
Beed, 10 February : बीड जिल्ह्यात आता आष्टीवर मला जरा जास्तच प्रेम करावं लागेल. तो परळी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेला आहे ना. आष्टी हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे. मंत्री म्हणून मला जरा काकणभर जास्तच प्रेम करावं लागेल. मला आष्टीत सारखं यावं लागेल. द्याल ना भाकरी भाजी, असे आवाहन करत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सूचकपणे आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांना घाम फोडला आहे.
बीडच्या आष्टीमधील एका कार्यक्रमात बोलताना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याचे सूचक विधान केल्याने आमदार सुरेश धस यांची अडचण होण्याची शक्यता आहे. आता पंकजा मुंडे यांनी आष्टीच्या संदर्भात केलेले विधान कोणत्या संदर्भाने आहे, यावर राजकीय वर्तुळात किस पडण्याची शक्यता आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूप्रकरणानंतर आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवले आहे. त्याचवेळी धस यांच्याकडून पंकजा मुंडे यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातही पंंकजा मुंडे यांच्यासोबत आपले राजकीय वैर असल्याचे विधान आमदार सुरेश धस यांनी केलेले आहे, त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील पक्षांतर्गत वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्याकडे आता १८२५ दिवस सत्तेचे आहेत. त्यातील २२५ दिवस तर असेच जातात. उरलेले १६०० दिवस मी असे काम करेन की राज्यातील जनतेला वाटेल की, या खात्यातून आम्हाला न्याय मिळाला. ते वचन मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. बीड (Beed) तर माझाच आहे.
बीडमधील आष्टीवर मला जरा जास्तच प्रेम करावं लागेल. तो परळी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेला आहे. आष्टी हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे. मंत्री म्हणून आष्टीवर जरा काकणभर जास्तच प्रेम करावं लागेल. मला आष्टीत सारखं यावं लागेल. द्याल ना भाकरी भाजी काही. मी आष्टीमध्ये आता अधिक लक्ष देणार, प्रत्येक कामात लक्ष देणार आहे. पण, त्याचा अर्थ तुम्हाला जसा घ्यायचा आहे, तसा घेऊ नका, असेही आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, आष्टीत मी कामाला येणार, उदघाटनाला येणार आहे. आता मी संपर्कमंत्री आहे आणि अजितदादा पालकमंत्री आहेत. असलं कॉम्बिनेशन पुन्हा मिळणार नाही. अजितदादा स्वतः पालकमंत्री आहे, ते अर्थमंत्रीही आहेत. पुन्हा मी संपर्कमंत्री आहे. पण, अजितदादा आणि मला चांगलं काम करून दाखवावं लागेल. शिस्तीनं काम दाखवावं लागेल. तिकडं शिस्त आहे. मलाही शिस्त आहे. पण मी तुमची आई आहे ना. तुमच्यासाठी क्षण न क्षण मार्गी लावला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.