Maharashtra Politics : महायुती पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेत परतल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. ऑपरेशन लोटस्, ऑपरेशन टायगर, आणि आता ऑपरेशन शिवधनुष्यबाण अशा अनेक माध्यमांतून विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कुठेतरी कमकुवत भासू लागलेल्या महाविकास आघाडीतील बडे नेते गळाला लावण्यास सुरुवात झाली आहे.
यातच आता गेले काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.तसेच त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात एक खातं राखीव ठेवल्याची चर्चा आहे.या चर्चांना आणखी हवा मिळण्या मागचं एक प्रमुख कारण म्हणजे जयंत पाटलांनी धरलेलं सूचक मौन हे आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलच भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटलांनी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची गुप्त भेट झाल्याचीही राजकीय वर्तुळात कुजबुज आहे. यातच भाजपचे केंद्रीय नेते आणि रस्ते वाहतूक,महामार्गमंत्री नितीन गडकरी हे सांगली दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळालं आलं.
पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं प्रस्थ समजल्या जाणाऱ्या जयंत पाटलांचा पक्षप्रवेश करुन ज्यांच्याभोवती गेली पाच ते सहा दशकं महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण फिरत आलं आहे, अशा शरद पवारांना भाजप (BJP) सर्वात मोठा धक्का देणार असल्याचे बोलले जात आहे. कारण जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले पवारांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. अजित पवार आणि 40 आमदारांच्या बंडानंतर जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या जोर धरू लागल्या आहेत.
एकीकडे पक्षप्रवेशाच्या चर्चांचं जोरदार वारं वाहत असतानाच दुसरीकडे जयंत पाटील हे कायमच या चर्चांवर मौन बाळगत आले आहेत. त्यामुळे निश्चितच या पक्षप्रवेशाच्या चर्चांना थांबायचं नाव घेताना दिसून येत नाही. आता या चर्चांना केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांचा सांगली दौरा कारणीभूत ठरतो आहे. गडकरी हे सांगलीत विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. त्यावेळी ते इस्लामपूर येथील राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देण्याची शक्यता आहे. मात्र,यामागं जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशासाठी गळ टाकण्यात येण्याचा अंदाज बोलला जात आहे.
राष्ट्रवादीचे मुत्सद्दी नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या जयंत पाटील यांचा रविवारी (ता.16 फेब्रुवारी) रोजी वाढदिवस असून त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात 17 फेब्रुवारी रोजी मंत्री नितीन गडकरी राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत. महाराष्ट्रातील एक अभ्यासू, हुशार, पक्षसंघटनेवर पकड,सहकार क्षेत्रातलं मोठं प्रस्थ म्हणून पाटील यांच्याकडे पाहिले जाते.
लोकनेते राजारामबापू पाटील यांचा राजकीय वारसा लाभलेल्या जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघावर 1984 नंतर मजबूत पकड निर्माण केली आहे.जयंत पाटील यांनी आठवेळी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आपलं मतदारसंघातील दबदबा दाखवून दिलेला आहे.अजित पवार आणि 40 आमदारांच्या बंडानंतरही त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले.
पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि त्यातही राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली.विधानसभेला आघाडीतून 86 जागा लढवलेल्या शरद पवारांच्या पक्षाला अवघ्या 10 जागा जिंकता आल्या. यानंतर मात्र, शरद पवारांसमोरच जयंत पाटील यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्याची जोरदार मागणी लावून धरण्यात आली. याआधीही पक्षात प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहर्याला संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पक्षात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये सुप्त संघर्ष असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच सुरू असते.
विधानसभा निवडणुकीत एकीकडे म्हणावे समाधानकारक जागांचा आकडाही निवडून न आणता आल्यामुळे पक्षाचं परिणामी शरद पवारांच्या महाराष्ट्रातल्या राजकीय वजनालाही कुठेतरी धक्का लागल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे जयंत पाटलांचंही मताधिक्य घटलं. कधीकाळी तब्बल 70 हजारांवर असलेलं मताधिक्य घटून 13-14 हजारांपर्यंत खाली आलं. याचमुळे आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष पदावरील जयंत पाटलांना बदलण्याची मागणी केली जात आहे.
सध्या जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.जयंत पाटलांचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच राजारामबापू शिक्षण आणि उद्योग समूहातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणताही दुजोरा मिळाला नसला तरी पडद्यामागं घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी बुलडाणा येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात जयंत पाटलांनी भाजप नेते गडकरींच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. आणि तेच गडकरी जयंत पाटलांच्या वाढदिवसाच्या दरम्यानच सांगलीत येताहेत हा निव्वळ योगायोग नक्कीत नसणार असं राजकीय विश्लेषक सांगत आहे.
इतके दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची मजबूत पकड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आता कुठेतरी भाजपला चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. याचवेळी जयंत पाटलांसारखा मातब्बर नेता पक्षात आला तर भाजपची या पट्ट्यात मोठी ताकद वाढणार आहे.त्यात भाजप आणि त्यातही अमित शाह यांच्याकडे असलेल्या सहकार क्षेत्रासाठी जयंत पाटलांसारखा नेता सोबत आल्यानं मोठी चालना मिळू शकते.
आठव्यांदा आमदार, विधानसभेच्या सभागृहातल्या कामकाजाचा मंत्री आणि आमदार म्हणून प्रदीर्घ अनुभव, दांडगा जनसंपर्क, साखर कारखाना, दूधसंघ, बँका यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचं विणलेलं जाळं, मतदारसंघात तळागळापर्यंत मान्य करण्यात आलेलं नेतृत्व,पक्षसंघटनेचा अनुभव, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याची राजकीय,भौगोलिक,सामाजिक अंगाने सखोल जाण अशा एक ना अनेक बाबी ज्या भाजपसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह भविष्यातही फायदेशीर ठरु शकतात.
भाजपप्रमाणेच जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशासाठी अजित पवारांची राष्ट्रवादीही पायघड्या घालून तयार आहेत. तसेच त्यांच्यासाठी अजितदादांनी एक खातंही राखून ठेवल्याचं त्यांच्या पदाधिकारी आणि नेतेमंडळींनी यापूर्वी अनेकदा सांगून झालं आहे.पण ते जयंत पाटील आणि अजितदादांमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी झालेला संघर्ष पाहता ते इतक्या लवकर अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करतील याविषयी प्रश्नचिन्ह आहे.
तसेच याआधी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या पक्षातील नेतेमंडळींमध्ये रंगलेलं आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण टोकाचं राजकारणामुळे जयंत पाटील हे भाजपचाच पर्याय वापरु शकतात. तसेच तिथे त्यांच्या दिल्लीत आणि केंद्रात मोठा स्कोप मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.