Pankaja Munde News Sarkarnama
विश्लेषण

Pankaja Munde News : पंकजा मुंडेंसमोरील संकटं आणखी वाढणार! आता भाजप सांगेल तेच...

अय्यूब कादरी

Beed News : गेल्या काही वर्षांपासून भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारल्या गेल्या आहेत. राज्यातील लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठरवले आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांची दखल घेतली जाईल, त्यांच्यावर विश्वास टाकला जाईल, अशी शक्यता होती. मात्र, तीन राज्यांतील विजयामुळे ती धूसर झाली आहे. त्यांचे हात आता आणखी घट्ट बांधले जाण्याची शक्यता आहे. पक्ष सांगेल तसे वागावे लागेल किंवा शांत बसावे लागेल, अशी परिस्थिती पंकजा मुंडेंसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे वडील गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपला ओबीसी समाजातून मोठा जनाधार मिळाला. तो वरचेवर मजबूत होत गेला तसे पक्षात ओबीसी नेतृत्वाला महत्त्व येत गेले. ते हयात असताना त्यांच्या क्षमतेचे ओबीसी नेतृत्व पक्षात नव्हते. आता ती परिस्थिती भाजपमध्ये राहिलेली नाही.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी आहेत. त्यांना शह देण्यासाठी डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. यांसह अन्य काही प्रभावशाली ओबीसी नेते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंचे महत्त्व कमी होत गेले. काही दिवसांपूर्वी अंबड येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यालाही पंकजा गेल्या नव्हत्या. त्यांच्याऐवजी भाजपने अन्य नेत्यांना त्या मेळाव्याला धाडले होते.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) लक्षणीय यश मिळवले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनुक्रमे शिवराजसिंह चौहान आणि वसुंधरा राजे सिंधिया यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किंबहुना या स्थानिक नेत्यांशिवाय भाजपला या राज्यांत एवढा मोठा विजय साकारणे अशक्य होते. त्यामुळे स्थानिक नेतृत्व पूर्वीच्या तुलनेत आता बळकट होईल. नाईलाजाने दुय्यम स्थानावर समाधान मानलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व राज्यात आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांच्यासमोरील संकटे आणखी वाढण्याची शक्यता आहे. मतदारसंघ शोधण्यापासून या संकटाची सुरुवात होणार आहे.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांना चष्मा लागला आहे. त्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करून दिली होती. जवळचा चष्मा लागला आहे, नंबर छोटा आहे. आता मला जवळचे आणखी स्पष्ट दिसत आहे, असे त्या व्हिडिओत म्हणाल्या होत्या. जवळचे स्पष्टच दिसत आहे, म्हणजे नेमके काय, याबाबत त्यावेळी अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले होते. त्याचा राजकीय अर्थही काढण्यात आला होता. जवळचे स्पष्ट दिसत आहे, म्हणजे आगामी निवडणुकीत परळी मतदारसंघ आपल्याला सुटणार नाही, याची जाणीव पंकजा यांना झाली असेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यात भाजपसोबत शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा पवार यांचा गट सत्तेत सहभागी आहे. अजितदादा गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ही महायुती कायम राहिली आणि महायुती म्हणूनच विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला, तर मुंडे यांना दुसऱ्या मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे.

पंकजा मुंडे राज्यात मंत्री झाल्या आणि त्यांचा संघर्ष सुरू झाला. त्या बोलताना भीड ठेवत नाहीत, पक्षाची शिस्त पाळत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर नेहमी होत असतो. मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे ते मागे एकदा म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी पक्षात आपल्या शत्रूंची संख्या वाढवून घेतली.

गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांचे पक्षातील महत्त्व कमी होत गेले किंवा कमी केले गेले. भाजपनेच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले काही नेते सध्या या पक्षात आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या तशा अनेक नेत्यांना मानाची पदे मिळाली आहेत. दुसरीकडे पंकजा मुंडे यांना मात्र व्यवस्थितपणे बाजूला सारण्यात आले आहे. आता तीन राज्यांत मिळालेल्या यशामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे पंकजा यांच्यासमोरील संकटांत आणखी वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या वर्षी याबाबत एक मोठे विधान केले होते. भाजपच्याच नेत्यांनी आधी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि नंतर पंकजा यांना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता, असे त्या म्हणाल्या होत्या. ते वक्तव्य राजकीय स्वरूपाचे असले तरी आता त्याचे काही संदर्भ लागत आहेत. पंकजा मुंडे यांची कोंडी झाली आहे, हे स्पष्टच दिसत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT