'गरजवंत मराठ्यां'ना आरक्षण मिळावे, यासाठी मैदानात उतरून घट्ट पाय रोवून उभे असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भाजपचे नेते, भाजपचे सहयोगी आमदार आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षणाचा जबर फटका बसला, हे नाकारता येत नाही. जरांगे-पाटील यांच्याविरोधात वक्तव्ये केल्यामुळे मराठा समाज एकवटला आहे आणि त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आले. मराठवाड्यात याचा परिणाम सर्वाधिक जाणवला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्यासारखा एक फाटका, गरीब कार्यकर्ता मैदानात उतरतो आणि टिकून राहतो. मराठा समाज त्यांच्यामागे एकवटतो, कारण ते प्रामाणिक आहेत, दगाफटका करणार नाहीत, याची खात्री समाजाला पटलेली असते. आरक्षणासाठी ते सत्ताधाऱ्यांना जाब विचारत असतात.
आधीच्या सरकारांनी काय केले, हे का विचारत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातो, मात्र ते अजिबात विचलित होत नाहीत. जे सत्तेत आहेत, त्यांनाच जाब विचारणार, ही जरांगे-पाटील यांची भूमिका महायुतीची कोंडी करणारी ठरली आहे. त्यामुळेच भाजपने आता जरांगे-पाटील यांच्या विरोधात आरपारची लढाई सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी भाजपने आता सहयोगी, अपक्ष आमदार राऊत यांना समोर केले आहे, असा संदेश समाजात गेला आहे.
शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचे राज्याच्या राजकारणातील स्थान बळकट होत आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असले तरी त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे नुकसान झालेले नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री असूनही मराठा समाजात शिंदेविषयी असलेली चांगली भावना तर याउलट देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेला रोज जात असलेले तडे, त्यांच्याविषयी एका वर्गात निर्माण होत असलेल्या नकारात्मक भावनेमुळे भाजपला तोटा होत आहे. यामुळेच तर भाजप आरापारची लढाई लढत नसेल ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, सगेसोयऱ्यांचाही समावेश करावा, या जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या आहेत. ओबीसी नेत्यांकडून याला विरोध केला जात आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमची कोणतीही हरकत नाही, ओबीसीमधून त्यांना आरक्षण नको, अशी त्यांची भूमिका आहे. या मुद्द्यावरून राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील वादा टोकाला गेल्याचे आपण पाहिले आहे. ओबीसी समाजाचे अन्य नेतेही आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनामुळे समाजकारण, राजकारण ढवळून निघाले आहे.
मराठा आरक्षणासाठी यापूर्वीही आंदोलने झाली होती. मात्र, आताच्या आंदोलनाचे स्वरूप वेगळे आहे. जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाचा विश्वास संपादन केला आहे. कधी नव्हे ते आपण एकत्र आलो आहोत, एकवटलो आहोत, अशी भावना मराठा समाजात दृढ झाली आहे. ही एकी कायम ठेवण्याचा दृढनिश्चय मराठा समाजाने केल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणाला भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षण द्यायचे आहे, मात्र फडणवीस आडकाठी आणतात, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचे नुकसान झाले.
असे असतानाही नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अनिल बोंडे हे एकापाठोपाठ जरांगे-पाटील यांच्यावर टीका करत असतात, त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त करत असतात. त्यात आता भाजपचे बार्शी (जि. सोलापूर) येथील सहयोगी आमदार राजेंद्र राऊत यांनी उडी घेतली आहे. ते जरांगे-पाटील यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. जरांगे-पाटील भाजप, फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. त्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा भाजप नेत्यांचा अधिकार नाकारता येत नाही. मात्र, त्यामुळे मराठा समाज दुखावला जातोय आणि त्यामुळे भाजपची आणखी अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठा आरक्षणाबाबत मी महायुतीच्या नेत्यांकडून लिहून आणतो, तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा, असे आव्हान आमदार राऊत यांनी जरांगे पाटील यांना दिले होते. राज्यात महायुतीची सत्ता आहे, केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'ची सत्ता आहे. असे असताना आमदार राऊत हे जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून का लिहून आणायला सांगत असतील? जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, असे त्यांना याद्वारे अप्रत्यक्षपणे सुचवायचे आहे.
आरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घ्यायचा असतो, विरोधकांनी नाही, हे लोकांना कळत नाही, असा समज आमदार राऊत आणि भाजप यांचा झालेला असावा. जरांगे पाटील यांनी राऊत यांचे आव्हान स्वीकारले आहे. महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्यांकडून लिहून आणायचे ते सांगा, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.
भाजप मराठा आरक्षणाच्या 'चक्रव्यूहा'त अडकला आहे का, असाही प्रश्न निर्माण होतो आहे. जरांगे-पाटील यांच्यावर टीका करा किंवा करू नका, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपले नुकसान निश्चित आहे, असे भाजपच्या नेत्यांना वाटत असावे. आमदार राजेंद्र राऊत यांचा विचार केल्यास त्यांच्या बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात होतो. लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभा मतदारसंघाने महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जवळपास 60 हजार मतांची आघाडी दिली होती. त्यामुळे आमदार राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत 'हिरो' होण्यासाठी तर आमदार राऊत हे जरांगे-पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले नसतील ना, असाही प्रश्न आहे. मात्र, भाजपची संमती नसती तर आमदार राऊत यांना फटकारले गेले असते, शांत राहण्याची सूचना दिली गेली असती. त्यामुळे भाजपने जरांगे-पाटील यांच्याविरोधात आरपारची लढाई सुरू केल्याचे दिसत आणि तेही सहयोगी अपक्ष आमदाराच्या माध्यमातून. मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी आमदार राऊत यांनी केली आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना त्यांनी तसे पत्र पाठवले आहे. त्यासाठी ते ठिय्या आंदोलन करणार आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाबाबत महायुती सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. तिकडे, जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. निर्णय तर घ्यावा लागणार, मग त्याचे श्रेय आपणच घेतले तर, असाही विचार कदाचित भाजप नेतृत्वाने केला असावा आणि त्यातूनच मग सहयोगी आमदार राऊत यांचे जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक होणे, त्यांनी विधीमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची मागणी करणे, अशा घडामोडी घडल्या असाव्यात. आरक्षणाचा निर्णय झाला आणि त्याचे श्रेय जरांगे-पाटील यांच्याऐवजी अन्य कोणाला देण्याची खेळी भाजपच्या अंगलट येऊ शकते. जरांगे-पाटील यांनी दिलेला लढा त्यांच्यामागे एकवटलेला मराठा समाज विसरणार नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.