Aurangabad Central Constituency Sarkarnama
विश्लेषण

Aurangabad Central Constituency : मतदारसंघ पुन्हा मत विभाजनाच्या उंबरठ्यावर अन् तिरंगी लढतीमुळे असणार सर्वांचेच लक्ष!

Kishanchand Tanwani and Aurangabad Central Constituency : किशनचंद तनवाणी यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने इथे निर्माण झाला होता मोठा ट्विस्ट, मात्र...

Jagdish Pansare

Aurangabad Central Constituency Election Politics : शिवसेना महायुतीचे प्रदीप जैस्वाल, महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात आणि एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांच्यात या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आधी जाहीर झालेले अधिकृत उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने इथे मोठा ट्विस्ट आला होता. परंतु उमेदवारी अर्ज माघारीच्या आधीच तनवाणी यांनी मशाल खाली ठेवत उद्धव ठाकरे यांना दुसरा पर्याय देण्याची संधी दिली ही मोठी गोष्ट म्हणावी लागेल.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांना तातडीने उमेदवारी देत मराठा कार्ड खेळल्याने मध्य मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. परंतु 2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फायदा जसा एमआयएमला झाला होता, तशीच परिस्थिती 2024 मध्ये उद्धभवली आहे. शिवसेनेत फूट पडल्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यातून हिंदू मतांचे होणारे विभाजन एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांच्या पथ्थावर पडणारे ठरू शकते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली तर सिद्दीकी यांनी जैस्वाल यांना चांगली लढत दिल्याचे दिसून आले होते. विशेष म्हणजे तेव्हा शिवसेना-भाजप युती होती, तरी एमआयएमने मुस्लिम वोट बॅंकेच्या जोरावर 80 हजार मतांपर्यंत मजल मारली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी मध्य मधून मताधिक्य मिळाले. हे पाहता एमआयएमने मोठी जोखीम घेत इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांनी स्वतः मतदारसंघ बदलला. मध्य मध्ये गेल्यावेळी निवडणूक लढलेल्या नासेर सिद्दीकी यांना पुन्हा मैदानात उतरवले, तर स्वतः इम्तियाज यांनी मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात पुर्व मधून लढण्याचे ठरवले.

ओवेसी यांनी या निर्णयाला संमती दर्शवल्याने पक्षाने शहरातील दोन्ही मतदारसंघात जोर लावल्याचे चित्र आहे. मध्य मतदारसंघात ऐनवेळी उमेदवारी मिळालेल्या शिवसेना महाविकास आघाडीच्या बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक पावित्रा घेत महायुतीच्या प्रदीप जैस्वाल यांना आव्हान दिले आहे. जैस्वाल यांच्या व्यवसायावरून मी स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी नाही, तर तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी काम करणार असल्याचे थोरात यांनी प्रचारात सांगितले.

या शिवाय महायुतीकडून सुरु असलेल्या `बटेंगे तो कटेंगे`ला ही ना बटेंगे ना कटेंगे, हम जुडेंगे औरे जितेंगे, असे प्रत्युत्तर दिले. मध्य मतदारसंघात शहराच्या नामकरणाच्या मुद्यासह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून प्रमुख तीनही पक्षाच्या उमदेवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. वंचितने या मतदारंसघात उमेदवार दिला असून त्यांच्याकडून संविधानाला धोका हा मुद्दा पुढे केला जात आहे.

ओवोसी-ठाकरे-शिंदेच्या सभांनी गाजवले मैदान -

शहरातील मध्य मतदारसंघ हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो. सगळ्याच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी या मतदारसंघात प्रचार सभा घेत वातवरण तापवले. एमआयएमच्या नासेर सिद्दीकी यांच्यासाठी अकबरुद्दीन ओवेसी, असदोद्दीन ओवेसी या दोघांनी सभा, काॅर्नर बैठका, पदयात्रेच्या माध्यमातून शहरातील मुस्लिम बहुल भाग पिंजून काढला आहे. ओवेसी बंधुबद्दल मुस्लिम भागात मोठे कुतूहल असल्याने त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. ओवेसी यांनी मुस्लिम मतदार लोकसभे प्रमाणे महाविकास आघाडीकडे जाणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

वक्फ बोर्डाच्या विरोधातील विधेयक, यातून मशिदी, कब्रस्ताने बळकावली जाणार आहेत, असे सांगून ओवेसी बंधू मुस्लिम वोट बॅंक पक्की करण्यावर भर दिला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त सभांमधून प्रदीप जैस्वाल यांचा प्रचार केला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले किशनचंद तनवाणी जैस्वाल यांच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. ही जैस्वाल यांच्यासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. मध्य मतदारसंघातील काही महापालिका वाॅर्डांमध्ये तनवाणी यांचा फायदा जैस्वाल यांना होऊ शकतो.

महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेतली. यातून गद्दार विरुद्ध निष्ठावंत या मुद्याल प्रामुख्याने प्राधान्य दिले गेले. मशाल या चिन्हावर शिवसेनेने(Shivsena) संभाजीनगर मध्ये पहिल्यांदाच निवडणूक जिंकली होती, याकडेही प्रचार सभांमधून लक्ष वेधले गेले. थोरात यांनी मतदारंघासाठी स्वतंत्र असा वचननामा जाहीर करत मतदारांना साद घातली आहे. महायुती- महाविकास आघाडी-एमआयएम आणि वंचित हे चार प्रमुख पक्ष निवडणुक रिंगणात असले तरी खरी लढत महायुती-महाविकास आघाडी आणि एमआयएम अशी तिरंगी होणार आहे.

'वंचित'च्या उमेदवारासाठी सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर यांनी प्रचार सभा घेतल्या आहेत. मराठा फॅक्टर हा देखील या मतदारसंघात महत्वाचा ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने नवा मराठा चेहरा दिला. याचा त्यांना कितपत फायदा होते, हे लवकरच स्पष्ट होईल. या मतदारसंघातील निकालाचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवरही होणार आहे.

शिवसेनेचे राहिले वर्चस्व..

मतदारसंघ पुनरर्चनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली होती. त्यांच्याऐवजी पक्षाने विकास जैन यांना उमेदवारी दिली. पण मतदारांची सहानुभूती जैस्वाल यांच्या बाजूने असल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. यामुळे दलित-मुस्लिम मतदरांनीही जैस्वाल यांच्या पारड्यात आपली मते टाकली. परिणामी जैस्वाल निवडून आले आणि शिवसेनेच्या विकास जैन यांचा पराभव झाला.

2014 मध्ये शिवसेनेने झालेली चूक सुधारत जैस्वाल यांना पुन्हा पक्षात घेत उमेदवारी दिली. पण राज्यात शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे भाजपकडून(BJP) शिवसेनेच्या तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली. मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले आणि एमआयएमचा या मतदारसंघात उदय झाला. इम्तियाज जलील निवडून आले, त्यानंतरच्या 2019 मध्ये लोकसभेला शिवसेनेचा पराभव झाल्यामुळे आणि विधानसभा युतीत लढल्यामुळे प्रदीप जैस्वाल विजयी झाले. एमआयएमच्या नासेर सिद्दीकी यांनी शिवसेनेला चांगली टक्कर दिली. 2024 मध्ये हा मतदारसंघ पुन्हा मत विभाजनाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

2009

प्रदीप जैस्वाल (अपक्ष) विजयी- 49965 मते

विकास जैन (शिवसेना) पराभूत-33988 मते

कदीर मौलाना (राष्ट्रवादी) पराभूत-41583 मते

2014

इम्तियाज जलील (एमआयएम) विजयी- 61841

प्रदीप जैस्वाल (शिवसेना) पराभूत- 41861

किशनचंद तनवाणी (भाजप) पराभूत-40770

2019

प्रदीप जैस्वाल (शिवसेना) विजयी-82217

नासेर सिद्दीकी (एमआयएम) पराभूत-68325

अमित भुईगळ (वंचित आघाडी) पराभूत 27302

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT