Basavraj Patil News Sarkarnama
विश्लेषण

Basavraj Patil News : बसवराज पाटलांचे कालचे शत्रू आज झाले मित्र; राजकीय उलथापालथीचे परिणाम काय?

Dharashiv Political News : "बसवराज पाटील यांचे पारंपरिक राजकीय विरोधक, ज्यांच्यामुळे त्यांची काहीवेळा राजकीय कोंडी झाली..."

अय्यूब कादरी

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज, चाणाक्ष नेते, माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे धाराशिवसह शेजारच्या लातूर जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील बसवराज पाटील यांचे पारंपरिक राजकीय विरोधक, ज्यांच्यामुळे त्यांची काहीवेळा राजकीय कोंडी झाली, आता ते त्यांचे राजकीय मित्र झाले आहेत. या उलथापालथीचे परिणाम काय होतील? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. तूर्तास याचा सर्वाधिक फटका कॉँग्रेसला बसला असून, या धक्क्यातून पक्षाला उभारी घेणे नजीकच्या काळात शक्य होईल, असे वाटत नाही. दरम्यान, बसवराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सर्वात आधी 'सरकारनामा'च्या हाती लागली होती. 22 डिसेंबर 2023 रोजी तशा आशयाचे वृत्त 'सरकारनामा'ने प्रसिद्ध केले होते. (Lok Sabha Election 2024)

बसवराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा काही वर्षांपासून सुरू होती. निवडणूक आली की, ही चर्चा हमखास सुरू व्हायची. यावेळी मात्र ती खरी ठरली. केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी साठी प्रयत्न केले. बसवराज पाटील हे मास लीडर समजले जातात. 2009 च्या निवडणुकीपासून उमरगा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे त्या निवडणुकीत त्यांना शेजारच्या औसा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अगदी काही दिवसांतच औसा मतदारसंघात प्रभावी प्रचारयंत्रणा राबवून त्यांनी विजय खेचून आणला होता. याद्वारे त्यांनी आपल्या संघटनकौशल्याची चुणूक दाखवली होती. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीतही ते औसा मतदारसंघातून विजयी झाले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी मोदी लाट होती. 2019 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाटील यांच्या संघटनकौशल्याचा फायदा भाजप नक्कीच फायदा करून घेणार, हे स्पष्टच आहे, मात्र त्याच्या बदल्यात पाटील यांना काय मिळणार, हे अद्याप उघड झालेले नाही. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी काही अटी, शर्ती किंवा मागण्या ठेवल्या होत्या का, हे स्पष्ट झालेले नाही. पाटील हे तोलूनमापून बोलत असतात. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांच्या समोरही फारसा गवागवा किंवा वक्तव्ये त्यांनी आताही केली नाहीत. त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे, अशी चर्चा आहे, मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सर्वाधिक फायदा औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांना झाला असून, आता ते निर्धास्त झाले असतील, कारण बसवराज पाटील विधानसभेची आगामी निवडणूक औशातून लढवणार, अशी चर्चा होती. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ती शक्यता संपुष्टात आली आहे.

उमरगा तालुक्यातील विरोधकांचे राजकारण हे बसवराज पाटील यांच्या भोवतीच फिरणारे होते, म्हणजे बसवराज पाटील यांच्या राजकारणाला विरोध करतच विरोधकांनी राजकारणात जम बसवला होता. आता तेच विरोधक पाटील यांच्या मित्रपक्षांत आहेत. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या विरोधात म्हणजे बसवराज पाटील यांच्या विरोधात उमरगा - लोहारा विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. त्या आघाडीने काही निव़डणुकांमध्ये बसवराज पाटील यांना शह दिला होता. या आघाडीत स्थानिक पातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश होता.

भाजपचे दिवंगत नेते शिवाजीदादा चालुक्य, आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार आणि शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हे त्या आघाडीत होते. दिग्गज नेते, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे आणि बसवराज पाटील यांचे राजकारणात फारसे सख्य नव्हते. हे दोघेही नेते काँग्रेसमध्ये असताना बसवराज पाटील यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी होती, मात्र त्यावेळी त्यांना डावलण्यात आले होते. त्यावेळी पक्षात डॉ. पद्मसिंह पाटील यांची चलती होती. आता डॉ. पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भाजपचे जिल्ह्यातील महत्वाचे नेते आहेत. त्यांनाही आता बसवराज पाटील यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

प्रा. रवींद्र गायकवाड यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी बसवराज पाटील आणि शिवाजीदादा चालुक्य यांची घराणी राजकारणात प्रस्थापित झालेली होती. बसवराज पाटील यांच्या राजकारणाला विरोध करत शिवसेनेतून प्रा. गायकवाड यांच्या नेतृत्वाचा उदय झाला होता. गायकवाड यांच्या रूपाने लोकांना एक पर्याय उपलब्ध झाला होता. प्रा. गायकवाड आमदार झाले, त्यावेळी शिवाजीदादा चालुक्य यांची भूमिका महत्वाची राहिली होती. त्यांनी प्रा. गायकवाड यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे बसवराज पाटील यांचा पराभव झाला होता. विरोधक तगडे असतानाही बसवराज पाटील यांनी 1999 मध्ये प्रा. गायकवाड यांना पराभूत केले होते. 1995 आणि 2004 च्या निवडणुकीत प्रा. गायकवाड यांनी पाटील यांचा पराभव केला होता.

चालुक्य कुटुंबीय आता भाजपमध्ये आहेत. संताजी चालुक्य हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. प्रा. सुरेश बिराजदार आणि प्रा. रवींद्र गायकवाड यांचे पक्षही महायुतीत आहेत. महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असल्याने प्रा. गायकवाड आणि प्रा. बिराजदार यांना आता बसवराज पाटील यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे. ते स्थानिक पातळीवरही पाटील यांच्याशी जुळवून घेतात किंवा कसे, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. बसवराज पाटील यांच्या राजकाणाला सातत्याने विरोध करत जम बसवलेले प्रा. गायकवाड आणि प्रा. बिराजदार यांना आता त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागत असल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या अर्थाने बसवराज पाटील हे काँग्रेसमध्ये (Congress) असतानाही फायद्यातच होते आणि आता भाजपमध्ये आल्यानंतरही ते फायद्यातच राहणार आहेत. कोंडी त्यांच्या पारंपरिक विरोधकांची होणार आहे. बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे झालेली राजकीय उलथपालथ धाराशिव आणि लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे. पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल का किंवा धाराशिव किंवा लातूर जिल्ह्यातील एखाद्या विधानसभा मतदारसंघातून (Assembly Election) उमेदवारी मिळेल, याची उत्तरे आगामी काळात मिळणार आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT