाली.

तिथूनच मतदारसंघातील मातब्बर नेत्यांना अमरबापूं पुढे जड जातील का काय, असे वाटू लागले असावेत. एवढी क्षमता असूनही त्यांना कोणत्याच पक्षाने म्हणावी अशी शक्ती आणि राजकीय पाठबळ दिले नाही. मधल्या काळात अमरसिंह बापूंचे पंख छाटण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे स्वतःच्या हिमतीवर ज्यांनी राजकारण व आपले जनमानसात स्थान निर्माण केले, त्यांना आजचे पक्षीय राजकारण मान्य नसावे असेच त्यांना वाटत असावे.

शेवटी स्वाभिमानी नेत्याला कुणाच्याही कुबडीची गरज नसते. आत्ताच्या परिस्थितीमध्ये अमरसिंह बापू काही राजकीय व सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत असतात. पण त्यांच्या मनाची घालमेल व खदखद ही सर्वसामान्य लोकांना दिसून येत आहे. त्यामुळेच अमरसिंह बापू काही वेगळा निर्णय घेतात का, हे पाहावे लागणार आहे. अमरसिंहबापूंचा कोणताही निर्णय लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बाकीच्या सर्वांना अडचणीत आणणारा ठरू शकतो.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT