Ajit Pawar : संयम सुटलेल्या अजितदादांनी अखेर फोडणी दिलीच, धूर शिंदे गटाच्या नाकातोंडात जाणार!

Ajit Pawar Demand CM Post : महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एकापाठोपाठ वादग्रस्त विधाने केली आहेत. आपल्यावर केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अजितदादा पवार यांचा संयम सुटणे साहिजक होते.
ajit pawar | eknath shinde
ajit pawar | eknath shindesarkarnama
Published on
Updated on

आघाडी, युतीमध्ये अनेक पक्ष एकत्र येतात. त्यामुळे नेत्यांना आपल्या महत्त्वाकांक्षांना मुरड घालावी लागते, मात्र हे फार काळ शक्य नसते. राजकारणात पुढे जायचे असेल तर महत्त्वाकांक्षा आवश्यक असते. राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते, पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून 'कोल्ड वॉर' सुरू आहे.

मुख्यमंत्री बनण्याची अजितदादांची ( Ajit Pawar ) महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यासाठीचे हेही एक कारण त्यांनी दिले होते. आता त्यांनी त्याच्या पुढचे पाऊल टाकले आहे. महायुती सरकारचा 'कॅप्टन' मीच, असे मुख्यमंत्री शिंदे नुकतेच म्हणाले आहेत. शिंदे गटाचे नेतेही एकनाथ शिंदेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्री असतील, असे सांगत आहेत. आता अजितदादांनी या स्पर्धेत थेट उडी घेतली आहे. "मला मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा," अशी मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

महायुतीत सध्या मोठ्या प्रमाणात कुरघोड्या सुरू आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आणि थेट मुख्यमंत्री बनले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा हा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपसाठी एका अर्थाने धक्काच होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असेच सर्वांना वाटत होते. मात्र, फडणवीस यांना अनिच्छेनेच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पीछेहाट झाली. त्यावेळीही फडणवीस यांनीच उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.

ajit pawar | eknath shinde
MVA News : पायाखालची वाळू सरकलेल्या 'या' मंत्र्याला कोण भिडणार ?

मराठा नेतृत्व म्हणून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना मुख्यमंत्री केले. वर्षभरानंतर अजितदादाही भाजपसोबत आले. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली. एकनाथ शिंदे हे मराठा असताना अजितदादांच्या रूपाने आणखी एक बडा मराठा नेता महायुतीत आला, हे शिंदे गटातील अस्वस्थतेचे कारण ठरले. अजितदादांच्या 'एन्ट्री'मुळे मंत्रिपदासाठी इच्छुक शिंदेंच्या आमदारांना प्रतीक्षायादीतच राहावे लागले. नंतर पालकमंत्री पदांवरूनही छुपा संघर्ष झाला. महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद अजितदादांच्या गटाला मिळाले.

मुख्यमंत्री कोण, हे निवडणुकीनंतर ठरेल, असे अजितदादा काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. एकनाथ शिंदे हेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनतील, असा दावा शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला. यात भाजपचे नेतेही मागे राहिले नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनावेत, अशी इच्छा काही नेत्यांनी व्यक्त केली. महायुतीत सर्वाधिक आमदार असूनही भाजपला नमते घ्यावे लागत आहे, अशी टीका करण्याची एकही संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोडली नाही. हे सर्व सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले. त्यावेळी झालेल्या भेटीत, "मला मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा," अशी मागणी अजितदादांनी गृहमंत्री शाह यांच्याकडे केल्याचे समोर आले आहे.

अजितदादा यांनी शाह यांच्याकडे अशी मागणी केल्याचे वृत्त 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. त्यावर अजितदादांनी अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. अशा प्रकरणांत अजितदादाच काय कोणताही नेता असता तरी त्याने नकारच दिला असता. गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी अजितदादांच्या पक्षाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली. सावंत हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने सौ. अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा पराभव झाला. याबाबत काही दिवसांपूर्वी बोलताना सावंत म्हणाले होते, की "आपल्याला ते (अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी) आवडलेच नव्हते, त्यामुळे मी मत मागायला तुमच्याकडे आलो नव्हतो."

डॉ. तानाजी सावंत असे बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली होती. हे कमी की काय म्हणून सावंत यांनी अजितदादांच्या पक्षाबद्दल पुन्हा एक वादग्रस्त विधान केले. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसून बाहेर आलो की मला उलट्या होतात, असे ते म्हणत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली होती. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सावंत यांचे वाभाडे काढले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सावंत यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त समोर आले होते.

ajit pawar | eknath shinde
Uddhav Thackeray : उद्धवसाहेब… सोडून गेलेल्यांना पवारसाहेबांनी धडकी भरवली, आपण कधी सक्रिय होणार?

अशा वक्तव्यांमुळे अजितदादांचा संयम सुटणे साहजिक होते. "मुख्यमंत्री कोण, हे निवडणुकीनंतर ठरेल," असे अजितदादा म्हणाले होते. "मला मुख्यमंत्री व्हायचे आहे किंवा मीच मुख्यमंत्री असेन," असे ते त्यावेळी म्हणाले नव्हते. तरीही शिंदे गटाकडून त्यांच्यावर कुरघोडी करण्यात आली. "एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील," असा दावा करण्यात आला. त्यामुळे अजितदादांनी शाह यांच्याकडे मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली असेल. अजितदादांनी साधलेले 'टायमिंग' परफेक्ट आहे. त्यांनी थेट अमित शाह यांच्याकडेच मागणी केल्यामुळे शिंदे गटाची अस्वस्थता वाढणार आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com