Bharat Ratna Advani Sarkarnama
विश्लेषण

Bharat Ratna Advani : संघर्ष, समर्पण आणि त्यागाचे प्रतिक ‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी!

Lal Krishna Advani : दोन खासदार अशी ओळख असलेल्या जनसंघ आणि भाजपाला अच्छे दिन एक दिवसात प्राप्त झाले नाहीत.

Sachin Deshpande

L K Advani declared 'Bharat Ratna' : अखंड हिंदूस्थानातील सिंधमधील एक शिक्षक, फाळणीनंतर सिंध ते दिल्लीचा वेदनादायी प्रवास, निर्वासित म्हणून असलेली ओळख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, प्रचारक म्हणून केलेले कार्य, फाळणीनंतर संघाने राजस्थानामध्ये जे जे दायित्व दिले ते निष्ठेने पूर्ण करणारे लालकृष्ण अडवाणी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सहकार्याने दिल्लीत आले. दिल्लीत जनसंघाचे सचिव झाले अन् पुढे 1972 मध्ये जनसंघाच्या अध्यक्षपदीही त्यांची वर्णी लागली.

याशिवाय अडवाणी यांनी ऑर्गनायझरचे पत्रकार, सहयोगी संपादक पद सांभाळले. आणिबाणीच्या काळात जेलमध्ये राहणारे लालकृष्ण अडवाणी यांचे संपूर्ण जीवन संघर्षातून पुढे आले आहे. आणिबाणी नंतरच्या सरकारमध्ये सूचना एवं प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि दोनदा गृहमंत्री, एकदा उपपंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा अडवाणी पंतप्रधान पदाचे दावेदार होते, तेव्हा मात्र पुन्हा नियतीने ते त्यांच्यापासून दूर नेले. राममंदिर रथ यात्रेचे सारथी असलेले नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे पंतप्रधान झाले अन् अडवाणी यांची संधी गेली

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खरंतर ही संधी नाकारली गेली की, वयोमानाच्या कारणाने टाळल्या गेली हा मोठा राजकीय संशोधनाचा विषय आहे. पण, संधी नाकारली म्हणून कुठे ही आरडाओरड नाही, विरोधकांसोबत हातमिळवणी नाही, स्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या विरोधात वक्तव्यं त्यांनी आजपर्यंत कधीही केले नाही. जीवनाच्या सर्वोच्च शिखरावर असताना अडवाणी यांना भारतरत्न देत त्यांच्या 1942 ते 2014 या 72 वर्षाच्या राजकीय, सामाजिक संघर्षाला केंद्रातील सत्तारुढ भाजपाने एक प्रकारे गौरवान्वित केले.

ज्या प्रकारे आता भाजपामध्ये इतर पक्षाच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा उठसुठ प्रवेश होतो, काहींना गुणवत्ता आणि काहींना कुवत नसतानाही पदे मिळतात, त्यांनी हा राजकीय संघर्षच मुळात पाहिला नाही. कुठलेही लाभाचे पद नसताना संघटना उभी करायची, ती कायम ठेवायची, ती मोठी करण्याचा संघर्ष अटलबिहारी वाजपेयींच्या सोबत लालकृष्ण अडवाणींनी(L K Advani) भाजपासाठी केला.

दोन खासदार अशी ओळख असलेल्या जनसंघ आणि भाजपाला अच्छे दिन एक दिवसात प्राप्त झाले नाही. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक प्रचारकांच्या चपला झिजल्या, केवळ शब्दांमध्येच नाही तर अनेकांचे प्रत्यक्षात हाडाची काडे झाली आणि रक्ताचे पाणी झाले. त्या कठिण परिस्थितीनंतर भाजपाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना हा उत्कर्ष आणि झगमगाट आज दिसत आहे.

केवळ भाजपाच्या(BJP) नेत्यांनी यातून धडा घेण्यासारखे नाही तर सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांना, नेत्यांनी यातून धडा घेण्याची गरज आहे. पक्ष, विचारधारेसोबत प्रामाणिक राहणे, एकनिष्ठा, वेळप्रसंगी संघर्ष करणे, पदाचे दावेदार असताना त्याग करणे, हा धडा शिकविणारे व्रतस्थ म्हणूनच लालकृष्ण अडवाणी यांचा आदर्श डोळ्यासमोर आज ठेवावा लागेल.

भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान हे त्याचे प्रतिक आहे-

लालकृष्ण अडवाणी यांच्या 1990 च्या सोमनाथ ते अयोध्या या राम मंदिर रथ यात्रेनंतर अनेक यात्रा निघाल्या. देशाचे वातावरण बदलणारी ही रथयात्रा होती. संघर्ष, दंगली, गुन्हे, आरोप, प्रत्यारोप, सोबतच्या सहकार्याचे झालेले हाल हे अडवाणी यांनी स्वतः भोगले आणि त्याचा इतरांसोबत सामना केला. राम रथयात्रा, जनादेश यात्रा, स्वर्ण जयंती रथयात्रा, भारत उदय यात्रा अशा प्रमुख यात्रांमध्ये अडवाणी हे प्रामुख्याने समोर होते.

अयोध्येत प्रभु श्रीरामांचे मंदिर उभारण्यात आल्यानंतर मोदींनी आश्चर्याचा धक्का देत बिहारचे जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न घोषित केले. पण, त्यानंतर अचानक लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न घोषित करत लालकृष्ण अडवाणी यांची रामजन्मभूमीबद्दलची असलेली तळमळ आणि 72 वर्षाचा सामाजिक, राजकीय संघर्ष यांचे मुल्यमापन झाले आहे. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान हे त्याचे प्रतिक आहे.

अडवाणींनी मोदींचे मुख्यमंत्री पद वाचविले होते -

गुजरातमध्ये जातीय दंगली आणि नाराज पंतप्रधान वाजपेयी यांनी मोदी यांना राजधर्माची आठवण करुन दिली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी चांगलेच व्यथित झाले होते. पण, अडवाणी यांनी मोदींचे मुख्यमंत्री पद वाचविले होते. अयोध्येत राममंदिर उभारण्यात लालकृष्ण अडवाणी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे राममंदिर लोकार्पणानंतर अडवाणींना भारतरत्न देण्याची महत्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राममंदिर निर्माण, लालकृष्ण अडवाणी यांचा संघर्ष भाजपा जनतेसमोर मांडेल. भारतरत्न पुरस्कारासाठी लालकृष्ण अडवाणी यांच्या कार्याचा, हिंदूत्वाचा अजेंडा राबविण्याच्या तयारी भाजप करताना दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT