Pankaj Bhujbal-Chhagan Bhujbal 
विश्लेषण

Pankaj Bhujbal : वडिलांची हुकलेली संधी मुलाने साधली; पंकज भुजबळांची विधान परिषदेवर वर्णी

Vijaykumar Dudhale

Mumbai, 15 October : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा जागांपैकी सात जागा आज भरण्यात आल्या. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज (ता. 15 ऑक्टोबर) या सात जणांना आमदारकीची शपथ दिली. महायुतीमध्ये भाजपकडून तिघांना संधी देण्यात आली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोघांना संधी मिळाली आहे.

राष्ट्रवादीकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांची वर्णी लागली आहे. छगन भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची हुकलेली संधी मुलगा पंकज भुजबळ यांनी विधान परिषद मिळवून साधली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) फुटीनंतर छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देत मुंबईत पक्षाचा पहिला मेळावा घेतला होता. याशिवाय, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारीही भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रवादीतही भुजबळांचे वजन कायम राहिले.

लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकची जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे अखेर नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनीच निवडणूक लढवली, त्यामुळे लोकसभेवर जाण्याची छगन भुजबळ यांची संधी हुकली.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी छगन भुजबळ यांना इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ऐनवेळी कुठेतरी माशी शिंकली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला, त्यामुळे लोकसभेपाठोपाठ छगन भुजबळ यांची राज्यसभेवरही जाण्याची संधी हुकली. त्यावेळी त्यांच्या नाराजीची चर्चा माध्यमांसह राजकीय वर्तुळात चांगली रंगली होती.

‘सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. कधी कधी थांबावं लागतं,’ असा काहींसा नाराजीचा स्वर भुजबळ यांनी त्या वेळी लावला होता. तसेच, पक्षातील नेत्यांनी मला राज्यात काही दिवस थांबावे अशी विनंती केली होती, असेही भुजबळ यांनी त्या वेळी म्हटले होते. छगन भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची संधी हुकल्यामुळे भुजबळ कुटुंबीय हे राष्ट्रवादीत नाराज आहे की काय, अशीही चर्चा रंगली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बडे प्रस्थ मानले गेलेल्या भुजबळ कुटुंबीयांना दुखावणे परवडणार नसल्याचे लक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधान परिषदेच्या दोन जागांवर संधी देण्याचा विषय आल्यानंतर एका जागेवर छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांची वर्णी लावली आहे. त्यामुळे वडिलांची राज्यसभेवर जाण्याची हुकलेली संधी पंकज भुजबळ यांनी विधान परिषद मिळवत साधली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT